अनुभव – श्रावणी

मी मूळची मुंबईतली. पण गावाचं नाव घेतलं की मन सुखावतं. विशेषतः परीक्षा संपल्यावर तर गावाची ओढ तीव्र होते. त्या वर्षी माझ्या दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सुट्ट्यांसाठी माझ्या मावशीच्या गावी जाणार. तिचं गाव निसर्गरम्य होतं, झाडांनी वेढलेलं, शांत आणि सुंदर. मावशीची मुलगी नेत्रा माझी एकदम जवळची, आमचं खूप छान जमायचं. त्यामुळे गाव म्हणजे माझ्यासाठी सुट्टी, मोकळा श्वास आणि एक नवीन ऊर्जा असायची. माझी मावशी सांताक्रूझला राहत होती त्यामुळे गावचं घर सुट्ट्यांपुरतंच उघडलं जायचं. अखेर कोकण कन्या एक्सप्रेसने आम्ही गावी पोहोचलो. स्टेशनवर उतरल्यावर अगदी प्रसन्न वाटलं. काही वेळात आम्ही घरी पोहोचलो. घर बरेच महिने बंद असल्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही साफसफाई केली.

दुपारी थोडं झोपून घेतलं. संध्याकाळी आम्ही म्हणजे मी, नेत्रा आणि काका गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. सूर्य नुकताच मावळतीला गेला होता त्यामुळे आकाशात केशरी छटा दिसत होत्या. आम्ही चालत असताना मला झाडीत काहीतरी हलल्यासारखं जाणवलं. मी त्या भागात पाहण्याचा प्रयत्न केला तर अगदी स्पष्ट एक सावली उभी दिसली. मी नेत्राला हाक मारणार, तो पर्यंत ती आणि काका पुढे निघून गेले. मी घाबरून पटकन त्यांच्या मागे गेले. त्यांचा दुसराच कोणता तरी विषय चालला असल्यामुळे मी काही बोलले नाही. घरी आल्यावर जेवण आटोपून मावशीच्या जवळ झोपून राहिले. पण दुपारी झोपल्यामुळे रात्री काही झोप येईना. अचानक मला घराबाहेरून काहीतरी आवाज ऐकू आला. पावलांचा नाही, तर एखाद्या काठीला बांधलेल्या घुंगरांचा. काठी आपटतं कोणी चालत असल्याचा. 

आवाज जसजसा जवळ येत होता, तसतशी छातीचे ठोके वाढत गेले. मी हळूच दरवाजा उघडला. समोर कोणीच नव्हतं. पण आवाज अजूनही येत होता. मी आवाजाचा पाठलाग करायला लागले. घराच्या मागच्या बाजूला गेल्यावर मला जे दिसलं, ते पाहून माझ्या अंगावर भीती ने काटा आला. एक वयस्कर माणूस, अंगावर घोंगडी, केस वाढलेले, चेहरा राखेनं भरलेला. डोळे लालभडक, हातात एक जाड काठी आणि त्या काठीला बांधलेले घुंगरू. त्याच्या पायात चांदीचा वाळा. तो त्या काठीने जमिनीवर घाव घालत संपूर्ण घराभोवती फिरत होता. आणि अचानक, तो माझ्यासमोरच उभा ठाकला. त्याचं ते भेसूर रूप पाहून मला भोवळ आली. सकाळी मला शुद्ध आली तेव्हा मी अंथरुणात होते.

माझं शरीर तापानं फणफणत होतं. नेत्रा माझ्याजवळ बसली होती. मावशीने आईला कॉल केला. काकांनी मला ताबडतोब डॉक्टरकडे नेलं. मी रडत रडत मावशी आणि काकांना रात्रीचं सगळं सांगितलं. काका चिडले, पण मावशी गंभीर झाली. ती म्हणाली, “राखणदार… बरं झालं काही केलं नाही त्यानं.”

“राखणदार म्हणजे?” मी विचारलं.

मावशीने सांगितलं, “शांत बस! आता तो विषय नको.”

2-3 दिवस झाले तरीही माझा ताप कमी होत नव्हता म्हणून आईने माऊशीला सांगितलं की तिला मुंबईला घेऊन ये. गुरुवारी रात्री आम्ही मुंबईला आलो. बाबांनी माझ्या अंगावरून पपई ओवाळली. आई आणि मावशीमध्ये एक गंभीर चर्चा चालू होती – राखणदाराबद्दल. काही दिवसांनी माझी तब्येत थोडी सुधारली. एक दिवस मी आईला सहज विचारलं, “आई, तो राखणदार कोण असतो?”

आईने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिलं, “तू त्या रात्री ज्याला पाहिलंस तोच राखणदार होता. गावात काही ठिकाणी असे राखणदार असतात – ते त्या जागेचे रक्षण करतात. ते फक्त त्यांच्या मार्गात आलेल्यांवर रागावतात. ते जीव घेत नाहीत, पण धडा शिकवतात. एखादी दैवी शक्ती म्हंटले तरी चालेल – देवाचा अवतार. त्याच्या मार्गात जायचं नसतं…”

Leave a Reply