अनुभव – आकाश शिंदे

माझा मावस मामा, आता फारसे कुणाशी बोलत नाही. फार क्वचितच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पूर्वीचा हसतमुख, उत्साही माणूस आता गप्पगप्प असतो. त्याच्या या बदलामागे एक कारण आहे – त्या रात्री घडलेला अनुभव… जो त्याच्या आयुष्याचा प्रवाहच बदलून गेला. आमचं गाव थोडंसं आडवळणाचं. वस्ती थोडी, लोक पारंपरिक, आणि आसपास निसर्ग – कधी शांत, तर कधी गूढतेने भारलेला. आमच्या कुटुंबाची जमीन गावाच्या दुसऱ्या टोकाला आहे – आणि तिथे एक कॅनल पलीकडची विहीर आहे. ती विहीर पाच भावांनी मिळून बांधलेली – त्यामुळे विभागून आहे.. प्रत्येक भाऊ सोयीनुसार ती वापरायचा.. त्या दिवशी मामाची पाळी होती. जेवण आटोपून तो शेताला पाणी द्यायला निघाला. त्या रात्री चंद्र प्रकाश ही जेमतेम होता. करण गडद ढग दाटून आले होते.. अधून मधून चंद्र नजरेस पडत होता. हवा थोडी गारसर होती.

मामा टॉर्च घेऊन निघाला. त्याचा क्रम ठरलेला होता – मोटार चालू करायची, पाणी सोडायचं, 1 तास थांबायचं आणि मग मोटार बंद करून घरी परत यायचं. विहीरी ची मोटर चालू करायची असेल तर कॅनल पलीकडे पुलावरून जावे लागत असे. तसे तो चालत दुसऱ्या बाजूला गेला आणि मोटार सुरु करून पुन्हा शेतात आला. सगळं नेहमीसारखं होतं. शेताला पाणी देत असताना काही वेळातच पाण्याचा प्रवाह कमी झाला. आणि हळू हळू करत पाणी यायचं थांबलं. मामाला कळलं की मोटार बंद झालीये. तसे तो परत पूल ओलांडून विहिरीकडे गेला. लाईट चालू होते, वायर नीट होती. मोटार बंद पडायचे काही कारण दिसत नव्हतं. त्याने बटन दाबून मोटार सुरु केली आणि पुन्हा शेतात आला. आवघी 10 मिनिट झाली असतील पुन्हा मोटार बंद झाली. पाणी थांबले. तो पुन्हा गेला आणि मोटार चालू करून परत आला. पण पुन्हा तेच. तिसऱ्यांदा मोटार बंद झाली. आता त्याची चिडचिड होऊ लागली. 

त्याने जाऊन प्लग काढला, संपूर्ण वायर तपासली. पाईप पहिला. पण त्याला मोटार बंद पडायचं कारण कळतं नव्हतं. सगळं बघून झाल्यावर त्याने पुन्हा एकदा मोटार सुरु केली आणि शेतात पाणी द्यायला आला. पण काही मिनिटात पुन्हा तेच. आता मात्र त्याला खूप राग आला. नक्कीच कोणीतरी आपली मस्करी करतेय आणि मोटार च बटण बंद करून पळून जातय असं वाटल. या वेळेस तो तावातावात निघाला. पण जेव्हा तो त्या विहिरीजवळ पोहोचला तेव्हा तिकडचे भयाण दृष्य पाहतच राहिला. मोटार च्या बटणाजवळ एक तरुण मुलगी बसली होती. हुंदके देत रडत होती. त्या अंधाऱ्या रात्री तिच्या रडण्याचा तो आवाज मनात धडकी भरवत होता. त्याने घाबरतच तिच्या बाजूला टॉर्च चा प्रकाश नेला आणि त्याच प्रकाशात तिचं भयाण रूप दिसलं. संपूर्ण ओली चिंब, केसांतून पाणी गळत होतं. चेहरा पांढरा पडला होता. त्याने थरथरत्या हाताने तिच्यावर टॉर्च फिरवली आणि ती जबडा विस्फारत त्याच्याकडे पाहून एक विचित्र आणि किळसवाण्या आवाजात पाहून ओरडू लागली.

तिचं ते भेसूर आवाजात रडणं ओरडणं ऐकून त्यांच्या हातातून टॉर्च खाली पडली. काही न पाहता, मागे वळून धावत सुटला. काट्याकुट्यांतून तो पळत गेला. फक्त पायातली वेदना नाही जाणवली, कारण मन सुन्न झालं होतं. तो धावत धावत घरी आला. आईने दरवाजा उघडला… आणि मामा थेट अंगावर पांघरूण घेऊन अंथरुणात पडला. कोणाशी काहीही न बोलता. सकाळी सुद्धा ओरडतच उठला. त्याने त्याचा अनुभव सांगितला. त्याच्या आवाजात भीती तर होतीच पण त्याच सोबत एक वेगळा भाव होता. कारण मामा ने तिला ओळखले होते. ती गावातलीच एक मुलगी होती पण 5 वर्षांपूर्वी मरण पावली होती. काही वर्षांपूर्वी तिचं एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण झालं होतं. पण तिच्या भावाला हे समजल्यावर त्याने तीव्र संतापात तिला घराबाहेर ओढलं. गावकऱ्यांसमोर तो तिला अमानुष पणे मारहाण करू लागला.. 

ती गयावया करू लागली, सुटकेची भीक मागू लागली पण तो थांबत नव्हता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती धावत सुटली आणि शेतात आली. तो ही तिच्या मागे येउन तिला मारहाण करत राहिला. एव्हाना संपूर्ण गाव गोळा झाले होते पण तिच्या मदतीला एक ही गावकरी आला नाही. रागाच्या भारत मारहाण करत राहिल्याने त्यातच तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला बरीच वर्ष उलटली आहेत. पण अगदी आजही ती विहिरी जवळ रडताना दिसते. बऱ्याच जणांनी तिला पाहिलं आहे. कदाचित तिला वाटत की गावकरी तिला या जाचातून वाचवतील पण तिच्या आत्म्याला हे ठाऊक नाही की या जगातून ती कधीच गेलीये. कधीही कुणी निष्पाप व्यक्ती वेदनांनी तडफडून मेला, तर त्याचं आक्रंदन या जगात कुठे ना कुठे खोलवर अडकतं. कधी विहिरीच्या पाण्यात, कधी झाडांच्या सावलीत, तर कधी एखाद्या पुलावर..

Leave a Reply