माझं नाव आदित्य. मुंबईत गेली पाच-सहा वर्षं मी नोकरी करतोय. इथलं आयुष्य नेहमीच धावपळीचं, गोंधळाचं. सकाळी ट्रेनने ऑफिसला जाणं, दिवसभर संगणकासमोर बसणं, रात्री परत येऊन थकल्यासारखा कोसळणं. हाच माझा दिनक्रम. माझं मूळ गाव मुंबई पासून बरेच लांब आहे. लहानपणापासून मी तिथे वाढलो, पण शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी मुंबईत स्थायिक झालो. आई-वडील मात्र गावातच राहिले. त्यांना शहराची धावपळ कधीच आवडली नाही. गावात घर, शेत, आपली माणसं… त्यांचं जग तिथेच होतं. गेल्या काही दिवसांपासून आईची तब्येत बरी नाहीये, असं वारंवार फोनवर ऐकू येत होतं. बाबा सुद्धा आजारी आहेत, पायात सूज आहे. त्यांच्या बोलण्यातला थकवा मला फोनवरूनच जाणवत होता. मन वारंवार गावाकडे ओढ घेऊ लागलं. सुट्टी घेऊन एकदाच जाऊन दोघांना ही भेटून यावं असं खूप वाटत होतं. पण ऑफिसमधून सुट्टी मिळणं इतकं अवघड झालं होतं की, मी नाईलाजाने फक्त बोलण्यावरच समाधान मानत होतो. तो गुरुवार होता. ऑफिसमध्ये मी नेहमीप्रमाणे काम करत होतो. मेल्स, मीटिंग्स, क्लायंटचे फोन – डोकं जड झालं होतं. तेवढ्यात बाबांचा फोन आला. आवाज खूपच थकल्यासारखा होता. ते म्हणाले,

“आदित्य, आईची तब्येत खूपच ढासळलीये. ये रे, एकदा तरी येऊन बघ. भेटून जा तिला.. खूप आठवण काढतेय तुझी.. तिला बरे वाटेल..” ते ऐकल्यावर माझं मन सुन्न झालं. ताबडतोब मी मॅनेजरकडे गेलो आणि सुट्टी मागितली. खूप वेळ चर्चा झाली. कारण ऑफिसमध्ये काम प्रचंड होतं. पण माझा चेहरा बघून बहुतेक मॅनेजरलाही कळलं असेल की हे किती गरजेचं आहे. दोन दिवसांची सुट्टी मिळाली, तेव्हा मला कुठे बरं वाटलं. आई वडिलांना भेटता येईल, त्यांच्या सोबत वेळ घालवता येईल. 

संध्याकाळी मी थोडं सामान जमवलं. गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तिकीट मिळणं कठीण होतं. त्यामुळे मी थेट बसस्थानक गाठलं. रात्री दहाची बस होती. मुंबईहून गावाकडे जाणाऱ्या बसेस त्या काळात खूप भरलेल्या असायच्या. स्थानकावर प्रचंड गर्दी होती – कुणी हातात बॅगा घेऊन धावत होतं, कुणी पोटली घेऊन मुलांना आवरत होतं, कुणी चहा-टपरी जवळ उभं राहून बस येण्याची वाट बघत होतं. मी तिकीट तपासलं आणि माझी बस कुठे थांबेल हे पाहू लागलो. आजूबाजूला सगळं वातावरण गडबडीनं, गोंगाटाने भरलेलं होतं. पण त्या सगळ्या गोंधळात माझं लक्ष अचानक बाजूला उभ्या असलेल्या एका जुन्या बसकडे गेलं.

ती बस जरा वेगळीच दिसत होती. आजूबाजूच्या सगळ्या बसेस निळ्या-हिरव्या किंवा रंगीत लाईट्सनी उजळलेल्या होत्या, चालक गडबड करत होते. पण ही बस मात्र अगदी वेगळ्या थाटात उभी होती – जुनाट, धुळीने भरलेली, जणू खूप दिवसांपासून वापरलीच गेली नाहीये अशी. काचांवर प्रचंड धुळी सारखं काहीतरी साचलं होतं. सहज त्या काचेतून आत डोकावून बघितलं तर आत लोकं होती. मी विचारात पडलो की इतर बसेस च्या तुलनेत ही बस बंद असेल असे वाटले पण आत तर लोकं आहेत. सर्वसाधारण प्रवासी त्या बसकडे बघतही नव्हते. मला आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या सारखे कदाचित त्यांना सुद्धा बस चालत नसेल असे वाटत असावे. मी माझ्या हातातल्या तिकिटावर मी पुन्हा एक नजर फिरवली.. त्यावर दिलेला नंबर आणि त्या बस वर लिहिलेला नंबर दोन्ही जुळले. क्षणभर मला शंका आली की, “हीच माझी बस आहे का खरंच?”.. मी मनातल्या मनात स्वतःलाच समजावत होतो – “नाही नाही, एवढं विचार करू नको. तिकीटावरचा नंबर तर जुळतोय.” पण माझ्या मनात कुठे तरी एक विचित्र बेचैनी सुरू झाली होती. मी सावधपणे त्या बस च्या दरवाज्या कडे चालू लागलो.

जसा मी दारा जवळ आलो, तसं अंगावर एक थंडगार झोत आला. साहजिकच ती बस इतकी जुनी होती की वातानुकुलीत असणार असे अजिबात वाटत नव्हते. 

बाकी बाहेर सगळीकडे प्रचंड उकाडा होता. घामानं अंग चिकट झालं होतं. पण या बसच्या आसपासच हवेत गारवा जाणवत होता. बसमध्ये प्रवेशद्वाराजवळ एक माणूस उभा होता. तो कंडक्टर असावा असं वाटल.. त्याने फक्त माझं तिकीट पाहिलं, डोकं हलवलं आणि काहीही न बोलता आत शिरायला इशारा केला. मी बस मध्ये आत पाय टाकला… आणि त्या क्षणापासून माझ्या प्रवासाचं स्वरूप पूर्ण बदललं. आत शिरताच मला अंगभर शहारे आले. कारण आतलं वातावरण वेगळच होतं. शब्दांत सांगणता येणार नाही कदाचित.. बाहेरच्या गोंगाटानं भरलेल्या स्थानकातून मी जणू एका वेगळ्याच जगात प्रवेश करत होतो. आत पाऊल टाकताच सर्वप्रथम जाणवलं ती म्हणजे शांतता. इतक्या मोठ्या बसमध्ये, प्रवासी बसलेले असूनसुद्धा, कुणीच आवाज करत नव्हतं. मोबाईलची रिंग नाही, मुलांचं रडणं नाही, गप्पा मारण्याचा आवाज नाही..

इतकं काय तर साधी कुजबुज ही नाही. मला खूप च विचित्र वाटल खरंच. सीट्सही थोड्या वेगळ्या भासत होत्या. जुनाट, रंग उडालेल्या, काही ठिकाणी कपडा फाटलेला. एक वेगळाच वास दरवळत होता – ओलसर कपड्यांचा, गंजलेल्या लोखंडाचा. मला थोडंसं का होईना पण अस्वस्थ वाटू लागलं. मी खिडकीजवळची सीट शोधून बसलो. बॅग बाजूला ठेवली. पुढच्या काही मिनिटांत कंडक्टर ने दोरी ओढली आणि बस निघाली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेरचं स्थानक जणू फिकट होत चाललं होतं. आवाज मंदावून जात होते. गर्दी, गडबड, दिवे – सगळं हळूहळू धूसर होतंय असं वाटलं. क्षणभर मी डोळे चोळले. “खूप थकवा झालाय. गेले काही महिने दिवसभर काम, आराम नाही, कदाचित भास होत असतील,” असं स्वतःलाच समजावलं.

बस पुढे सरकू लागली. बाहेर रस्त्यावरच्या नेहमीच्या लाईट्स, दुकानं, गाड्यांची वर्दळ – हे सगळं हळू हळू गायब होत होतं. आणि ते ही मुंबई सारख्या गजबलेल्या शहरात.. जे मला अजिबात रुचत नव्हतं. खिडकीबाहेर आता फक्त काळोख पसरला होता. ज्या रस्त्यावरून बस जात होती, तिथे ना गाड्या होत्या, ना माणसं. एकही स्ट्रीटलाइट चालू नव्हता. मी थोडं वळून बाजूच्या प्रवाशाकडे पाहिलं. तो एक मध्यमवयीन माणूस होता. डोळे मिटलेले, चेहरा निर्विकार. मला वाटलं कदाचित झोपला असेल. पण नीट पाहिलं तर त्याच्या श्वासाची हालचालसुद्धा दिसत नव्हती. तो जिवंत आहे की नाही, याचाच संभ्रम वाटावा अशी अवस्था.. मागच्या सीटवर एक बाई बसलेली होती. तिच्या मांडीवर एखादं मूल असावं असं वाटलं, कारण तिचे हात काहीतरी पकडल्यासारखे होते. पण मला मुलाचं डोकं दिसेना. फक्त तिचे रिकामे हात हलत होते – जणू ती कुणाला कवटाळून झोपवतेय, पण तिथे कोणीच नाही. अंगावर काटा आला.

मी पटकन खिडकीबाहेर लक्ष दिलं. तेवढ्यात बसच्या मागच्या बाजूने हलकासा आवाज आला. कुणीतरी रडत होतं. ते रडणं अगदी दाबून, हुंदक्यांसह होतं. आवाज ऐकताक्षणी माझ्या अंगावर शहारे आले. मी वळून मागे पाहिलं. पण तिथल्या सीट्स रिकाम्याच दिसल्या. मग तो आवाज..? मी गोंधळलो. “खरंच आवाज आला की फक्त भास झाला?”.. डोक्यात गोंधळ सुरू झाला. मी पुन्हा समोर पाहिलं. कंडक्टर आपल्याच जागी उभा होता.. त्याच्याकडे नजर गेली की असं वाटायचं, जणू त्याला सगळं माहीत आहे, पण तो मुद्दाम काही बोलत नाही.

हळूहळू माझं मन मला समजावू लागलं. ही नेहमीची बस नाही हे कळून चुकलं होतं. आतली हवा जड झाल्यासारखी भासत होती. श्वास घेणं कठीण होऊ लागलं. मी खिडकी उघडायचा प्रयत्न केला, पण काच हललीच नाही. 

ती जणू कायमस्वरूपी बंद होती. बाहेर पाहिलं तर आता रस्तेच बदलले होते. मला त्या रस्त्याची ओळखच पटली नाही. गावाला जाण्याचा रस्ता मला पूर्ण लक्षात होता पण हा भाग मी कधीच पाहिला नव्हता. आजूबाजूला उंच झाडं, अंधार आणि पसरलेलं धुकं. बसच्या हेडलाईट्सचा उजेड जिथं पर्यंत जातं होता तेवढ्याच अंतरावरचं सगळं दिसत होतं. त्यापलीकडे फक्त काळोख. बसच्या आत अजून एक गोष्ट जाणवायला लागली – बस मध्ये चढलो तेव्हा साधारण १८ ते २० लोकं होती पण आता बऱ्याच जागा रिकाम्या वाटत होत्या. पण बस स्थानाकातून सुटल्यापासून एकदाही थांबली नव्हती. मी नजर चुकवली, पुन्हा पाहिलं, तर कधी ती सीट भरलेली दिसे, कधी रिकामी. जणू तिथं बसलेले लोक कधी दिसायचे कधी नाही. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी स्वतःला समजावत होतो – “हे सगळं थकव्यामुळे होतय.. मला झोप लागून स्वप्न पडतेय.. कदाचित मी स्वप्न पाहतोय..

“ मला माहित नव्हतं की काहीतरी फार मोठं आणि भयानक माझ्या वाट्याला येणार आहे. “हीच खरंच गावाकडे जाणारी बस आहे का?” हा प्रश्न वारंवार मनात येत होता. तिकीटावरचा नंबर, बोर्डवरचा नंबर सगळं जुळत होतं. पण रस्ता मात्र पूर्ण अनोळखी. मी थोडं पुढं पाहिलं. कंडक्टर अगदी जागेवर उभा होता. त्याचा चेहरा मात्र अगदी निर्विकार. ना हसणं, ना राग, ना गडबड. डोळे मात्र विचित्र खोल गेलेले जणू 2-3 दिवस झोप मिळाली नसावी त्याला. त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं. त्या नजरेत असं काही होतं, ज्यामुळे माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले. मी फोन काढला, गावाकडे कॉल करावा, बाबा तरी उचलतील का ते पाहावं असं वाटलं. पण फोनवर अजिबात सिग्नल नव्हता. अगदी शून्य. जणू आपण कोणत्यातरी अश्या भागात आहोत जिथं नेटवर्कच पोहोचत नाही.

बसच्या मागच्या बाजूला पुन्हा आवाज आला – यावेळी हलकासा हसण्याचा. जवळजवळ कुजबुजल्यासारखा. मी घाबरून मागे पाहिलं. सीट्सवर अजूनही कुणीच नव्हतं. तेवढ्यात अचानक माझ्या समोरच्या सीटवर एक म्हातारा बसलेला दिसला. पांढरी दाढी, डोळे खाली. हातात एक तुटक माळ फिरवत होता. क्षणभर मी डोळे चोळले. तो म्हातारा हलकेच म्हणाला, “बेटा… झोप घे. प्रवास मोठा आहे…”आवाज अगदी मंद, पण समोरून आल्या सारखा नाही तर कानात घुमल्यासारखा. मी गडबडलो. “म्हणजे… तुम्ही आत्ताच…” शब्दही बाहेर आले नाहीत. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी पटकन खिडकीबाहेर नजर वळवली. बाहेर आता फक्त एक अरुंद घाटासारखा वळणदार रस्ता होता. बाजूला खोल दरी, झाडं, आणि त्या धुक्यातून अधूनमधून काहीतरी हलल्यासारखं जाणवत होतं. क्षणभर मला वाटलं बस अजूनच थंडगार झालीये. श्वास घेताना धुकं जणू फुफ्फुसात शिरतंय असं भासत होतं. सीटच्या मागून पुन्हा कुजबुज.

“आलो ना आपण…” “खूप दिवसांनी…” मी मागे वळून पाहिलं. पण आता पुन्हा सगळं रिकामं. इतक्या थंड वातावरणात ही माझ्या अंगातून घाम वाहू लागला. वातावरण जरी थंड होतं तरी गार घामाच्या थेंबांनी पाठ ओलसर झाली होती. “हे सगळं खोटं आहे, मी फक्त थकलेलो आहे” असा विचार मी पुन्हा पुन्हा करत होतो. अचानक बस एका वळणावर आली. इतक्या जोरात वळली की मी जवळजवळ सीटवरून घसरलो. मी काचेला हात लावून सावरलो. त्या क्षणी मला बाहेर काहीतरी दिसलं – दोन-तीन आकृती रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. धुक्यातून स्पष्ट दिसत नव्हत्या. पण त्या मानवी आकृती होत्या याची मला खात्री होती. बसचा उजेड त्यांच्यावर पडल्याबरोबर त्या मागे हटल्यासारख्या झाल्या.

मी घाबरलो. “कंडक्टरला तरी विचारूया” असं ठरवलं. पुढं सरकलो आणि विचारलं, “भाऊ… ही बस गावाकडेच जाते ना?” त्याने माझ्याकडे पाहिलं. 

“बस जाते तिथं जिथं प्रवासी पोहोचायला हवे…” 

“म्हणजे?” मी पुन्हा विचारलं.

तो काहीच बोलला नाही. नजर वळवून बाहेर पाहू लागला.

माझं मन एव्हाना पुरतं घाबरून गेलं. मी स्वतःलाच समजावत होतो. “नाही… अजून थोडं वेळ बघूया. कदाचित काहीच नाही. कदाचित हे सगळं एक वाईट स्वप्न आहे… आणि थोड्याच वेळात जाग येईल.”

तेवढ्यात बसच्या मागच्या बाजूने पुन्हा रडण्याचा आवाज आला. यावेळी मात्र अगदी स्पष्ट. मी मागे पाहिलं. मागच्या सीटवर तीच बाई बसलेली होती. पण आता तिच्या हातात काहीच नव्हतं. तरी ती जणू एखाद्या अदृश्य बाळाला कवटाळतेय असं भासत होतं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.

अचानक तिने माझ्याकडे पाहिलं. डोळे अगदी पोकळ. ओठांवर रक्तासारखं काहीतरी.

“तू पण आलास…” ती कुजबुजली. माझे हातपाय गोठले. बसच्या आत हवा अधिकच जड झाली. मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण काच अजून घट्ट वाटू लागली. माझ्या कानात बसच्या इंजिनचा आवाज मोठा होत गेला. 

क्षणभर मला वाटलं मी इथून उतरावं. पण बस अजिबात थांबत नव्हती. कुठंही स्टॉप नाही, फक्त अंधार आणि घाटाचा रस्ता. मी स्वतःला शांत करून उठायचा प्रयत्न करू लागलो. पण डोळे उघडल्यावर सगळं तसंच होतं.

त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली – माझ्या बॅगेतले साई बाबांचे ताईत. मागच्या वर्षी गावाहून येताना आईने दिले होते आणि म्हणाली होती जपून ठेव”. जसे मी बॅग मधून काढून हातात घेतले तसे माझ्या अंगावरचा शहारा थोडा कमी झाला. बसमध्ये जड झालेली हवा किंचित हलकी झालीय असं वाटलं.

पुढं कंडक्टरने घंटा वाजवली. बस अजूनच वेगानं घाट उतरू लागली. आता बाहेर दिसणारं धुकं आणखी दाट झालं होतं. पण त्या धुक्यात मला पुन्हा काही आकृत्या दिसल्या. या वेळेस त्या बसच्या मागून धावत होत्या.. मी डोळे घट्ट बंद केले “हे सगळं खरं नाही” असा विचार मनात पुन्हा आला. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. हातात साईबाबांच ताईत घट्ट पकडल होत. तोच एकमेव आधार वाटत होता. पण माझ्या नजरा सतत त्या प्रवाशांवर खिळल्या होत्या. कुणीतरी डोकं वळवलं की ते क्षणभर माणूस भासत होतं, पण डोळे पोकळ दिसले की लगेच अंगावर काटा उभा राहायचा. काहींचे चेहेरे रक्ताने माखलेले, तर काहींच्या मानेला विचित्र वळणं. कुणाचा हातच वेगळ्या कोनात वाकलेला. मला आता खात्री पटली – हे जिवंत नाहीत.

अचानक बसच्या पुढच्या काचेतून एक जोराचा आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी दगड मारला. पण काच फुटली नाही. बस अजून वेगाने धावू लागली. मी पुढच्या कंडक्टरकडे पाहिलं. तो निर्विकार चेहऱ्याने समोर बघत होता. माझ्या नजरेला नजर मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. पण त्यात काहीतरी भयानक होतं. जणू तो म्हणत होता – “तुला सगळं कळणार आहे, थोड्याच वेळात.” पुढचं वळण आलं. बस जोरात कलली. मी खिडकीला धरून सावरलो. बाहेर खोल दरी दिसली. दरीत धुकं पसरलं होतं. त्या धुक्यात मला काही आकृती हलताना दिसल्या – जणू शेकडो लोक हात वर करून बसकडे बोलावत होते. अचानक मागून एक किंकाळी ऐकू आली. मी घाबरून मागे वळून पाहिलं. त्या बाईचं चेहेरा विकृत झाला होता. तिच्या हातातलं अदृश्य मूल ती खाली फेकल्यासारखी करत होती. आणि मग पोकळ नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली – “तू इथे कसा आलास? तू नव्हतास कधीच…”

मला काही कळेनासे झाले, हातपाय गोठल्यासारखे झाले. मी अक्षरशः किंचाळलो. हातातला ताईत घट्ट पकडून मोठ्याने “साईंराम” म्हटलं. पुढच्या क्षणी बसमध्ये जोराचा प्रकाश चमकला. जणू वीज कडकडली. आणि त्या क्षणात मला सगळं दिसलं एखाद्या चित्र फिती सारखं डोळ्यांसमोर तरळू लागलं. 

हीच बस काही वर्षांपूर्वी ह्या घाटावरून कोसळली होती. रात्र होती, धुकं होतं, आणि ब्रेक फेल झाले होते. संपूर्ण बस दरीत कोसळली, एकही जण जिवंत राहिला नाही. तिच अपघातग्रस्त बस अजूनही त्या घाटावर धावतेय, प्रवासी अजूनही आपापल्या जागी बसलेले आहेत, कंडक्टर अजूनही निर्विकार उभा आहे. माझं डोकं सुन्न झालं. म्हणजे मी जेव्हा ही बस पकडली तेव्हा… मी प्रत्यक्षात त्या मृत बसमध्ये चढलो होतो.

“हे सगळं संपणार आहे का कधी?” मी मनात विचार केला.

पण त्या क्षणी, बस एका वळणावर आली आणि अचानक जोरात हलली. मी सीटवरून खाली पडलो. हातातला ताईत जमिनीवर आदळला. आणि ते ताईत जणू चमकल. संपूर्ण बसमध्ये प्रकाश पसरला. सगळे प्रवासी ओरडले. कंडक्टरसुद्धा मागे हटल्यासारखा झाला. मी कसाबसा उठून खिडकीकडे धावलो. खिडकी आधी जशी घट्ट होती, तशी नव्हती. मी जोराने ढकलली आणि ती उघडली! बाहेर काळोख, धुकं, दरी – पण त्या क्षणी मला रस्त्याच्या कडेला एक विजेचा खांब दिसला. मी कसेबसे खिडकीतून उडी मारली. वाऱ्याच्या झोतासह मी खाली कोसळलो. जोराचा धक्का बसला. डोकं फिरल्यासारखं झालं.

जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी घाटाच्या रस्त्याच्या कडेला होतो. संपूर्ण अंग खरचटलेलं, कपडे फाटलेले. पण मी जिवंत होतो. दूरवर रस्त्यावरून मागून खऱ्या बसची लाईट्स दिसत होती. कोणी तरी हॉर्न वाजवत होतं. बस थांबली. त्यातली काही लोक माझ्याकडे धावत आले. कुणीतरी पाणी दिलं. मी घाबरून मागे वळून पाहिलं. पण तिथं ती जुनी बस नव्हती. फक्त धुक आणि काळोख..

लोकांनी मला उचलून विचारलं, “काय झालं? तू इथे एकटा काय करतोयस?”

मी काहीच उत्तर दिलं नाही. शब्दच फुटत नव्हते. त्या रात्रीनंतर मी कधीही गावाकडे रात्री बसने जाण्याचं धाडस केलं नाही. आई-वडिलांना भेटलो, त्यांची काळजी घेतली. पण मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच तो प्रश्न राहिला – 

“त्या बसमध्ये चढलो नसतो, तर काय झालं असतं? आणि आजही ती बस रात्री घाटावर धावत असेल का?” आजही कधी रात्री उशिरा घाटातून प्रवास करताना कुणी जुनी, धुळीने माखलेली बस रस्त्याच्या कडेला उभी दिसली… तर माझं हृदय जोरजोराने धडधडायला लागतं.

Leave a Reply