मी एका प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनीत नोकरी करत होतो. हे काम रात्री उशिरा पर्यंत चालायचं, पण मला ते जमत होतं. जागेचे नाव घेणे आवर्जून टाळतोय. तो भाग मला चांगलाच माहित होता. पण त्या रात्री, मी ज्या ठिकाणी ऑर्डर घेऊन जात होतो, तो पत्ता थोडा वेगळाच होता. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पावसाच्या सरी थांबल्या होत्या, पण हवेत एक विचित्र गारवा होता. मी डिलिव्हरी अँप च्या मॅपवर दिलेला पत्ता शोधत होतो. त्या प्रमाणे मी पुढे जात होतो. मी एका जुनाट, पानगळलेल्या झाडांनी वेढलेल्या रस्त्यावर आलो. समोर एक बंगला दिसला. बंगला क्रमांक १३. बाहेर कुठलाच लाईट नव्हता.

मी थोडा अस्वस्थ झालो, पण ऑर्डर दिली पाहिजे, म्हणून बेल वाजवायला ती शोधू लागलो.. पण बेल नव्हती. मी दरवाजा हलकाच ढकलून पहिला तसे तो हळुवार पणे आत लोटला गेला. “हॅलो… फूड डिलिव्हरी आहे…” मी आवाज दिला. आतून कोणताही आवाज आला नाही. तेवढ्यात मागून एक थंड वाऱ्याचा झोत आला आणि दरवाजा पूर्ण उघडला. घरात एक विचित्र दर्प होता – जुन्या लाकडाचा, ओलसर भिंतींचा.. मी घाबरत च आत शिरलो. सहज लक्ष गेलं – खोलीतल्या टेबलावर एक जुनी फोटो फ्रेम होती. एक कुटुंब, पण त्यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांवर एक काळसर गोष्ट होती.  तेवढ्यात मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, “ऑर्डर टेबलावर ठेवा…”

मी मागे वळून पाहिलं – एक वृद्ध स्त्री, पण तिचा चेहरा अस्पष्ट होता. मला काही क्षणासाठी वेगळचं वाटल. ही म्हातारी बाई फूड डिलिव्हरी अँप वरून ऑर्डर कशी प्लेस करेल. मुळात हिला स्मार्टफोन तरी वापरता येत असावा का.. मी तो विचार बाजूला सारून पार्सल जवळच्या टेबलवर ठेवलं आणि मागे वळलो. तसे ती म्हातारी उलट्या पावलांनी धावत अंधारात दिसेनाशी झाली. आणि संपूर्ण घरात काळोख झाला. आत आल्याची दिशा माहित असल्याने मी जिवाच्या आकांताने बाहेर पळालो. बाइक सुरू केली आणि सुसाट निघालो. मागे वळून पाहिलं तर घर अंधारात नाहीसं झालं होतं… त्या जागी फक्त एक ओसाड मोकळं मैदान होतं. मी थेट घरी निघून आलो. घडलेल्या प्रकारामूळे मला संपूर्ण रात्र झोप लागली नाही.

सकाळी ऑफिस मधून फोन आला म्हणून नाईलाजाने जावे लागले. मॅनेजर ने विचारपूस केली की काल न सांगता घरी कसा काय गेलास वैगरे. मी त्यांना सगळा प्रकार सांगितला त्यावर ते काय म्हणाले माहितीये..? “ ती डिलिव्हरी त्या पत्त्यावर नव्हतीच.. ती कॉलनी १५ वर्षांपूर्वीच बंद झाली होती… तिथे आता कुणी राहत नाही.”

Leave a Reply