अनुभव – गुणवंत सोनार

हा प्रसंग माझ्या काकांसोबत ९० च्या दशकात घडला होता. माझे काका घड्याळ घड्याळाच्या फॅक्टरीत कामाला होते. ते रोज सायकल वरून प्रवास करायचे. कधी कधी काम जास्त असेल की मग नाईट शिफ्ट म्हणजे सेकंड शिफ्ट करून मग घरी यायला निघायचे. त्यांना कामाचा ताण खूप असायचा. आणि बहुतेक वेळा त्यांना घरी यायला उशीर व्हायचा. अश्याच एके रात्री त्यांना रोजच्या पेक्षा बराच उशीर झाला. काम आटोपे पर्यंत १२.३० हून गेले. फॅक्टरी च्या वॉचमन ने काकांना सांगितले की बरीच रात्र झाली आहे, आतल्या रस्त्याने जाऊ नका. आपल्या नेहमीच्या रस्त्याने जा, १५-२० मिनिट जास्त वेळ लागेल पण ते परवडेल. उगाच लवकर घरी जायला म्हणून आतला शॉर्ट कट निवडू नका. काकांनी त्याला हो म्हणत सायकल काढली आणि घरी जाण्यास निघाले. त्यांच्या सोबत त्यांचे काही सहकारी मित्र होते पण फक्त काही अंतरापर्यंत. नंतर ते आप आपल्या मार्गाने पुढे निघून गेले. काकांचे घर बरेच लांब असल्यामुळे ते एकटेच रस्त्याने जात होते. अर्ध्या तासानंतर त्यांना तो आतला शॉर्टकट रस्ता लागला. त्या मार्गाने सहसा कोणी जात नसे हे काकांना माहीत होते. आणि त्यात वॉचमन ने ही तिथून जाऊ नका असे बजावले होते. पण त्या दिवशी जरा जास्तच उशीर झाल्यामुळे आजच्या दिवस आतल्या रस्त्याने जाऊ असा विचार करून त्यांनी सायकल त्या रस्त्याला घेतली. 

त्यांना माहीत नव्हते की हा एक निर्णय किती चुकीचा ठरणार होता. ते अतिशय वेगात सायकल चालवत होते. याआधी काही वेळा ते या रस्त्याने आले होते पण ते दिवसा. रात्री येण्याचा हा पहिलाच योग होता. वाऱ्याने जोर धरायला सुरुवात केली होती. त्या भागात वस्ती असून नसल्यासारखी. अगदी मोजकी घर होती पण ती रस्त्यापासून खूप आत होती. स्ट्रीट लाईट ही बऱ्याच अंतरावर होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती त्यामुळे रस्ता अजूनच भयाण वाटायचा. तितक्यात त्यांना रस्त्याच्या मधोमध एक पांढर कापड पडलेलं दिसलं. तसे त्यांनी सायकल चा वेग कमी केला. त्यांना कळत नव्हत ही मधोमध अस काय पडलंय. ते जस जसे जवळ येऊ लागले त्यांना जाणवले की नुसते कापड नाही तर त्या खाली काही तरी आहे, कदाचित कोणी तरी बसलय. नुसत्या कल्पनेने अंगावर शहारा उमटून गेला. वारा असल्यामुळे ते कापड विचित्र हेलकावे होते. त्यांनी न थांबता हळूच सायकल बाजूने काढण्याचा प्रयत्न केला तसे वाऱ्याचा झोत आला आणि ते कापड उडाले. पण त्या खाली काहीच नव्हते. काकांना जरा विचित्र च वाटलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते पुढे निघाले. वातावरणातला गारवा हळु हळू वाढत चालला होता. कधी एकदाचे घरी पोहोचतो असे त्यांना झाले होते. काही अंतर पुढे आले असतील तोच त्यांना रस्त्याकडे ला एक पंचविशीत ली तरुणी हात करताना दिसली.. काकांनी विचार केला, एवढ्या रात्री या रस्त्यावर ही एकटी कशी? 

ती तरुणी काकांना बोलावत होती. काकांनी तिच्याकडे पहिल्या वर त्यांना जाणवले की ती मदत मागते य. म्हणून काकांनी सायकल तिच्याकडे वळवली व विचारपूस करू लागले. तेव्हा त्या तरूणीने विनंती केली आणि म्हणाली “काका, माझे घर जवळच आहे, मला सोडाल का..? मी मागे सायकल वर बसते..”  काकांनी विचार केला, एवढ्या रात्री या पोरीला आता दुसरं कोण मदत करणार?. हिला असं एकट सोडून जाणं बर नाही. त्यांनी ठीक आहे म्हंटल तसे ती तरुणी सायकलच्या मागच्या सीटवर बसली. काकांनी सायकल चालवायला सुरुवात केली. काही मिनिट त्यांच्यात काहीच संवाद झाला नाही. नंतर काकांनी तिला तिचे नाव आणि ती कुठे राहते या बद्दल विचारले. पण तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. अचानक एके क्षणी सायकल चे पॅडल इतके जड झाले जसे मागे १०० किलो चे वजन ठेवले आहे. अचानक सायकल जड झाली. ते पॅडल मारत होते, पण सायकल पुढे जाईना. मागे वळून बघायची त्यांची हिम्मत झाली नाही कारण त्यांना कळून चुकले होते ही का प्रकार काही तरी वेगळाच आहे. त्यांनी हनुमंताचे नाव घेतले व पॅडल मारले. तोच झपकन सायकल हलकी होऊन वेग पकडला.. न राहवून त्यांनी मागे एक नजर फिरवली पण मागच्या सीट वर अथवा त्या अंधारलेल्या रस्त्यावर दूर दूर पर्यंत कोणीही नव्हत. त्यांनी सायकल चा वेग वाढवला. पुढच्या अर्ध्या तासात ते घरी येऊन पोहोचले. वेळीच हनुमंताचे नाव घेतल्यामुळे ते यातून सुखरूप सुटले होते.

Leave a Reply