लेखक – अनिरुद्ध मोकाशी

मी, माझा भाऊ मंदार आणि त्याचा मुलगा सलील. आम्ही तिघे एकत्र राहत होतो. खरंतर त्यांच्यात पाहुणा मी होतो. बरीच वर्षं! माझा कसला संसार नव्हता, आणि बाहेरच्या संसाराशी माझे संबंध नव्हते. मला पैशांची गरज नव्हती. त्यासाठी माझा व्यवसाय होता. मी केवळ कुणाची तरी सोबत असावी म्हणून मंदारकडे राहत होतो. तरुणपणात माझं लग्न होणार होतं पण ते लांबणीवर पडलं. त्यानंतर अंतर पडत गेलं आणि माझं लग्न टळत गेलं. माझं एकटं राहणं माझ्या भावाच्या लक्षात आलं आणि त्याने मला त्यांच्या घरी राहण्यासाठी सांगितलं. त्यात त्याने अधिक आग्रह केला नाही. केवळ मी एकटा पडू नये, हाच त्याचा विचार होता. 

मी राहू लागलो तोच दोन-तीन वर्षात वहिनीचा, म्हणजे मंदारच्या बायकोचा रहस्यमयी मृत्यू झाला. हा नैसर्गिक मृत्यू होता की अपघात ते मला आजपर्यंत समजलं नाही. पण काहीतरी घडलं नक्की होतं. कारण वहिनीच्या शवाला सर्वांनी शेवटचं पाहिलं ते चितेवर जळताना! विशेष म्हणजे कुणीही ते प्रेत पाहिलंच नव्हतं. एका शुभ्र वस्त्रात संपूर्ण प्रेत चेहऱ्यासकट गुंडाळलं होतं. असो.— पण वहिनीच्या मृत्यूनंतर मंदारही एकटा पडला. त्यानंतर मी आणि मंदार दोघे समदुःखी झालो. आमच्या आयुष्यात जोडीदाराची जागा रिकामी होती. त्यानंतर तो आणि मी गेली पाच वर्षे एकत्र राहतोय. एकूण इथे त्याच्या बंगल्यात राहता मला सात ते आठ वर्षे होत आली.  

मंदारचा बंगला छान होता. दुमजली होता. त्यातला दुसरा मजला त्याने मला दिला होता. बंगल्याला वरती टेरेस होतं. तिथे मंदारने आपली छोटी बाग बनवली होती. बंगल्याच्या आजूबाजूलाही हिरवळ होती. अधूनमधून या सगळ्याची निगा राखण्यासाठी एक माळी फेरी मारत असे. तो आणि घरच्या कामासाठी ठेवलेला एक माणूस असे दोघे दिवसा येऊन दुपारपर्यंत निघून जात असत. बंगल्याला बाऊंड्री वॉलही चांगली मोठी होती. म्हणजे ती सहज पार करणं शक्य नव्हतं. सोसायटी असल्याने बंगल्याच्या शेजारीही अनेक बंगले होते. पण त्या लोकांशी मंदारने संबंध ठेवले नव्हते. कधी त्यांनीही स्वतःहून इथे येण्याचे कष्ट घेतले नव्हते.

माझं मुख्यतः घरातच काम असायचं. मी कधी घराच्या बाहेरही पडलो नाही. जास्त करून कामं फोनवरूनच होत होती. जास्तच काही झालं तर मला घराबाहेर पडावं लागे. पण मंदार मात्र त्याच्या कामासाठी रोज ऑफिसला जात असे. सलीलही कॉलेजला जाई. मग दिवसभर घरात मी एकटाच राहत असे. घरात माणसांचा आवाज होई तो संध्याकाळी आणि रात्रीच. 

मंदारचा मुलगा सलील कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होता. मुलगा अभ्यासात चांगला होता. पण त्याचा खर्च आवाक्याबाहेर जात असे. यावरून मंदार आणि त्याच्यात किरकोळ वाद झालेले. शेवटी मंदारही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे. घरात पैसाही येत होता तसा जातही होता. या मामल्यात मी मात्र कधी लक्ष घातलं नाही. एक दोनदा मंदारही मला सलीलला समजावण्यासाठी सांगत असे. तेव्हा मी वयाच्या अधिकाराने जेवढ्यास तेवढं बोलून मुद्दा संपवत असे. सलीलचं असं वागणं हे परिणाम होते. कारण त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं. आई नव्हती आणि वडील नेहमी कामात गुंतलेला. यामुळे हा हट्टी स्वभाव निर्माण झालेला. जरी त्याचा हा हट्ट त्रासिक नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखा मुळीच नव्हता. 

एक दिवस सलीलने नाईट स्टे साठी परवानगी मागितली. पण मंदारने ती मान्य केली नाही. 

“काय करणार तुम्ही रात्री-अपरात्री?” मंदारने विचारलं. 

“दोन दिवसांचा तर प्रश्न आहे. तसंही कॉलेजनंतर हे सगळं करण्यासाठी कुठे वेळ मिळणार?” सलील म्हणाला. 

मी दोघांचा वाद शांत बसून बघत होतो. मधे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही हे लक्षात ठेवून मी गप्प होतो. 

“बरं. कुठे जाणार आहात?” मंदार. 

“ते काही अजून ठरवलं नाही. अनप्लॅनड् ट्रिप आहे.”

“तरीही कुठल्या रस्त्याने जाणार आहात, हे तर ठरवलं असेल ना? की तेही नाही.”

सलील शांत राहिला. 

“मला परवानगी मिळणार आहे की नाही?” सलीलने विचारलं. 

“मला पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय, खर्च किती कराल हे कळल्याशिवाय मी काही परवानगी देणार नाही.”

“माझे मित्र बरोबर बोलले होते. घरी न सांगताच निघायला हवं होतं.” असं बोलून सलील रागारागात खोलीत गेला. आणि त्याने खोलीचं दार आपटून बंद केलं. 

दुसरा दिवस उजाडला. माझं आणि मंदारचं बोलणं सुरू होतं. माझ्या दिनक्रमानुसार मी निवांत होतो. आणि मंदार घाईत. त्याची लॅपटॉप बॅग घेऊन तो घाईत डायनिंग टेबलवर येऊन बसला. त्याने आपली बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवली. तोपर्यंत नोकराने त्याच्या पुढ्यात नाश्त्याची प्लेट आणून ठेवली होती. मी मात्र शांतपणे सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. मंदार घाईघाईत खाऊ लागला. 

“मंदार, अरे हळू खा.” मंदारची घाई पाहून मी त्याला म्हणालो. 

“नाही रे. आज वेळेत पोहोचायला हवं. त्यात अर्धा तास उशीरा जाग आली. आणि तुला तर माहीत आहे. शहरात लोक सेकंदाचा हिशेब ठेवतात.” खाता खाता मंदार बोलला. 

“हवं तर नंतर घाई कर. पण चार घास तरी शांततेत खा.” 

“बरं.” मंदार खाऊ लागला. खाताना मधेच थांबला. आणि म्हणाला, “सलील नाही उठला? कॉलेज आहे की नाही आज?” 

“कॉलेज नसायला काय झालं? आज वर्किंग डे आहे.” 

मंदारने सलीलला हाका मारल्या. पण काही उत्तर आलं नाही. सलीलची खोलीही बंद होती. मंदारने नोकराला बघण्यासाठी सांगितलं. नोकर खोलीत पाहून बाहेर आला तो मान हलवत. 

“खोलीत सलील नाहीत.” नोकर म्हणाला. 

“नीट पाहिलंस का?” मंदारने विचारलं. 

“होय. बेड पण अस्ताव्यस्त आहे. आणि बाथरूमही बाहेरून बंद आहे.” 

“बरं. त्याची कॉलेजची बॅग आहे का पाहून ये.” केवळ एक शंका म्हणून मी नोकराला सांगितलं. 

नोकर तेही पाहून आला. आणि माझी शंका खरी ठरली. सलील आणि त्याची बॅग दोन्ही त्याच्या खोलीत नव्हते. 

“असं का विचारलंस त्याला?” मंदारने विचारलं. 

“अरे, तो कालच फिरायला जायचं विचारत होता. आणि तू नकार देत होतास. नक्कीच पहाटे किंवा रात्री तो न सांगता मित्रांसोबत गेला असेल.” 

“माझं अनुमान खरं ठरलं तर. जाऊ दे. या वयात मुलं अशी वागायचीच. जाऊन जाऊन कुठेही गेला तरी चार दिवसात परत घरी येईलच. तेव्हाच सगळं विचारावं.” 

“मग त्याला फोन वगैरे करू का?” 

“नको. उगाच तो संतापेल. त्यापेक्षा आल्यावर पाहू. बरं, मला उशीर होत आहे. मी निघतो. यावर संध्याकाळी बोलू आपण.” इतकं बोलून मंदार ऑफिससाठी निघून गेला. 

मी दिवसभर घरात एकटाच होतो. माझी स्वतःची कामं आटपून मी मोकळाच होतो. हा माझा नित्यक्रम होता. पण याला पर्याय नव्हता. घरात एकटं राहून माझ्या मनात सारखे विचार येत. चांगले, वाईट, भूतकाळातले, घडलेले, सुखाचे, दुःखाचे, आनंदाचे. रोज वेगवेगळ्या विचारांमध्ये स्वतःला रमवून घेणे, हाच माझा मुख्य उद्देश असायचा. बाकी काम काय नशिबाला पुजलंच होतं. न राहवून तेव्हा मला सलीलचा विचार मनातून खाऊ लागला. न सांगून मुलांसोबत निघून गेलेला सलील काय करत असेल नि काय नाही अशी काळजी लागली होती. मला मूल नसलं तरी तो काही मला परका नव्हता. त्यामुळे मला चिंता झाली होती. मला नकळत त्याला फोन करावासा वाटला. मी केलासुद्धा. पण त्यानेच तो स्वतःहून कट केला. मी ही जास्त विचार केला नाही. मित्रांसोबत असेल किंवा रागावला असेल, अशी स्वतःची खुळी समजूत घालून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

संध्याकाळ झाली. मंदार घरी परतला. मी चहाचं आधण गॅसवर ठेवलंच होतं. नेहमीची सवय. मी दोघांसाठी चहा केला. माझ्या मनात सलीलचा विषय होता. पण तो बोलून कसा दाखवावा? नुकताच मंदार आला होता. त्याच्या ऑफिसचं काम, तिकडचा ताण यामुळे त्याला शीण आलाच होता. माझ्या बोलण्याने त्याच्या डोक्याचा ताप आणखी वाढावा असा माझा हेतू नव्हता. गॅसवर ठेवलेला चहा उकळला होता. मी तो कपात ओतला आणि मंदारपुढे घेऊन आलो. या कृतीत आमचं बोलणं तसं रोजसारखंच झालं. मंदारने आपला कप उचलला. मीही त्याच्यासोबत चहा पिऊ लागलो. त्या दरम्यान आमच्यात शांतताच होती. माझं मुद्दाम ठेवलेलं मौन न जाणून मंदारने मला विचारलं, “सलीलबद्दल काही कळलं?” 

मंदारने माझं मनातलं ओळखून हा प्रश्न केला नव्हता. पण त्याच्या सहाजिकपणावर मला तेव्हा आश्चर्य वाटलं. 

“नाही,” मी म्हणालो. “तुला काही कळलं?” 

“हो.” 

“कसं? मी जेव्हा त्याला फोन केला तेव्हा तर त्याने सरळसरळ कट केला.”

“हे माझ्यासोबतही घडलं. पण त्याच्या मित्रांचा नंबर होता माझ्याकडे, त्यांच्याकडून सर्व कळलं.” 

“मग सध्या तो कुठे आहे?”

“जंगलात.”

“मस्करी करतोय माझी?” 

“नाही रे. मुद्दाम नाही बोललो. त्याच्या मित्रांनी हेच सांगितलं. इथून दोनशे किमी अंतरावर जंगल आहे. तिथेच आहेत.” 

“जंगलात काही होणार नाही? तू असा निश्चिंत कसा?” मला राहवलं गेलं नाही.

“राहू देत. तसंही तिकडे काही नाही. मला तो परिसर सगळा माहीत आहे. मी फ्रेश होऊन येतो.” 

असं म्हणून मंदार त्याच्या खोलीत गेला. त्याच्या चेहऱ्यावर कसले वेगळे भाव नव्हते. त्याला सलीलबद्दल जराही काळजी वाटली नव्हती. मला त्याच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं. 

मंदार फ्रेश होऊन आला. तासा दोन तासांत आम्ही जेवायला बसलो. तेव्हाही जास्त काही बोलणं झालं नाही. टीव्ही सुरू होता. त्यामुळे जास्त लक्ष तिथेच लागून होतं. जेवण आटोपून झोपलो आणि उठलो ते सकाळी. रात्रभर सलीलचा विषय निघाला नाही. 

सकाळ झाली. दैनंदिन नित्यक्रमाने आधीच आखलेला आम्हा दोघा भावांचा दिवस सुरू झाला. रोज रोज तेच तेच घडणारं आजही घडतच होतं. मी व मंदार रोजसारखे आपापल्या जागी बसलो होतो. मंदारची ऑफिसला जाण्याची घाई होती. आणि माझा निवांतपणा सुरू होता. दोघेही चहा घेत बसलो होतो. तोच दारावरची बेल वाजली. 

मी जाऊन दार उघडलं. दारावर पोलीस आले होते. सकाळीच पोलिसांचं घडलेलं दर्शन पाहून मला आश्चर्य वाटलं. 

“बोला साहेब. काय झालं?” मी विचारलं. 

“मंदार―” 

“नाही. मी त्याचा भाऊ. मंदार आतमध्ये आहे. या ना.” 

मी त्यांना घरात घेतलं. 

“काय झालं?” मंदारने विचारलं. 

“सलील तुमचा मुलगा का?” 

“हो.” 

“घरात कोण असतं?” 

“आम्ही तिघेच असतो. सलील आणि आम्ही दोघे भाऊ.” 

“त्याची आई―?”

“नाही. ती गेली. पण काय झालं?” 

“आमच्याकडे काल रात्री एक केस आली. आय एम सॉरी. पण सलील―” 

“काय झालं?” 

“तो नाही राहिला.” 

मंदारला आणि मला हा धक्का सहन झाला नाही. मंदार जागीच खुर्चीवर बसला. 

“काय, म्हणजे कसं घडलं?” मी पोलिसांना विचारलं. 

“काय घडलं ते अजून माहिती नाही. पण इथून दूर असलेल्या जंगलात त्याचं शीर सापडल्याची माहिती आम्हाला काल रात्री मिळाली. घटनास्थळी गेलो तर काही माणसं तिथे उभी होती. त्यांपैकी एकाने मला कळवलं होतं. बाजूला त्याचं सामान होतं. त्यातून सलीलबद्दल सर्व माहिती मिळाली. तिथे त्याचे मित्रही होते. ते सांगतात सलील रात्री जंगलात कुठेतरी गेला होता. मग अखेर सापडला तो हा असा.”

“शीर सापडलं म्हणजे?” 

“हो. महत्त्वाची गोष्ट अशी, की आम्हाला व तिकडच्या लोकांना केवळ शीर मिळालं. आम्ही तसा तपास केला, पण बॉडी सापडली नाही.”

“अरे, देवा!” 

“तुम्हाला स्टेशनला यावं लागेल.” 

मी पोलिसांना हो म्हणालो. आणि मंदारला जाण्याचा सल्ला दिला. मंदारचा पाय निघत नव्हता. पण मन घट्ट करून तो आणि मी पोलीस स्टेशनला गेलो. 

नशीब कुठला दिवस दाखवेल याचा अंदाज बांधता येत नाही. कसलाही विचार नसताना, असं घडलं होतं. सलीलचं डोकं पाहताना धीर सुटला होता. पण घडलेल्या गोष्टींपुढे आपण काय करू शकतो? स्टेशनमधून परतताना मनात अनेक विचार येत होते. पण एक मौन बसलं होतं. पत्नीनंतर मुलगा गेल्याचं समजून मंदार आणखीनच खचला होता. बाकी त्याने इतकं सर्व मुलासाठीच कमावून ठेवलं होतं. आता तो खरोखर एकटा पडला होता. त्याच्यात आणि माझ्यात आता एकटेपणाचं साम्य होतं; पण त्यांची कारणं वेगळी होती. 

मी आणि मंदार घरी पोचलो. दोघे एक शब्दही न उच्चारता तसेच शांत बसलो. 

“मला आता भीती वाटतेय.” मंदार म्हणाला. 

“मंदार, काय म्हणतोयेस तू?” मंदारचं हे वाक्य ऐकून मला विचित्र वाटलं. मुलगा गेला याचं दुःख वाटण्यापेक्षा भीती कशी वाटू शकते? “सलील गेला याचं दुःख वाटायला हवं तुला.” 

“ते आहेच रे. पण भीती जास्त वाटत आहे.” 

“का?” 

“पोलीस काय म्हणाले ऐकलंस? डोकच तेवढं सापडलं आहे. शरीराचा पत्ता नाही.” 

“मग?” 

“सलील इकडे आला तर?” 

“व्हॉट रबिश! काय बोलतोस तू? सलील गेल्याचं दुःख डोक्यात गेलं काय तुझ्या?” 

“नाही. पण सांगितलं तर तुला नवल वाटल्यावाचून राहणार नाही.”

“असं काय आहे?” 

“तुझी वहिनीही अशीच गेली…”

मंदारच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण त्याने बोलताना अगदी भूतकाळापासूनच सुरुवात केली. 

“पूर्वी मला गरिबीने पिडलं होतं. तेव्हा सलीलचा जन्मही झाला नव्हता. माझ्या बेताच्या परिस्तिथीत संसार चालवणं मला जमत नव्हतं. माझी अडचण जेव्हा हिच्या लक्षात आली, तेव्हा ती कुठून तरी उपाय घेऊन आली. उपाय फार अघोरी होता. माझ्यासारख्या तर्कशुद्ध माणसाला हे सर्व अमान्य होतं. पण तिने काही आपला हेका सोडला नाही. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी मलाही असह्य झालं तेव्हा ती जे सांगेल ते ऐकण्याचा निर्णय मी घेतला. शेवटी आम्ही गेलो त्याच जंगलात; जिथे काल सलील गेला होता. म्हणून मी तुला काल म्हणालो होतो, मला तिथला परिसर माहिती आहे. त्या जंगलात काही वनवासी लोक राहतात. त्यांच्याकडूनच तिला तो अघोरी उपाय मिळाला होता. त्यांनी सांगितलं ते आम्ही केलं. त्यांच्या सर्व अघोरी विधींना पूर्ण केल्यावर माझ्या आयुष्यात ही भरभराट आली.” 

“मग वहिनीचा मृत्यू? तो कसा झाला?” 

“त्याच विधींमुळे. त्या विधींमध्ये चूक झाली की मृत्यू निश्चित मिळतो.” 

“असं काय आहे त्या विधींमध्ये?” 

“नाही सांगू शकत. त्यावेळी ते पाहणंच फार भयानक होतं. इतकं की त्यांची आठवण करून वर्णनही करता येणार नाही. त्याचमुळे तर तिचा मृत्यू झाला― सलीलसारखा!”

“सलीलसारखा?” 

“होय. सलीलच्या देहाचं जे झालं आहे, तेच तिचंही झालं होतं. तुला आठवत असेल, तिच्या अंत्ययात्रेला तिचं शरीर पूर्णतः झाकलं होतं. कुणाला न दाखवता तसंच ते पेटवण्यात आलं होतं. त्यालाही डोकं नव्हतं. शाप फार भयानक आहे. त्या कर्मकांडात काही चूक झाली, तर शीर जातं पण तुमचा देह कुणालाही काबूत ठेवता येत नाही.

हे ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मंदार पुढे बोलत राहिला. 

“हे सर्व मी त्यावेळी अनुभवलं आहे. त्या तिथल्या लोकांनी तिचं शरीर मंत्रांनी बांधून ठेवलं होतं. तिच्या त्या मुंडहीन देहात त्यावेळी ताकद नव्हती. म्हणून ते कलेवर शक्य तितक्या लवकर जाळण्यात यश आलं. तोच प्रसंग आज पुन्हा घडला आहे. मला वाटतं, सलील असलाच काहीसा अघोरी प्रकार करण्यासाठी जंगलात गेला असावा. शेवटी प्रयत्न निष्फळ ठरून त्याला हे परिणाम भोगावे लागले असतील. आणि मला याचीच भीती आहे की सलील इथे यायला नको!”

“पण तो इकडे कसा येईल?” 

“माहीत नाही. पण त्यावेळी त्या लोकांनी असंच काहीसं सांगितल्याचं मला आठवतंय. तुम्ही मागितलेली श्रीमंती तुम्हांला मिळेल, पण मिळालेल्या गोष्टीसाठी काहीतरी गमवावं लागेल.” 

“मंदार, घाबरू नको. मी आहे. काही होणार नाही.” 

मंदारला दुःख आणि भीतीची भावना एकदाच झाली. तो म्हणतोय ते कितपत खरं होतं, याची मला कल्पना नव्हती. त्याच्यावर विश्वास ठेवावा असं माझ्या मनात एकवेळ आलं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. ना मी काही पाहिलेलं ना त्याने. बाकी सलीलच्या जाण्याचं दुःख वाटण्यापेक्षा त्याला भीती वाटत होती हे नवल होतं. यावेळी त्याला धीर देणं इतकंच मला शक्य होतं. 

रात्र झाली. जेवायची इच्छा नव्हती. पण कसेबसे दोन घास पोटात ढकलून आम्ही झोपलो. पूर्ण दिवस इतका जड होता, की सांगवत नव्हता. तरूण वयाचा मुलगा कायमचा निघून गेला होता. न मिळालेल्या गोष्टीचं दुःख हे कमवून गमावलेल्या गोष्टीहुन कमीच असतं. मंदारने सांगितलेली गोष्ट मी एकदा खरी जरी मानली तरी त्याने ऐश्वर्य भोगण्यासाठी आपला संसार गमावला होता. पण त्याने त्याचा मुलगा याच कारणाने गमावला हे मात्र याला धरून नव्हतं. कदाचित सलीलला एकवेळ मंदारसारखी, किंवा वहिनीसारखी लालसा झाली असावी. हे सर्व करायची त्याला काय गरज होती? हे सर्व त्याचंच तर होतं. प्रश्न काही माझं डोकं सोडायला तयार नव्हते. हे विचार भुंग्यासारखे डोक्यात फिरतच होते. 

रात्र दाट होत आली होती, तरी मला झोप मात्र येत नव्हती. रात्रीचे दोन वाजले होते. मला सिगारेटचं व्यसन होतं म्हणून सिगारेट पीत माझ्या खोलीत मी येरझाऱ्या घालत होतो. काही वेळाने तीही संपली. दोन तीन झाल्या. नंतर मलाच न पेटवण्याची इच्छा झाली. शांत झोपण्याचा प्रयत्न करावा तर मोर्चरीमध्ये पाहिलेलं सलीलचं डोकं डोळ्यांपुढे येत होतं. आणि जागं राहिलं तर मघासारखे भलतेसलते विचार येत होते. दुःख पाठ सोडायला तयार नव्हतं. आणि मन शांतता स्वीकारत नव्हतं. अखेर मी पलंगावर तसंच बसून राहण्याचा निर्णय घेतला. वेळाने शरीर टेकून आपोआप झोप येईल या आशेने मी तसाच बसून राहिलो. 

अल्पसा वेळ गेला. अगदी अडीचंच वाजले असतील. खालून कसलातरी आवाज येत होता. कोणतरी धडपडत होतं. माझ्या डोळ्यांवर अंशतः झोप आली होती. पण कसला आवाज होत आहे, हे पाहण्यासाठी मी पलंग सोडला. 

खोलीच्या बाहेर आलो. आवाज स्पष्ट होत गेला. मंदारचाच आवाज होता. तो मलाच बोलवत होता. मी झपाझप पावलं टाकत पायऱ्यांपर्यंत आलो. समोर पाहतो, तोच माझ्या पायांखालची जमीन सरकली. मला विश्वासच बसत नव्हता. मी काय पाहत आहे, हेच मला कळत नव्हतं. मंदारच्या हाका तेवढ्या मला भानावर आणत होत्या. समोर पाहूनच माझा थरकाप उडाला होता.

दरवाजा उघडा होता. आणि त्याच जागी मंदार जमिनीवर आडवा पडला होता. त्याच्या अंगावर डोकं नसलेलं एक शरीर बसलं होतं. दोघांची झटापट सुरू होती. मंदार मदतीसाठी मला बोलावत होता. हा शिरविरहित देह दुसऱ्या कुणाचा नसून सलीलचाच होता. त्याच्या अंगावर सलीलचे कपडे होते. शरीरयष्टी, कपडे, घातलेले बूट, हातातील घड्याळ सर्वकाही सलीलचं होतं. नव्हतं, ते केवळ शीर– डोकं– मुंडकं! 

पहिल्यांदा हा प्रसंग बघताना मी धजावलोच नाही. भीती काय असते, हे मी पहिल्यांदा अनुभवलं. मला माझं मन भीतीचं बंधन घालत होतं. पण मंदारची अवस्था पाहून मला त्याची मदतही करायची होती. नाहीतर माझ्यादेखत मंदारही जीवानिशी जाणार होता. मी मनाचा हिय्या केला. आणि पुढे झालो. मंदार भीतीने कासावीस झाला होता. सलीलचं शरीर मंदारला सोडायला तयार नव्हतं. मंदार संध्याकाळी का घाबरला होता, याच उत्तर माझ्यासमोर होतं. 

मी एकेक पाऊल पुढे झालो. त्या रक्ताने माखलेल्या देहाची मंदारप्रमाणे मलाही भीती बसली. पण मी जर वेळ गमावला असता तर मंदार माझ्यापुढे मारला गेला असता. 

शेवटी माझी ही भीती खरी ठरली. मला मंदारजवळ जायला उशीर झाला होता. सलीलच्या शरीराने मंदारच्या देहाची विटंबना केलीच. दोन्ही हातांनी मंदारचं डोकं त्याने कानांच्या बाजूने पकडलं आणि आपल्या सर्वशक्तीने खेचून मंदारचं डोकं धडाहून वेगळं केलं. सर्व घरात रक्ताचे मोठमोठे कारंजे उडाले. घर रक्ताने रंगून गेलं. रक्ताचा एक जाडसर लाल रंगाचा लोट मंदारच्या शरीराभोवती पसरू लागला. 

त्या मुंडहीन देहाने मंदारचं डोकं आपल्या दोन्ही हातांत एखादा ऐवज पकडावा त्या पद्धतीने ठेवलं. सलीलचा तो भयानक देह मंदारच्या मृतदेहावरून उठला. दरवाजा उघडाच होता. न माहित कसे, पण मंदारचं डोकं घेऊन सलीलचं ते शीर नसलेलं शरीर घरातून पळून गेलं. आणि हा सर्व प्रकार मी केवळ डोळ्यांनी पाहत राहिलो. मंदारचं रक्ताने माखलेलं शरीर तसंच पडून राहिलं. मी घडलेल्या एकेक सेकंदाचा हिशेब लावू लागलो. स्वप्नवत वाटावं असं काहीतरी मी प्रत्यक्षात घडताना पाहिलं होतं. 

मला उशीर झाला होता. कदाचित मी मंदारला वाचवू शकलो असतो. मला केवळ त्या सलीलच्या देहाचा प्रतिकार करायचा होता. मंदार आणि मी दोघे मिळून हे करू शकलो असतो. पण मलाच उशीर झाला होता. 

रडावं की काय करावं, मला काहीच सुचत नव्हतं. मी शांतपणे मंदारच्या शरीराच्या बाजूला बसलो. आपल्या चुकीचा परिणाम मला समोर दिसत होता. मनात पश्चात्ताप झाला होता. माझे डोळे नकळत पाणावले. मी एकाच दिवसात दोन नाती गमावली होती. दोन्ही मृतदेह माझ्या समोर होते. मी तसाच अशांत अस्थिर मनाने रडत बसलो. घरात दुसरं कुणीही नव्हतं. त्यामुळे पुढे काय करावं, याचा मला प्रश्न पडला. कुणाला मदतीला बोलवावं तर अशा गोष्टींवर कुणाचा विश्वासही बसणार नाही, असा प्रसंग घडला होता. 

मी असाच हतबल होऊन बसलो होतो. तोच मंदारचं शरीर हलू लागलं. मी सावध झालो. त्याच्या शरीरात शक्ती येऊ लागली. मला भीतीने दरदरून घाम फुटला. मंदारवर नुकताच गुदरलेला प्रसंग माझ्यावरच पुन्हा येतो, की काय अशी मला शंका आली. मंदारचं शरीर उठून बसलं. मी लगेच मागे सरकलो. त्या शरीराने माझा अंदाज घेतला. त्या मुंडहीन, रक्तरंजित शरीराने माझ्यावर एक झेप घेतली. मला पळण्याचा अवकाशही मिळाला नाही. त्याने मला धरलं. मी सुटण्याचा प्रयत्न केला पण त्या असिमीत शक्तीपुढे माझी मानवी शक्ती कमी पडू लागली. जो प्रसंग सलीलवर, मग मंदारवर आला, तोच माझ्यावर येणार याची मला खात्री झाली. 

जीव कुणाला प्रिय नसतो? यासाठीच मी स्वतःचा बचाव करू लागलो. पण मला मंदारच्या शरीराने धरून ठेवलं. मी धडपडू लागलो, हात पाय मारू लागलो, परंतु माझे सर्व प्रयत्न पोकळ होते. माझी हालचाल मंदारच्या शरीराला प्रतिकार करतेय अशी जाणीव होताच त्याने आपला जोर अधिक वाढवला. 

आमचे दोन्ही देह जमिनीवर आडवे झाले होते. मी शक्य तितकी चपळता वापरत होतो. पण सर्वकाही अर्थशून्य होतं. त्या मृतदेहाने माझ्यावर पूर्णपणे जम बसवला होता. आता तर त्याने आपल्या दोन्ही पायांना माझ्या खांद्यावर टाकलं होतं. आणि मांड्यांच्या मध्ये माझं डोकं धरून ठेवलं होतं. मला काळ पुढे दिसत होता. सलीलच्या देहाप्रमाणे, मंदारचा देहही माझं डोकं धडापासून तोडणार आणि या घरातून पळ काढणार. त्याने माझं डोकं ओढायला सुरुवात केली. मी आजूबाजूला काही मिळतं का ते नजरेने शोधू लागलो. जवळच एक शोपीसचा वास होता. मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मंदारच्या पूर्ण शरीराचं ओझं माझ्या अंगावर होतं. तरीही कसाबसा मी त्या वासजवळ पोचलो. स्वतःची मान वाचवण्यासाठी मी वास हातात घेऊन भिरकावला. मंदारचा देह माझ्यावरून बाजूला झाला. 

मी क्षणाचाही वेळ घालवला नाही. मी लगेच उठून घराबाहेर पडलो. पण त्या मंदारच्या अमानवी झालेल्या शरीरानेही क्षणांत माझा पाठलाग करायला सुरुवात केली. ही पळापळ बंगल्याच्या अंगणात सुरू होती. पळत असताना मी पुन्हा घरात जाऊन दार बंद करण्याचा विचार केला. तो मुंडहीन देह माझा पाठलाग करतच होता. मी बंगल्यात पाऊल टाकलं तेव्हा त्याच ठिकाणी सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यात माझा पाय सरकला. मी पाय घसरून पडलो. माझं पूर्ण शरीर रक्ताने माखलं. यात दार बंद करायचं राहून गेलं. त्या देहापासून सुटका करण्याचा माझा बेत तिथेच कोलमडून पडला. ते शरीर माझ्या मागावर लागलं होतं. मी काही विचार न करता समोर दिसेल तिथे पळू लागलो. मी लगोलग पायऱ्या चढल्या आणि बंगल्याच्या टेरेसवर गेलो. माझ्यामागे मंदार पाठलाग करतच होता. म्हटलं इथलं दार बंद केलं तर किमान सकाळपर्यंत तरी सुरक्षित राहू. म्हणून मी टेरेस पूर्णपणे बंद केलं. 

टेरेसवर येण्यासाठी एकच वाट होती. ती होती पायऱ्यांची. मी तीच बंद केली. त्यामुळे मी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला. पण शरीर मागे लागलं होतं. ते मार्ग काढीत तिथपर्यंत पोचलं. त्याने दारावर धक्के दिले. पण मी दाराला खेटून उभा होतो. त्यातून दार बंद असल्याने काही झालं नाही. दारावर दोन-चार धक्के पडले आणि त्यानंतर शांतता झाली. मी शांत झालो. हृदय जोरजोरात धडधडत होतं. इतकं की त्याचा आवाज मला कानांनी स्पष्ट ऐकू येत होता. दाराला टेकूनच मी थोडा दम खाल्ला. कपाळी आलेला घाम मी झटकला. आणि तसाच तिथे उभा राहिलो. 

पण… हा खेळ इतक्यात थांबला नव्हता. मंदारचं ते शरीर आता बंगल्याच्या खिडक्यांच्या ग्रील्स पकडून वर चढून आलं होतं. मी त्या देहाला चढताना पाहून माझी भीती आणखीन वाढली. मी टेरेसचं दार उघडलं आणि पुन्हा आलेल्या वाटेने परत मागे वळलो. 

या देहाच्या हातात माझं डोकं मला द्यायचं नव्हतं. मला ही पकडपकडी रात्रभर खेळायची नव्हती. याचा कायमचा अंत करायला हवा होता. कुठलान्-कुठला मार्ग शोधून हे शरीर मागे लागून येणारच होतं. याला नष्ट करणं हाच एक पर्याय होता. मी घरात इतरत्र कुठेही न जाता अडगळीच्या खोलीत गेलो. तिथे रॉकेलचे दोन मोठे कॅन ठेवले होते. कुठल्याही क्षणी तो देह खोलीत आला असता. वेळ घालवणं मला परवडलं नसतं. मी अडगळीच्या खोलीच्या बाहेरच ते दोन्ही कॅन ओतून दिले. त्याचवेळी तो देह खोलीबाहेर आला. त्या इंधनावर पाय पडताच तो देह सरकून खाली आडवा झाला. मंदारचा देह माझ्याजवळ आला असता तर यावेळी सुटणं मला अशक्य होतं. तोच एक क्षण होता. 

ऐनवेळी अडगळीच्या खोलीत माचिसही नव्हती. 

मी माझ्या कपड्यांचे खिसे चाचपडून पाहिले. 

एका खिशात माझा सिगारेटसाठी ठेवलेला लायटर होता. मी तो पेटवला. 

समोर मंदारचं शरीर तिकडे पडलं होतं. 

ते उठणार तितक्यात मी तो पेटवलेला लायटर त्या रॉकेलच्या तळ्यात फेकून दिला. 

आगीचा एक मोठा भडका उडाला. अडगळीच्या खोलीतील काही वस्तूही जळून गेल्या.

 आग त्या मुंडहीन देहाला लागली. आगीचा स्पर्श होताच, तो देह निष्काम झाला. त्याची सर्व शक्ती गळून पडली. तो देह धडधडून पेटू लागला. 

खोलीच्या कोपऱ्यात बसून मी ही आग पाहत बसलो होतो. नुकत्याच झालेल्या मंदारच्या मृत्यूनंतर त्याच्या अर्ध्या मुर्ध्या शरीराला, शीर नसलेल्या देहाला मी अशाप्रकारे अग्नी दिला.

Leave a Reply