अनुभव – मिलिंद माडवी
मी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास आहे. घटना 2016 ची आहे. मी राळेगाव येथे नोकरीला होतो. माझ्या सोबत चेतन नावाचा मित्र ही तिथेच नोकरीला होता. माझ्या ऑफिस मध्ये निवडणुकीचे काम सुरु होते. डेड लाईन्स असल्याने काम पूर्ण करता करता बरीच रात्र झाली. निघायला खूपच उशीर झाला. दीड पावणे दोन झाले असावेत. मला प्रवास करून घरी जावे लागणार होते. बाईक होती पण रात्र ही बरीच झाली होती. मित्र मला म्हणाला की आज ची रात्र माझ्या खोलीवर थांब, इतक्या रात्री प्रवास करू नकोस. पण मी त्याला नकार देत म्हंटल “माझ्या घरी माझी पत्नी एकटी आहे मला जावे लागेल..” त्यावर तो म्हणाला “ठीक आहे पण एकटा जाऊ नकोस मी येतो सोबत..” त्याच्या अश्या बोलण्याने मी जरा आश्चर्य चकित झालो पण कदाचित त्याला काही अश्या गोष्टी माहित होत्या ज्या मला माहित नव्हत्या. तो असे हीं म्हणाला की तू बाईक चालवू नकोस, मी चालवेन कारण तू खूप स्पीड मध्ये चालवतोस. आम्ही दोघही बाईकवर निघालो.
आम्ही यवतमाळ कळंब रोडवर आलो. रात्री चे अडीच वाजत आले होते. अचानक मला एक माणूस रस्ता ओलांडताना दिसला. तो आमच्या पासून लांब नव्हता.. साधारण 20-30 मिटर अंतरावर असेल. मला प्रश्न पडला की एवढ्या रात्री हा माणूस इथे काय करत असेल. कारण त्या भागात कोणीही नसते. पांढऱ्या रंगाचा सदरा आणि डोक्यावर टोपी असल्याने तो स्पष्ट दिसत होता. आम्ही डाव्या बाजूने जात होतो आणि तो व्यक्ती उजव्या बाजूने रस्ता क्रॉस करत होता. गाडी जस जशी जवळ येऊ लागली तसे मला दिसले की त्यांची उंची असामान्य आहे. म्हणून माझे लक्ष नकळत त्याच्या पायाकडे गेले आणि जाणवले की त्याचे पाय जमिनीवर नाहीत.. माझ्या अंगावर भीतीने शहारे उमटले. आणि पुढच्या क्षणी समोरून येणारे चारचाकी वाहन त्याच्या अंगावरून निघून गेले. पण तो मात्र तसाच उभा होता.
मी मित्राला म्हणालो “तुला काही दिसले का रे..?” तर तो फक्त हो म्हणाला आणि त्याने बाईक चा वेग वाढवला. माझी तर भीतीने चांगलीच तांतरली होती. मला घाम फुटला होता. मी मागे वळून पहिले तर तो आमच्याकडेच पाहत होता.. आम्ही कसे बसे घरी आलो. पण या भयाण प्रसंगा नंतर मी रात्री अपरात्री उशिरा येणे कायमचे बंद केले.