ही गोष्ट मी कधीच कोणाला सांगितली नव्हती. कारण ऐकणाऱ्याने मला वेड्यात काढल असत. पण आता, या गोष्टीला जवळपास पंधरा वर्षे उलटली आहेत… आणि आज, जेव्हा मी पुन्हा त्या हॉस्पिटलच्या समोर उभा राहतो, तेव्हा मला जाणवत की काही गोष्टी कधीच बदलत नाही.. माझं नाव अनिरुद्ध. मी एक सर्जन आहे. २००९ साली मी माझ्या करिअरची सुरुवात एका जुन्या पण प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये केली होती. ते हॉस्पिटल एकेकाळी खूप नावाजलेलं होतं, पण ८० च्या दशकात काही विचित्र मृत्यूंच्या घटनांनंतर त्याची इमेज खालावली. मी तिथे रुजू झालो तेव्हा हॉस्पिटलमध्ये फारसा गजबजाट नव्हता. काही जुन्या इमारती, ओसाड पडलेले काही वॉर्ड्स, आणि रुग्णांच्या संख्येऐवजी भटक्या मांजरी आणि पाण्याचा ओलसर वासच जास्त.. माझं राहणं हॉस्पिटलच्या बाजूलाच डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्ये होतं. तिथून रात्री हॉस्पिटलकडे बघितलं, की ती इमारत एखाद्या जुन्या झपाटलेल्या वास्तू सारखी भासायची. पण मी डॉक्टर होतो – विज्ञानावर विश्वास ठेवणारा, अशा गोष्टींना “अंधश्रद्धा” समजणारा. त्यामुळे मी तसा विचार ही कधी केला नाही.

त्या रात्री मी नाईट शिफ्टवर होतो. सोबत नर्स वैशाली होती. आम्ही दोघ ही राऊंडवर निघालो होतो. एक एक पेशंट चेक करत चाललो होतो. काही वेळा नंतर मला राउंड करताना तिने थांबवलं आणि सांगितलं, “सर… सात नंबर वॉर्डकडे जाऊ नका. तो आता बंदच आहे.” मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो “का? तिथे भूत आहे वाटतं?”. तिची मस्करी करतोय हे पाहून तिचा चेहरा पडला. पुढे ती काहीच बोलली नाही. वॉर्ड नंबर 6 चे पेशंट पाहिल्यावर ती म्हणाली “सर.. मला एक फोन करायचा आहे तुम्ही व्हा पुढे मी येते..” इतक बोलून ती उलट दिशेने निघून गेली. तितक्यात मला लक्षात आलं की 6 नंबर वॉर्ड च्या पुढच्या बाजूला वॉर्ड नंबर 7 आहे. मी मनातल्या मनात च बोललो “ अच्छा म्हणून ही काही तरी कारण काढून पळाली तर.. “ जास्त विचार न करता तसाच पुढे चालत गेलो. बाहेर अचानक पावसाला सुरुवात झाली. 

वॉर्ड नंबर 7 – खरंच तीन सांगितल्या प्रमाणे बंद होता. बंद काय.. इथे गेल्या काही महिन्यात तरी कोणी फिरकलं असेल असं वाटतं नव्हतं. माझं लक्ष त्या बंद दाराकडे गेलं. पॅसेज मधल्या लाईट चा हलकासा प्रकाश आत जात होता. त्यातूनच आतलं अंधारलेलं दृश्य दिसत होतं. कुठूनतरी पावसाचा गार वारा आत येत होता आणि अंगावर थंडीने शीरशिरी आणत होता. उगाच बंद करून ठवेलय हा वॉर्ड. साफ सफाई करायला नको.. 6-7 बेड आहेत. पेशंट ची सोय होईल पण नाही.. यांना फुटकळ कारणे देता येतात फक्त. तिथला परिसर पाहून झाल्यावर मी परत फिरलो आणि माझ्या डेस्क वर येउन बसलो. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. त्या रात्री, २ वाजता, मला वॉर्ड क्रमांक ६ मधून एका पेशंटची ECG चेक करायला बोलावलं. ECG रूम वॉर्ड ७ च्या अगदी शेजारी होती. मी राउंड ला गेलो होतो तेव्हा हे लक्षात आलं नाही. तिथे जात असताना सहज वॉर्ड क्रमांक ७ वर नजर गेली तर तिथे बाहेर कोणी तरी उभ असल्याच जाणवलं. मी नीट निरखून पाहिलं तेव्हा दिसलं की दाराच्या कडेला एक स्त्री उभी आहे. मान किंचित तिरकी करून.. आत पाहण्याचा प्रयत्न करतेय. 

“मॅडम?” “काही हवंय कां?”.. तो वॉर्ड बंद आहे.. “ मी विचारलं. ती तशीच उभी होती. हलली नाही. बोलली नाही. आणि तितक्यात माझा फोन वाजला. मी खिशातून फोन काढून बोलू लागलो आणि सहज समोर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मग ती स्त्री.. गेली असेल बहुतेक.. मी माझ्या डेस्क वर परत आलो पण नंतर अचानक लक्षात आलं की त्या कोरीडोअर मधून पुढे जाण्याचा रस्ताच नाही. ती स्त्री वॉर्ड 7 मध्ये जाऊ शकत नाही कारण तो बंद आहे. तिला बाहेर जाण्या साठी तर एकच मार्ग होता मी जिथे उभा होतो तोच मार्ग.. मग ती गेली कुठे. की आपल्याला भास झाला.. नाईट शिफ्ट आहे.. थकवा.. किंवा नवीन जागा म्हणून असे वाटले असेल. याच विचारात पहाट झाली. दुसरे डॉक्टर आले तशी मी माझी ड्युटी संपवून क्वार्टरस मध्ये आलो. तो दिवस सतत विचार करण्यात गेला कारण त्या एका प्रसंगाने माझ्या मनात खोलवर कुठे तरी पहिलं बीज पेरलं होतं. 

दुसऱ्या दिवशी मी फाईलस असलेल्या स्टोअर रूम मध्ये गेलो. जुन्या फाईल्स बघायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये कधी काय झालं होतं हे जाणून घ्यायचं ठरवलं. दीड पावणे दोन तास बरीच शोधा शोध केली, बऱ्याच फाईल्स चाळल्या. पण हाती काहीच लागलं नाही. 8-10 रॅक त्यात हजाराहून अधिक फाईल्स. सगळ्या पाहायला 3-4 दिवस तरी लागणार. हताश होऊन तिथून बाहेर पडतच होतो तसे कंपाउंडर रामदास काका भेटले. त्यांनी माझी विचारपूस केली तसे मी त्यांना सहज विचारलं “ काका पूर्वी इथे एखादी विचित्र घटना घडली होती का? जी तुमच्या लक्षात असेल. एखाद विलक्षण काही. खास करून त्या सातव्या वॉर्ड मध्ये. इतर सगळे वॉर्ड सुरु आहेत पण तो बंद का आहे..? त्यावर ते म्हणाले “ सर तुम्हाला तुमच उत्तर डावी कडून शेवटच्या रॅक मध्ये ठेवलेल्या फाईल्स मध्ये मिळेल. “ मी तडक आत गेलो आणि त्या रॅक मधल्या फाईल्स काढून चाळू लागलो. साधारण अर्ध्या तासानंतर मला एक जुनी फाईल सापडली १९८४ सालची. ज्यात एक वर्तमान पत्राच कात्रण होत. ते या फाईल्स मध्ये का आहे हे पाहण्यासाठी मी वाचायला सुरुवात केली. 

“कक्ष क्रमांक ७ मध्ये ८ रुग्णांचा सलग मृत्यू – डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक कारणं. पण काही नर्सेस च्या म्हणण्या नुसार त्या रुग्णांनी मृत्यूपूर्वी ‘सावित्री मॅडम’चं नाव घेतलं होतं. सावित्री मॅडम – जी १९७८ मध्ये इथे सिस्टर्सची प्रमुख होती आणि एका ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला होता.” ते कात्रण ती बातमी वाचून सुन्न झालो. मनात पहिला विचार चमकून गेला “म्हणजे त्या रात्री दिसलेली ती स्त्री.. सावित्री मॅडम.. नाही.. कसे शक्य आहे. नक्कीच नाही..” मी माझ्या डेस्क वर आलो तितक्यात वॉर्ड ५ मधून एक पेशंट अचानक ओरडायला लागला. मी धावतच तिथे गेलो. तसे तो ओरडत होता “ती आली… ती पुन्हा आली…” मी वेळ पाहिली तर 3 वाजले होते. त्याचा श्वास थांबला होता. मी चेक केलं तर पल्स येत नव्हती. प्रसंगावधान राखत CPR करून वाचवलं. काही वेळा नंतर तो पेशंट भानावर आला आणि जे वाक्य म्हणाला ते ऐकून मी अक्षरशः हादरलोच. तो म्हणाला ” एक स्त्री वॉर्ड बाहेर उभी राहून मला वाकून बघत होती. मी कोण आहे असे विचारले तर ती अचानक आत आली आणि माझ्या छातीवर हात ठेवत म्हणाली – “मी सावित्री.. त्या डॉक्टर ला सांग माझ्या मागावर येऊ नकोस..'”

काही वेळा साठी मला समजतच नव्हतं की मी काय बोलू. पण नंतर स्वतःला भानावर आणलं, डॉक्टर म्हणून माझ कर्तव्य आठवलं. मी त्या पेशंट ला समजावलं आणि म्हणालो की तुम्हाला भास झाला असेल, जास्त विचार करू नका आराम करा. पण मला मात्र कळू लागलं होतं की इथं काय घडतंय. दुसऱ्या दिवशी मी थेट रामदास काकांना गाठलं. त्यांना काही माहिती आहे का ते विचारले. तसे त्यांनी मला सांगितलं “सावित्री मॅडम खूप कडक होती. रुग्णांवर जबरदस्ती उपचार करत असे. एकदा एका गरोदर महिलेला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचं बाळ गेले. ती बाई हॉस्पिटलमध्येच जागच्या जागेचं गेली. ती जेव्हा तिच्या शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तिने सावित्री मॅडम ना शाप दिला होता की ‘तुला तुझ्या कर्मांची शिक्षा इथेच मिळेल. आणि या खोल्यांतून कोणीही जिवंत जाणार नाही! हे सगळं त्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये घडलं होतं'” त्याच वर्षी सावित्री मॅडम एका अपघातात गेली. पण म्हणतात, तिची आत्मा त्या खोलीतच अडकली आहे. या सगळ्या गोष्टी ऐकूनही माझा विज्ञानावरचा विश्वास सोडला नव्हता. पण नुकताच माझ्या विश्वासाला तडा जाणार होता.

कारण पुढच्याच आठवड्यात भयानक घटनांची मालिका सुरू झाली. वेळ रात्री पावणे तीन. एक नर्स पूजा अचानक ड्युटीवरून गायब झाली. स्टाफ मधले जे कोणी 5-6 जण त्या रात्री शिफ्ट ला होते त्यांनी संपूर्ण रुग्णालय शोधून काढलं.. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा.. पण तिचा कुठे ही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी तिची बॉडी वॉर्ड क्रमांक ७च्या मागच्या पॅसेजमध्ये सापडली… चेहरा अशा रीतीने वळलेला होता आणि असे हावभाव होते की, शेवटचा क्षण बघताना ती दचकली असावी. शवविच्छेदन अहवालात काही स्पष्ट कारण नव्हतं. “कार्डियाक अरेस्ट” असं म्हटलं गेलं… पण तिचे डोळे अजूनही दहशतीने रोवलेले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच घटना. या वेळेस एक वॉर्ड बॉय. पण अवस्था तशीच. चेहरा वेगळ्याच कोनात वाकलेला, डोळे सताड उघडे, काही तरी भयानक बघितल्या सारखे. तिसऱ्या दिवशी जीव मुठीत घेऊन बसलो होतो. आणि अजून एक नर्स या प्रकाराला बळी पडली. प्रत्येक मृत्यू एका विशिष्ट वेळेस होत होता – रात्री पावणे तीन वाजता.

हा सगळा प्रकार बघता मी मानसिकरित्या कोलमडू लागलो होतो. पण डॉक्टर म्हणून मला जबाबदारी होती. चौथी रात्र.. मी एकटाच ICU मध्ये एका गंभीर पेशंटवर लक्ष ठेवून होतो. अडीच वाजले असतील.. अचानक मॉनिटरवर मशीन मध्ये बिघाड झाल्याचा एरर दिसू लागला. जणू ECG मशीनमध्ये बिघाड झालाय. काय झालं हे कळतं ना कळतं तितक्यात मला माझ्या मागून एक हलकासा आवाज ऐकू आला “सांगितलं होतं ना माझ्या मागावर येऊ नकोस.. “ मी झटकन मागे वळून पाहिलं पण त्या पेशंट शिवाय तिथं दुसरं कोणीही नव्हतं. पण ECG मशीन अचानक बंद झालं. त्या पेशंटचा श्वास थांबला. आणि एक सेकंदभर त्याचे डोळे माझ्याकडे रोखले गेले… अनिश्चिततेने… आणि मग… मृत्यू. या वेळेस नर्स किंवा वॉर्डाबॉय नाही तर एक पेशंट. वेळ तिचं.. 2 वाजून पंचे चाळीस मिनिट.. मी सहकाऱ्यांना कळवायला बाहेर पडलो आणि सगळ्या लाईट्स अचानक बंद झाल्या. बॅकअप साठी जन रेटर होता पण तो सुरु झाला नाही. पूर्ण कोरीडोअर काळोखात बुडाला. मी नर्स वैशाली ला हाक दिली तसे ती टॉर्च घेऊन धावत आली. आम्ही दोघ टॉर्च घेऊन सुरक्षा तपासायला निघालो.

सगळे वार्ड्स पहिले, पेशंट ची चौकशी केली. पण वॉर्ड क्रमांक ७ चा दरवाजा – जो कायम कुलूपबंद असायचा तो उघडा होता. दरवाज्यातून धूर बाहेर येत होता. नर्स ने आत टॉर्च फिरवली. आत एकच स्ट्रेचर दिसत होतं. त्यावर एक बाई झोपली होती. डोळे सताड उघडे… ते भयाण दृष्य पाहून आम्ही दोघ ही जागीच गोठलो. ते स्ट्रेचर आपोआप आमच्या दिशेने सरकू लागलं आणि त्याच सोबत ती बाई हळू हळू उठू लागली. तसे वैशाली जोरात किंचाळली. ती घाबरत मागे सरकू लागली आणि बोलू लागली “ सर ती माझ्या कडे येतेय.. ती.. मला.. “ मी वळून पहिले, तर वैशाली जमिनीवर पडली होती. तिचं शरीर एक क्षणभर आक्रसत गेलं – जणू तिचा आत्मा ओढून घेतला जातोय. काही सेकंदाच्या धडपडी नंतर तिचं शरीर थंड पडलं. मी समोर पाहिलं.. ना स्ट्रेचर होतं, ना त्यावर कोणी. इतकचं काय तर वॉर्ड क्रमांक 7 चा दरवाजा ही कुलूपबंद होता.. 

या घटनेनंतर मी पूर्णतः हादरलो होतो. पोस्ट वरून रेसाईन करायचं ठरवलं. पण नंतर वाटल की निष्पाप लोकांचे बळी जातं आहेत आणि हे सगळं थांबवायला हवं. मी रामदास काकांकडून हॉस्पिटलच्या संस्थापकांविषयी माहिती घेतली. त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडून जास्त काही माहिती मिळाली नाही. तसे मी त्या भागात बरीच चौकशी केली, तिथल्या जुन्या लोकांना भेटलो. मी एका तांत्रिक साधकाशी संपर्क केला  त्यांनी पाहताक्षणीच म्हटलं – “कक्ष क्रमांक ७ बंद करून उपयोग नाही. ती जागा कधीच बंद होणार नाही. गरोदर स्त्री चा शाप आहे या जागेला. तो शाप फक्त बळीच शांत करू शकतो… एक नवा बळी.” मी थरारलो. “बळी कोणाचा?” मी विचारलं. “तूच. कारण तू पुढाकार घेतलास. तिच्या मागवार गेलास. तुला हे मृत्यू सत्र थांबवायचं असेल तर तुला स्वतः चा बळी द्यावा लागेल. “. नाहक निष्पाप लोकांचा मृत्यू होणार असेल तर हे थांबवायला मला माझ्या प्राणाची आहुती द्यावीच लागेल. मी निर्णय घेतला – त्या खोलीत परत जाण्याचा. माझ्या रक्ताचा बळी देऊन हा शाप संपवायचा. त्या रात्री जेव्हा मी तिथे पोहोचलो, काहीतरी वेगळंच घडलं. कुलूप उघडलं आणि आत गेलो. खोलीतल्या एका स्ट्रेचर वर एक लहान बाळ होतं.. जे अचानक खूप कर्ण कर्कश्य आवाजात रडू लागलं. तसे खोलीने खोलीने एक विचित्र कंपन सुरू केलं. टेबलं, कपाटं हवेत तरंगू लागली. दार आपोआप बंद झालं. मी माझ्या हाताची शीर चिरली. माझं रक्त जमिनीवर पडू लागलं. तेव्हा सावित्री मॅडमचं भेसूर रूप समोर आलं – आक्रोश करत, किंचाळत.. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली.  “शेवटी… बळी… पूर्ण झाला…” आज १५ वर्षांनी मी पुन्हा त्या जागेवर उभा आहे. कक्ष क्रमांक ७ अजूनही बंद आहे.  माझ्या मनात अजून एक शंका आहे – मी तो शाप खरंच संपवला की फक्त पुढच्या बळीचा मार्ग मोकळा करून दिलाय.. मला मुक्ती मिळण्यासाठी..?

Leave a Reply