लॉक डाऊन मध्ये शहरातल्या लोकांना सगळ्यात जास्त एखाद्या गोष्टीची आठवण आली असेल तर ती म्हणजे त्यांचे गाव. इतरांप्रमाणे च खूप दिवस वाट पाहून आणि बऱ्याच तड जोडी करून आमच्या कुटुंबाला गावी जाण्यासाठी इ पास मिळाला. मुंबई शहरात कोरोना ने थैमान घातले होते म्हणून आम्ही काही महिने गावी जाऊन राहायचे ठरवले होते. पण आई ने मात्र सामानाची बांधाबांध अशी केली होती जसे आम्ही कायमचे तिथे राहायला जात आहोत. त्या सगळ्या बॅग्स घेऊन आम्ही कसे गावी आलो आमचे आम्हालाच माहीत. पहाटे आम्ही गावात पोहोचलो. माझे आजोबा लक्ष्मी मातेच्या देवळासमोर आमची वाट पाहत बसले होते. त्यांनी आमच्याकडचे काही समान घेतले आणि आम्ही सगळे घराच्या वाटेने चालू लागलो. काही मिनिटात च आम्ही घरी पोहोचलो. नियमाप्रमाणे आम्हाला १४ दिवस घरातून बाहेर निघता येणार नव्हते. तसा आदेश च गावच्या सरपंचा कडून मिळाला होता. 

दोन घर असल्यामुळे एका घरात आजी आजोबा राहायला लागले. म्हणजे ते आमच्या संपर्कात येणार नव्हते. आणि दुसरे घर जे थोडे मोठे आहे तिथे आम्ही राहायला लागलो. आजोबांनी आधीच जेवणाची व्यवस्था करून ठेवली होती. २-३ आठवड्यासाठी लागणारे सगळे सामान भरून ठेवले होते. ते १४ दिवस आम्ही घरातच राहिलो. तेव्हा मी आणि माझ्या बहिणी आशा आणि पलक वेळ घालवण्यासाठी काही नाही करतच राहायचो. कधी लुडो, कधी लपाछपी तर कधी टिक टॉक वर शॉर्ट्स बनवायचो. हो तेव्हा टिक टॉक बेन झाले नव्हते. जसे क्वारंटाईन अवधी संपला तसे आम्ही बाहेर फिरायला मोकळे झालो. असेच एके दिवशी मोबाईल वर गेम खेळत बसलो होतो. तितक्यात एका अनोळखी नंबर वरून कॉल आला. एका क्षणात आवाज ओळखला. गावातली माझ्या बालपणीची मैत्रीण वाणी बोलत होती. बऱ्याच दिवसांनी बोलणं होत असल्याने आमच्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात ती म्हणाली ” उद्या तारावर जाऊया का..?” मी कसलाही विचार न करता पटकन म्हणाले “नक्की जाऊ.. खूप दिवस झाले मला तिथे जाऊन..”. तसे ती म्हणाली “ठीक आहे.. उद्या संध्याकाळी ४ ला तारा वर भेटू. “. आमचे बोलणे झाले आणि मी फोन ठेवला. 

आमच्या गावात तारा ही एक मोठी जागा आहे जिथे विशाल झाडांची रास आहे. त्याच भागात एक मोठा खड्डा आहे जिथे पावसाळ्यात पाणी भरत आणि एक छोटा सा तलाव तयार होतो. ती जागा आमच्या घराच्या मागच्या बाजूला आहे, अगदी काही अंतरावर च. आमचं लहान पण तिथेच गेलं. आजी आजोबा आम्हाला त्या ठिकाणी अजिबात जाऊ द्यायचे नाही पण आम्हाला ती जागा इतकी आवडायची की आम्ही दोघं न सांगता गप चूप तिथे खेळायला जायचो. गावातली लोक त्या जागे बद्दल वाईट साईट बोलत असत. कोणी म्हणे की तिथे अतृप्त आत्म्याचा वास आहे, तर कोणी सांगायचे की ती जागाच झपाटलेली आहे. पण आम्हाला तसे कधीही जाणवले नव्हते. त्या रात्री अंथरुणात पडले आणि विचार आला की उद्या तारावर जायचे आहे, वाणी भेटणार आहे. मनातल्या मनात खुश होते आणि त्यामुळेच की काय झोप लागत नव्हती. तरीही डोळे मिटले आणि लहानपणी चे आनंदात घालवलेले क्षण आठवू लागले. त्याच गोड आठवणीत झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळ झाली. माझ्या लहान बहिणींना मी आजच्या प्लॅन बद्दल सांगितले तसे त्या माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू लागल्या. मी सुरुवातीला त्यांना नाही म्हणाले पण नंतर त्याचे उदास झालेले चेहरे बघून त्यांना होकार दिला. 

दुपारी साधारण ४ ला मी, आशा आणि पलक आम्ही तिघी घराच्या मागच्या दरवाज्यातून कोणालाही न कळवता हळूच बाहेर पडलो. आणि ठरल्याप्रमाणे ताराकडे जाण्याच्या वाटेला लागलो. ५ मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. वाणी तिथे माझी वाट पाहत एका झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसली होती. तिला पाहून मी खूप खूष झाले आणि बालपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरंगू लागल्या. गप्पा मध्ये कधी वेळ गेला समजलेच नाही. संध्याकाळचे ६ वाजले आणि अंधार पडायला सुरुवात झाली. तेव्हा वाणी म्हणाली की आपण सगळे जमलेच आहोत तर चला सगळे मिळून लपा छपी खेळू. माझ्या बहिणी खूप खुश झाल्या कारण गेले २ तास आमच्या गप्पा ऐकून त्या जरा वैताग ल्याच होत्या. कोणावर राज्य हे ठरवण्यासाठी एकमेकांच्या हातावर हात ठेऊन सुटलो. वाणी वर राज्य आले. तिने एका झाडाकडे पाहत डोळे मिटले आणि उलट आकडे मोजू लागली. तसे मी आणि माझ्या बहिणी पटापट लपायला धावलो. पलक मात्र माझ्या मागे मागेच येत होती म्हणून मी तिला ओरडुन दुसरी कडे लपायला सांगितले. जसे ती दुसरी कडे गेली मी जवळच्या झाडावर जाऊन लपले. काही मिनिट झाली पण वाणी ने अजूनही मला शोधले नव्हते.

हळु हळु अंधार गडद होऊ लागला होता. अधून मधून थंड हवेचा झोत अंगाला स्पर्शून जायचा आणि अंगावर शहारे यायचे. तितक्यात माझे लक्ष समोरच्या एका विशाल पिंपळाच्या झाडाकडे गेले कारण मला तिथून एक वेगळीच सळसळ ऐकू आली. माझ्या अंदाजा प्रमाणे माझ्या लहान बहिणी त्या झाडावर चढणे शक्य नव्हते. म्हणून मी डोके वर करून तिथे पाहू लागले. आणि समोरचे दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. काळीज भीती ने धड धडू लागले. समोर हुबेहूब माझ्या सारखीच दिसणारी एक मुलगी झाडावर बसली होती. अगदी माझ्या सारखीच. आमच्यात इतके साम्य कसे असू शकते हेच कळत नव्हते. फक्त एक भयानक फरक होता तो म्हणजे तिचे ओठ दोन्ही बाजूने कापले आहेत असे वाटत होते, आणि त्यातून रक्त ओघळत तिच्या कपड्यांवर पडत होत. दुसरी विचित्र गोष्ट म्हणजे तिची नजर माझ्यावरच खिळली होती. मी ओरडायचा प्रयत्न केला पण माझे तोंडच उघडतं नव्हते. एके क्षणी वाटले की तिच्या फक्त नजरेने तिने मला जखडून ठेवलेय. तितक्यात तिने एक हात वर केला आणि मला तिच्याकडे येण्यासाठी खुणावू लागली. 

मी हा सगळा भयाण प्रकार पाहून इतके घाबरले की होते त्या जागेवरून खाली उडी मारली आणि ओरडतच घराच्या दिशेने धावत सुटले. पायला काही तरी लागले होते, त्यातून रक्त येत होते पण या सगळ्या हून जास्त मी इतकी घाबरले होते त्याकडे लक्ष ही दिले नाही. माझे असे ओरडणे ऐकून वाणी, पलक आणि आशा ही माझ्या मागून धावू लागल्या. घरात पोहोचले तरीही हृदयाची धड धड काही कमी होत नव्हती. त्या दिवशी मला कळले की खरी भीती काय असते. माझ्या मागून त्या तिघीही घरात आल्या. वाणी मला विचारू लागली “काय झाले सिम्मी, तू एवढी का घाबरली आहेस आणि अशी ओरडत धावत का आलीस..?”. मला खरी गोष्ट सांगायची नव्हती कारण मी जर जे घडले ते सांगितले असते तर सगळे खूप घाबरून गेले असते. म्हणून वेळ मारून नेण्यासाठी मी म्हणाले “एक साप दिसला मला, म्हणून मी घाबरून पळाले..”. हे ऐकून तिथेच उभे असलेले आई आणि बाबा माझ्यावर हसू लागले. मी ही जरा हसले आणि दाखवले की सगळे ठीक आहे. पण मनातली भीती तसूभर ही कमी झाली नव्हती. त्या रात्री जेवणं आटोपली. मी आणि पलक गच्चीवर शतपावली करायला आलो. चालता चालता पलक म्हणाली ” उद्याही आपण ता जाऊया का..? खूप सुंदर जागा आहे ती..”. हे ऐकून मला घाम फुटला, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. 

मी जरा घाबरतच तिला म्हणाले “उद्या नको.. परत कधी तरी जाऊ..”. मी तिला हे सांगत च होते तितक्यात आई ने तिला हाक दिली. काही तरी कामासाठी तिला खाली बोलावले. मी गच्चीवर एकटीच शतपावली करत होते. तितक्यात माझी नजर तारावर गेली. ती जागा आमच्या घराच्या गच्चीवरून सहज दिसायची. त्या वेळी मला पहिल्यांदा जाणवले की दिवसा ती जागा जितकी सुंदर दिसते, रात्री ती जागा तितकीच भयानक दिसत होती. पुन्हा मला त्या जागेने जणू मंत्रमुग्ध केल्यासारखे वाटू लागले. मला ही जाणीव होताच मी खाली जायला निघाले. मी जिन्या जवळ पोहोचले तितक्यात मला छताच्या एका कोपऱ्यातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. जसे एक वस्तू दुसऱ्यावर घासली जात आहे. तसे मी नकळत वळले आणि त्या दिशेने चालत जाऊ लागले. त्या कठड्या जवळ उभी राहून खाली डोकावून पहिले. आणि तिथले दृश्य पाहून जणू शरीरातला सगळा प्राण च निघून गेला. भिंतीला लागून असलेल्या एका पाईप वरून एक बाई वर चढत येत होती. सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे तिचे ओठ ही तसेच चिरले होते. ती माझ्या कडे बघतच वर चढत होती. हे सगळे दृश्य पाहून मी रडत ओरडत धावत सुटले आणि जिन्यावरून खाली आले. 

सरळ खोलीत जाऊन बिछान्यावर पडले आणि अंगावर घोंगडी घेतली. तितक्यात घरातले सगळे माझ्या खोलीत आले आणि काय झाले विचारू लागले. पण मला त्यांना सगळे खरे सांगायची हिम्मत होत नव्हती. काही वेळानंतर मी शांत झाले आणि घडलेला सगळं प्रसंग एक एक करत सांगितला. हे सगळे ऐकल्यावर आजोबांना कळून चुकले ही हा काय प्रकार आहे. त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळात तारावर काळी विद्या आणि इतर विधी केले जायचे. तिथे खूप जणांचे बळी दिले होते. आणि गावातले लोक असे ही म्हणतात की तिथे अश्या एका आत्म्याचा वास आहे जी लोकांचे हुबेहूब रूप घेते, जी त्यांना दिसते ती व्यक्ती थोड्याच दिवसात.. आजोबा पुढे काही बोलले नाहीत पण मी मात्र प्रचंड घाबरले होते कारण मी तिला पाहिले होते. सगळे मला घेरून उभे होते आणि समजावत होते की त्या जागेवर पुन्हा जाऊ नकोस, कितीदा समजावले की ती जागा चांगली नाही. तितक्यात मी स्वतःलाच दरवाज्या आडून डोकावताना पाहिले..

This Post Has One Comment

Leave a Reply