अनुभव – भार्गव धवडे

मी सातवी-आठवीत होतो, तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे. ती एक शांत, साधारण रात्र होती, आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत झोपलो होतो. आमचं घर ग्राऊंड फ्लोअरला होतं. घरासमोर खूप मोकळं रान होतं. मध्यरात्री अचानकच माझी झोपमोड झाली. काय कारण होतं ते समजलं नाही, पण गडबड जाणवत होती. त्याचवेळी माझ्या वडिलांचीही झोपमोड झाली होती. त्यांना ही काही विचित्र वाटत असावं, कारण ते माझ्या सारखं बिछान्यावर उठून बसले होते. आमचं घर एका जुन्या बिल्डिंगमध्ये होतं, जी मुख्य रस्त्यापासून थोडी आत, शांत ठिकाणी होती. गाढ झोपेतून उठल्यामुळे भानावर यायला मला वेळ लागला. आधी आम्हाला वाटलं की कदाचित मांजरींची भांडणं असतील, पण हळूहळू तो आवाज जवळ येऊ लागला. जास्त स्पष्ट ऐकू यायला लागला. आवाजात अस्वस्थ करणारा होता.

नंतर पावलांचा आवाज येऊ लागला आणि त्याच सोबत पैंजणांचा. वडिलांनी खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काही दिसलं नाही. आमचं घर ग्रील लावलेल्या खिडक्यांसह होतं, पण त्या दिवशी खिडकी उघडी राहिली होती, कारण आम्हाला रात्री थोडा गार वारा हवासा वाटत होता. आवाज जसजसा जवळ येऊ लागला, तसतसं आम्हा दोघांची धडधड वाढली. खिडकीसमोरचं मोकळं रान एखाद्या अंधाऱ्या दरडीसारखं वाटत होतं, आणि त्या आवाजाच्या दिशेनं पाहायची ही माझी हिम्मत होत नव्हती. माझ्या वडिलांनी बाहेरून ओरडून विचारलं, “कोण आहे..?” पण उत्तर काहीच मिळालं नाही. उलट, आवाज आता खिडकीच्या अगदी जवळ आला, आणि पावलांचे आवाज अजून स्पष्ट ऐकू येऊ लागले. त्या क्षणी मला असं वाटलं की खिडकीबाहेरच कोणी उभं आहे. माझे वडीलही आता घाबरले होते, पण ते काही दाखवत नव्हते. 

मी तर संपूर्ण बधीर झाल्यासारखा पांघरुणात घुसलो होतो. त्या आवाजानं काही वेळानं मागे जाण्यास सुरुवात केली, पण थांबला नाही. आम्ही दोघंही खूप गोंधळलो होतो आणि काहीतरी विचित्र घडतंय, याची जाणीव होत होती. हळू हळू करत तो आवाज दूर निघून गेला. सकाळी वडिलांनी वॉचमनला विचारलं, “रात्री कोणी तरी फिरत होतं का? एखादी बाई पैंणाचा आवाज ऐकू येत होता..” वॉचमननं थंडपणे उत्तर दिलं, “नाही साहेब, मी तर रात्री इथेच होतो. काहीच आवाज ऐकला नाही.” त्याच्या या उत्तरानं मात्र आमच्या काळजाचा ठोका चुकला. मग हा आवाज नक्की कोणाचा होता? ती कोण होती, जी आमच्या खिडकीजवळ येउन उभी राहिली होती.? त्या दिवसापासून आम्ही खिडकी कायम बंद ठेवायचं ठरवलं. तो अनुभव अजूनही आठवतो तेव्हा अंगावर काटा येतो. तो आवाज नक्की काय होता, हे कधीच कळलं नाही.

Leave a Reply