लेखक – विनीत गायकवाड
आज वैभव भलताच खुश होता कारण त्याच्या ऑनलाइन चॅनेलने १ लाख सब्सक्रायबर्सचा पल्ला पार केला होता.
कितीतरी वर्षांच्या मेहनतीनंतर त्याला हे यश मिळालेले होते.
कॉलेजमधून ड्रॉपआउट होऊन त्याने फ्रीलान्स कोडरचं काम केलं, पण फार लवकर त्याला कळालं की कंटेंट क्रिएशनचं फ्युचर किती ब्राइट आहे.
लोकांना रोज नव नवीन काहीतरी हवं असतं.
जेवणासारखी ऑनलाइन कंटेंट कंझम्प्शनची भूक कधीच संपणारी नव्हती.
वैभवने तेव्हा ठरवलं की लोकांना चांगल्यापेक्षा वाईटाचं जास्त आकर्षण आहे.
म्हणून त्याने हॉरर थीम निवडत हॉरर स्टोरीचं ऑनलाइन चॅनेल सुरू केलं.
तो विविध लोकांकडून त्यांना आलेल्या पारलौकिक अनुभवांचे किस्से जमा करायचा आणि त्याचं कथेमध्ये रूपांतर करून ते आपल्या चॅनेलवर टाकायचा.
लॉकडाऊनमध्ये त्याच्या चॅनेलला खास वाव मिळाला.
आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
तो स्टोरीटेलर म्हणून इंटरनेटवर कमालीचा प्रसिद्ध झाला होता.
चॅनेलवरच्या कमाईने त्याचं राहणीमानदेखील सुधारलं होतं.
त्याच्या घरच्यांनाही त्याच्यावर कमालीचा अभिमान वाटत होता.
पण एक काळजी मात्र त्याच्या आईवडिलांना सतावत होती —
त्यांचा हा मुलगा आपल्या खोलीत दार लावून नेमकं काय करतो आहे?
यामागचं कारण असं की त्याच्या आईवडिलांनाही त्याने कधीच ही भनक लागू दिली नव्हती की तो असं कुठलंतरी चॅनेल चालवतो आहे.
आपला मुलगा ऑनलाइन काहीतरी काम करतोय असाच त्यांचा ठाम विश्वास होता.
शिवाय वैभवचा चेहरा किंवा त्याचं खरं नाव कुणीच पाहिलं नव्हतं, किंवा कुणाला माहितही नव्हतं.
नेमक्या त्या दिवशी वैभवने १ लाख सब्सक्रायबर्सचा पल्ला पार केला होता, तेव्हा त्याचे आईवडील गावी गेलेले होते.
अख्ख्या घरात तो एकटाच होता.
त्याने त्या रात्री पार्टी करायचं ठरवलं.
बिअर, चिकन, म्युझिक — सगळ्याची सोय त्याने केली होती.
पण ही एक सोलो पार्टी होती. वैभवने एकट्यानेच सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं.
त्याने ठरवलं की सेलिब्रेशन आपल्या सब्सक्रायबर्ससोबत करायचं.
त्याने लगेच ऑनलाइन सेशन सुरू केलं.
एकेक करत त्याचे सब्सक्रायबर्स जॉइन झाले.
वैभवने सगळ्यांना धन्यवाद दिले आणि काही निवडक सब्सक्रायबर्सना ऑनलाइन शॉपिंग गिफ्ट कूपन्सदेखील बक्षीस म्हणून दिले.
व्हिडिओचं क्लोजिंग मेसेज सुरू असतानाच अचानक त्याच्या घराची बेल वाजली.
“आता या वेळी कोण आलं?” असा तो पुटपुटला.
त्याने आपल्या ऑनलाइन सेशनवर सब्सक्रायबर्सना मेसेज टाकला –
“Guys! Hold on, someone at the door!”
त्याने हेडफोन काढला आणि दार उघडायला गेला.
डोअर-होलमधून पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं.
त्याने दार उघडलं.
तरीसुद्धा… बाहेर कोणीच नव्हतं.
त्याने कॉरिडॉरच्या उजव्या-डाव्या बाजूला पाहिलं.
तिथेही कोणी नव्हतं.
तो दार लावून पुन्हा आपल्या डेस्कवर आला.
त्याने हेडफोन लावले आणि सब्सक्रायबर्सचे मेसेज पाहिले.
खूप जणांनी “Girlfriend has arrived!” असं मिश्कील कमेंट टाकलं होतं.
वैभव हसला आणि त्याने उत्तर दिलं –
“I don’t have any GF.”
इतक्यात पुन्हा त्याच्या दाराची बेल वाजली.
वैभव पुन्हा उठला.
डोअर-होलमधून पाहिलं.
या वेळीही बाहेर कोणीच नव्हतं.
त्याने झटकन दार उघडलं —
पण… बाहेर पुन्हा कोणीच नव्हतं.
“कोण आहे रे!” एक शिवी हसडत तो ओरडला आणि दार लावून आतल्या खोलीत आला.
एका सब्सक्रायबरने चॅटवर मेसेज टाकला –
“What happened, Storyteller? Why are you not replying?”
वैभवने उत्तर दिलं –
“Someone is ringing my doorbell… कोणीतरी माझ्या घराची बेल वाजवतंय.”
त्या सब्सक्रायबरने लगेच रिप्लाय दिलं –
“Just like your Story Number 11.”
हे उत्तर पाहताच वैभवचा काळजाचा ठोका चुकला.
त्याला आपले सर्व किस्से तोंडपाठ होते.
स्टोरी नंबर 11 मध्ये त्याने एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घराची कथा सांगितली होती…
जिच्या घरी मध्यरात्री बेल वाजते,
आणि बेलच्या मागे दबा धरून उभा असतो खूनी.
तो तिच्यावर पाळत ठेवून शेवटी तिला निर्दयीपणे मारून टाकतो.
वैभवच्या मनात आता भीती संचारली होती.
बेल पुन्हा वाजते का, ह्याचीच तो आतुरतेने वाट पाहत होता.
पण बेल परत वाजली नाही.
वैभवने बिअरच्या कॅनमधून एक घोट घेतला आणि पुन्हा आपल्या सब्सक्रायबर्सशी बोलू लागला.
इतक्यात… त्याला घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.
तो एकदम आपल्या जागेवरून उठला.
त्याने हेडफोन काढले आणि हळूहळू घराच्या पुढच्या खोलीकडे जाऊ लागला.
त्याला चार-पाच लोकांची कुजबुज ऐकू आली.
त्याने पुढच्या खोलीकडे पाऊल टाकले…
आणि जागेवरच खिळून गेला.
त्याच्या समोर —
तो वेडा खूनी,
ती रक्त पिणारी म्हातारी,
तो अर्धा जळलेला चोर
आणि खून करणारा बाहुला —
हे सगळे उभे होते!
“आपण स्वप्न पाहतोय का काय…?” क्षणभर असा विचार त्याच्या मनात आला.
कारण ही सगळी पात्रं त्याच्या कथेमधली होती!
तो ताबडतोब मागे वळला आणि धावत आपल्या खोलीत परत आला.
त्याने दार आतून लावून घेतलं आणि थरथरत ऑनलाइन सेशनवर टाईप केलं –
“Help me! कोणीतरी माझ्या घरात शिरलं आहे!”
त्याने बेडरुमची खिडकी उघडली आणि मदतीसाठी ओरडू लागला.
पण त्याचं घर तिसाव्या मजल्यावर होतं.
तिथून खाली आवाज जाणं शक्यच नव्हतं.
वैभवने कसाबसा आपला फोन पाहिला.
त्याला लक्षात आलं की पार्टीच्या नादात त्याने फोन चार्जिंगला लावायचं विसरलं होतं.
त्याने घाईघाईने फोन चार्जिंगला लावला…
इतक्यात — घराची लाईट गेली!
आता वैभव पूर्णपणे घाबरून घामाघूम झाला होता.
त्याने बेडरूमच्या दाराच्या खालच्या फटीतून पाहिलं तर ते चारही जण बाहेरच उभे असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
तो कमालीचा घाबरलेला होता.
त्याच्या प्रत्येक कथेतील पात्रं आता त्याच्या डोक्यात गिरक्या घालू लागले होते.
सर्वात आधी,
प्रेमभंग झाल्यामुळे विक्षिप्त झालेला एक तरुण आपल्या प्रेयसीवर पाळत ठेवू लागतो.
राग आणि सूडाच्या भरात तो तिच्या पतीचा खून करतो आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं.
मात्र तुरुंगातून तो थेट वेड्यांच्या इस्पितळात हलवला जातो.
तिथूनही तो सुटतो… आणि परत आपल्या प्रेयसीच्या मागे लागतो.
एका रात्री ती घरी एकटी असताना, खिडकीपाशी सावल्यांमधून तिच्याकडे टक लावून बघणारा तो दिसतो…
आयुष्यभर तरुण राहण्याची आस जिच्या मनात धगधगत होती, अशी एक म्हातारी गावभरातील तरुण मुलींना भुरळ घालून आपल्या घरी बोलवते.
त्यांचा निर्दयी खून करून त्यांचे रक्त पिऊन ती स्वतःला तरुण ठेवते.
बाहेरून पाहता ती एक साधी, एकटी राहणारी बाई वाटते, पण रात्रीच्या अंधारात तिच्या घरातून सतत किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात…
एकदा चोरी करताना तो चोर कारखान्याच्या उकळत्या बॉयलरमध्ये पडतो.
त्याचं शरीर जळतं… आता तो फक्त रात्रीच बाहेर पडतो.
रस्त्याने जाणाऱ्यांवर अचानक हल्ला करून त्यांना ठार मारतो, आणि त्यांचे पैसे लुटतो.
सकाळी मात्र लोकांना फक्त रक्ताचे डाग आणि जळका वास एवढंच सापडतं…
खेळण्यांच्या कारखान्यात तयार झालेली एक बाहुली, ज्याच्या मशीनमध्ये बनताना काहीतरी गंभीर बिघाड झाला होता.
ती बाहुली ज्या मुलांच्या घरी गेली, तिथे काही दिवसांनी अनर्थ घडू लागला.
रात्री नुसतं बाहुलीचं हसू ऐकू यायचं…
आणि नंतर तीच बाहुली अचानक जिवंत होऊन लोकांवर हल्ला करायची.
सकाळी घरातल्या माणसांचे मृतदेह आणि कोपऱ्यात बसलेली रक्ताळलेली बाहुली एवढंच शिल्लक राहायचं…
या गोष्टींचा मारा सतत वैभवच्या मनावर होत होता.
काय करावं, काहीच त्याला सुचत नव्हतं.
इतक्यात — त्याच्या बेडरूमच्या दारावर ठकठक झाली.
“वैभव… अरे वैभव… आम्हाला पण येऊ दे ना तुझ्या पार्टीमध्ये!
तू आम्हाला बोलवायला विसरलास!”
वैभवने आवाज ओळखला —
हा आवाज त्या वेड्या खूनीचा होता!
“हो ना… आम्ही आमचं ड्रिंक घेऊन आलोय!”
असं ती रक्त पिणारी म्हातारी खडखडीत आवाजात म्हणाली.
“हो… मला तर काहीच पचत नाही… सगळं गळ्यातूनच खाली पडतं!”
असं अर्धा जळालेला चोर विकृत हास्य करत म्हणाला.
“आणि तुला तर माहितीच आहे… मी काही खात-पित नाही…
मी तर फक्त… अस्स्स्स्सं…”
खून करणारा बाहुला हसत म्हणाला.
त्याच्यासोबत बाकीच्याही पात्रांनी वेड्यासारखं हसायला सुरुवात केली.
वैभव आता नखशिखांत थरथरत होता.
“बाकीचे पण येणार होते… पण आम्हीच आलो.
कारण आम्हीच आहोत तुझे सर्वात जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळवणारे!”
“अरे वैभव… दार उघड ना रे!!!”
सगळी पात्रं एकदम एकत्र बोलू लागली.
त्यांचा आवाज वाढत चालला होता…
दारावरची ठकठक जोरजोरात आपटण्यामध्ये बदलली होती.
खोलीतील विजेचे दिवे ये-जा करायला लागले.
शेवटी भीतीनं गांगरलेल्या वैभवने आपले दोन्ही कान हातांनी घट्ट बंद केले.
त्याने घट्ट डोळे मिटून ठेवले.
आवाज वाढत गेला… वाढत गेला…
आणि अचानक सगळं शांत झालं.
खोलीतील लाईट पुन्हा आली.
सगळं जसंच्या तसं होतं.
लॅपटॉपवर नोटिफिकेशन्सची टिंग-टिंग सुरू होती.
वैभव घामाघूम झाला होता.
त्याने कसाबसा आपल्या चेहऱ्यावरचा घाम शर्टाच्या बाह्यांनी पुसला.
इतक्यात — दाराची बेल पुन्हा वाजली.
वैभव दचकला.
या वेळेस मात्र दारातून त्याच्या आईबाबांचा बोलण्याचा आवाज आला.
“वैभव… अरे वैभव… बाहेर ये जरा, सामान घेऊन आत जा.”
हा त्याच्या बाबांचा आवाज होता.
वैभवच्या जीवात जीव आला.
त्याने टेबलवरच्या बाटलीतून पाणी पिले आणि मोठा दम टाकला.
“अरे येतोस ना लवकर! आई दारात थांबली आहे,”
बाबा पुन्हा म्हणाले.
वैभवने हळूच बेडरूमचं दार उघडलं.
बाहेर मागच्या पात्रांपैकी कोणीच नव्हतं.
तो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आला.
तिथे खरंच घरातील सामान ठेवलेलं त्याला दिसलं.
तो सुस्कारा टाकत सामान उचलायला पुढे गेला…
आणि तेवढ्यात — घरातली लाईट गेली!
वैभवचे पाय जागीच खिळले.
“कसं फसवलं तुला…”
त्याच्या मागून ती म्हातारीचा खडखडीत आवाज आला.
वैभवच्या अंगावर शहारे आले.
त्याने हळूहळू मागे वळून पाहिलं —
आणि…
ते सगळे पात्र त्याच्या भोवती रिंगण करून उभे होते!
त्यांचं हास्य इतकं विकृत आणि असुरी होतं की वातावरण दणाणलं.
वैभवने घाबरून जीवघेणी किंचाळी फोडली!
तिसऱ्या दिवशी
वैभवचे आई-वडील पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते.
समोर इन्स्पेक्टर प्रतीक आणि डॉ. काळे बसले होते.
“तुम्हाला माहीत होतं का वैभव ऑनलाइन असं काही करत होता?”
इन्स्पेक्टर प्रतीक यांनी वैभवच्या आई-वडिलांना विचारलं.
त्या दोघांनीही नकारार्थी मान हलवली.
“डॉक्टर साहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे?”
इन्स्पेक्टरने पुढे विचारलं.
डॉ. काळे गंभीर स्वरात म्हणाले —
“तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल, पण वैभव माझ्याकडे मानसोपचार घेत होता.
तो त्याच्या स्टोरीटेलिंगमध्ये इतका गुंतला होता की त्याला त्यातली पात्रं खरी वाटू लागली होती.
ह्याला वैद्यकीय भाषेत Schizophrenia म्हणतात.”
ते थोडा वेळ थांबले आणि पुढे म्हणाले —
“त्याच्या औषधोपचाराची सुरुवात झाली होती.
मी त्याला या कामातून थोडा ब्रेक घ्यायला सांगितलं होतं.
पण त्याने ते ऐकलं नाही.
या अवस्थेत रुग्णाला स्वतःची कल्पना हाच खरा संसार आहे असं वाटतं.
ही स्थिती कधी नियमितपणे, तर कधी अधूनमधून होते.
त्या रात्री तुम्ही घरी नव्हतात.
वैभवने भरपूर दारू प्यायली होती.
त्यामुळं त्याचा मानसिक तोल पूर्णपणे ढासळला होता.
जसा कोणाला panic किंवा anxiety attack येतो —
तसंच त्याला त्या क्षणी Schizophrenic Attack आला.
वैद्यकीय भाषेत आम्ही त्याला Psychotic Episode म्हणतो.
तो अटॅक इतका तीव्र होता की वैभवला
भौतिक आणि काल्पनिक यातील फरक पूर्णपणे विसर पडला होता.
आणि त्याची भीती त्याला इतकी झपाटून गेली की…”
डॉ. काळे खोल श्वास घेत म्हणाले —
“I am sorry to say… त्याला severe cardiac म्हणजेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तो दगावला.”