अनुभव – प्रवीण दगडे पाटील

त्या वेळी माझे आई-वडील शहरात राहत होते.माझे बालपण सुद्धा तिथेच गेले. मात्र इंजिनीरिंग साठी मी व माझा छोटा भाऊ अक्षय दोघेही बहिणी कडे राहत होतो. उन्हाळा सुरू झाला होता. आई-वडील दोघेही गावाला आले होते. लग्न समारंभाचे दिवस असल्यामुळे आम्ही एकत्र आमच्या गाडी ने गावाला गेलो आणि काही दिवस तेथेच राहिलो.

त्याच दरम्यान माझ्या वडिलांच्या ऑफिस मधील काही महत्वाची कागदपत्रे हवी असल्या कारणाने त्यांच्या साहेबांनी त्यांना फोन केला. कागदपत्रे ऑफिस मधील कपाटात होती आणि चावी वडिलांकडे असायची. त्यामुळे वडिलांनी मला आणि अक्षय ला ऑफिस मधील कपाटाची चावी दिली आणी साहेबांना चावी देऊन एका दिवसात शहरात जाऊन परत या असे सांगितले. दुपारची वेळ होती आणि आत्ता लगेच निघालो तर संध्याकाळी पोहचणार आणि तिथल्या ट्रॅफिक मध्ये अडकणार याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणून आम्ही रात्री जेवून निघू आणि सकाळपर्यंत पोहोचून चावी देऊन लगेच परत येऊ असे वडिलांना सांगीतले. रात्रीचे जेवण आटोपले आणी आई कडून घरा ची चावी घेऊन मी आणी अक्षय जायला निघालो. गावाकडे रात्री जेवण लवकर असतात त्यामुळे आम्ही 9 ला जेवून निघालो आणी साधारण 1 वाजता शहरात येऊन पोहचलो.

तसे शहर म्हंटले की रात्रभर जागे असते असं म्हणतात ते खरं आहे पण मे महिना सुट्टी चा काळ असल्याने आमच्या येथील शेजारी व बरेचसे लोक गावाला गेले होते. आम्ही गाडी मैदानात पार्क केली आणि घराच्या दिशेने एका मागोमाग एक चालू लागलो. दोघानाही भरपूर दमायला झाले होते. तसा मी शहरात 17 वर्ष राहिलोय पण नेहमी दिसणारे वडा चे झाड मला बऱ्याच दिवसांनी पाहिल्या मुळे थोडे वेगळे दिसत होते. का कोण जाणे..

मला स्वतःलाच प्रश्न पडला होता. पण त्या कडे एवढे लक्ष न देता मी अक्षय च्या मागे चालत होतो. एरवी रात्री असलेला लोकांच्या घरा समोरील बल्ब चा प्रकाश आज न्हवता. त्या मुळे अंधार अजूनच जाणवत होता. अक्षय ने घरचा दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो, पाणी वैगरे प्यायलो आणि कपडे बदलून करून झोपायला माडी वर गेलो. सकाळी लवकर उठून ऑफिस मध्ये चावी देऊ आणि ट्रॅफिक लागण्या आधी शहरातून बाहेर पडू असा विचार करत आम्ही दोघे झोपी गेलो. 4-4:30 तास ड्रायविंग करून मला दमल्यामुळे काही क्षणात गाढ झोप लागली.

“भाऊ उठ रे !! भाऊ…… भाऊ  उठ !!” रात्री च्या त्या सुन्न शांततेत अक्षय च्या त्या थरथरत्या आवाजाने मला जाग आली. समोरच्या भिंतीवरच्याच घड्याळात पाहतो तर पावणे दोन वाजले होते. 

“काय रे काय झाले ??” मी अक्षय कडे पाहतच विचारले.

“अरे शेजारील गल्ली मधून बाई च्या चालण्याचा आणी पैंजण चा आवाज येतोय !! ऐक तु पण”

तसा मी बिछान्यात उठून बसलो आणी श्वास रोखून ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो.

पण मला काहीच ऐकू आले नाही. मी उठलो आणी खिडकी उघडून बाहेर कोणी दिसते का पाहण्यासाठी डोकावले. पण काहीच नाही. मी अक्षय शेजारी येऊन बसलो आणी त्याला म्हटलं “तु झोप मी आहे जागा. तुला झोप लागली की मग मी झोपतो.”

तसं अक्षय ला थोडं हायस वाटलं. दोघेही अंथरुणात पडलोच होतो तसे अचानक पैंजणाचा आवाज येऊ लागला. अक्षय माझ्याकडे पाहत ताडकन उठून बसला. “बघ मी म्हणत होतो ना !” तो घाबरून म्हणाला. या वेळी पैंजण चा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. मात्र खिडकी बाहेर डोकावण्याची आता माझी हिम्मत होत न्हवती.

अक्षय आणी मी एकत्र शाळे मध्ये होतो आणि लहानपणी चेटकिणीच्या बऱ्याच गोष्टी ऐकून होतो. समुद्र किनारी घर असल्या मुळे या गोष्टी साधारण सगळ्यांच्या ऐकण्यावर असतातच. पण कधी घरात एकटं-दुकट राहायचा प्रसंग आला नव्हता आणि तो नेमका आज आला.

मी खिडकी आतूनच ढकलली आणि त्याला झोप असे खुणावत माझ्या जागेकडे जायला निघालो की तोच मागून जोरात आवाज झाला आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तो पैंजणाचा आवाज एकदम मोठा झाला होता. जणू काही कोणी तरी गल्ली च्या एका टोकाकडून पळत येऊन एकदम माझ्या मागे येऊन उभं राहिलं आहे. इतकं मागे की मला त्याचा श्वास ऐकू येत होता. एक सुन्न करणारी आरोळी आणी पैंजणाचा आवाज एकाच वेळी झाला तसा मी आणी अक्षय पटकन अंथरुणात घुसलो आणि डोक्यावर चादर घेऊन डोळे घट्ट बंद करून पडलो. तो पैंजण चा आवाज आता फक्त मोठाच नाही तर आमच्या अंथरुणा शेजारून येत होता. इतका स्पष्ट आवाज की जाणू काही कोणी तरी आमच्या अंथरुणा शेजारी येऊन चालतेय आणि मोठं मोठ्याने श्वास घेत आहे. ती वेळ आणी काळ एवढा भयाण होता की ज्यांनी स्वतः कधी असले अनुभव घेतले असतील त्यांनाच याची कल्पना येईल.

आम्ही दोघे खरंच खूप घाबरलो होतो आणि देवाचा जप करू लागलो. मी स्वतः हनुमान चा भक्त असल्या मुळे मनातल्या मनात हनुमान चालीसा पठण करू लागलो. आयुष्यात मी पहिल्यांदा एवढा घाबरलो होतो. मनातल्या मनात यासाठीच की तोंडातून ब्र पण काढायची ताकत आमच्या मध्ये न्हवती. तो पैंजणाचा आवाज आमच्या भोवती फेऱ्या घेऊन अगदी माझ्या काना जवळ येऊन उभा राहिला. माझ्या अंगावर भीतीने सर्रकन काटा उभा राहिला. आता काही खरं नाही असे वाटत असतानाच तो आवाज येईनासा झाला……. सगळे पुन्हा एकदा शांत.. सुन्न…

आवाज जरी बंद झाला असला तरी आतून आम्ही पुरते हलून गेलो होतो.आम्ही दोघे तसेच तोंडावरची चादर न काढता झोपी गेलो. आम्हाला कधी झोप लागली हे ही आम्हाला कळले नाही.

सकाळी लवकर उठून वडिलांच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे चावी देऊन तसेच ताड परतीच्या दिशेने निघालो. घरी येऊन आई आणी आजी ला सगळे सांगितले पण दोघीनाही अनुभव न आल्यामुळे या गोष्टी वर विश्वास ठेवण्यास तयार न्हाव्त्या.

“अरे आम्ही 25 वर्ष तिथे राहिलो,  आम्हाला कसे काही झालं नाही !!” आई च्या या बोलण्यावर मी शांत झालो.

आज या गोष्टी ला 9-10 वर्ष पूर्ण झाली पण अक्षय आणी मी अजूनही ती गोष्ट आठवली की एकमेकाकडे सुन्न नजरेने पाहत बसतो. कोणाचा विश्वास बसो किंवा न बसो पण आम्ही काय अनुभव घेतला ते आम्हालाच माहित आहे…….

This Post Has 2 Comments

Leave a Reply to Samadhan kapadi Cancel reply