अनुभव – अभिजित परांजपे

आजही ती रात्र आठवली की माझं काळीज धडधडायला लागतं आणि डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहतो. गोष्ट आहे जवळपास वीस वर्षांपूर्वीची, जेव्हा मी माझ्या गावी, जुन्या वाड्यात एकटा राहत होतो. जागेच्या व्यवहारासाठी मी काही महिने तिथे राहायला होतो. तो वाडा, फार जुना – कमीतकमी शंभर वर्ष जुना असावा. मोठमोठे लाकडी दरवाजे, उंच जिना, अंगणातली पडकी विहीर… आणि एक न सांगता येणारा गूढपणा. गावातल्या म्हाताऱ्यांकडून त्या वाड्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या – रात्री ऐकू येणारे आवाज, दिवसा होणारे भास आणि त्या विहिरीत झालेला “एक अपघात”. पण मी शहरातून आलेलो, शिकलेला, मी अशा गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नव्हता. पण ती पौर्णिमेची रात्र… त्या रात्री असं काही घडलं ज्यानं या गोष्टींवर असलेल्या माझ्या विश्वासाला कायमचा तडा गेला.

नेहमी प्रमाणे मी झोपायची तयारी केली होती. बाहेर भयाण शांतता होती. वारा मंद होता, पण त्यात एक गूढपणा होता. कुत्र्यांच्या दूरवरून येणाऱ्या भेसूर रडण्याचे आवाज सतत डोक्यात घुमत होते. अंधार इतका दाट होता की हातापुढचंही दिसत नव्हतं. मी खोलीत, एका जुन्या गादीवर बसून एक पुस्तक वाचत होतो. जी माझी रोजची सवय होती. पुस्तक वाचत वाचत झोपून जाण्याची. पण अचानक, मला एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. मी एकदम दाचकलो. वाड्यात काय पण वाड्याच्या आस पास ही कोणी लहान मुलगा राहत नव्हता. आवाज आला होता जुन्या लाकडी जिन्याकडून. मी काही क्षण स्तब्ध बसलो. विचार आला की कदाचित भास असेल. पण काही सेकंदांनी तो आवाज पुन्हा आला. यावेळी थोडा स्पष्ट, आणि आणखी जवळून.. जणू कोणी लहान मुलगा जिन्यावरून खाली धावत गेला असावा. मी पुस्तक बाजूला ठेवलं. कान ऐकण्यावर टवकारले. मनात भीतीने काहूर माजल होतं.  हळूच मी खोलीचा दरवाजा उघडला. जिन्याकडे पाहिलं – काहीच दिसलं नाही.

इतक्यात जोरात वाऱ्याचा झोत आला आणि माझ्या मागची खिडकी धाडकन आपटली. मी दचकून मागे वळलो. आणि पुढच्या क्षणी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाजात करुणा होती, जणू कुणीतरी हळूहळू संपत चाललंय, वेदनेत. मी थरथरत्या हातांनी बॅटरी चा प्रकाश जिन्याकडे टाकला. जिथे पायऱ्या होत्या… तिथे मला काहीतरी दिसलं.  रक्त! हो, रक्ताचे ठिपके – लालसर, ओले, ताजे. पायऱ्यांवरून वरच्या मजल्याकडे जात होते. मी श्वास रोखत, पायऱ्या चढू लागलो. प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना एक वेगळाच आवाज येत होता. पण तो आवाज आता अधिक जड वाटत होता. जणू मी नाही, कोणी तरी माझ्याच पाठोपाठ वर चढत आहे. वर पोहोचलो.

तिथे एक बंद खोली होती. एकटा राहत असल्यामुळे मी. तिथे कधी जायचो नाही. दरवाज्यातून मंद पिवळसर प्रकाश बाहेर येत होता. तो जणू पेटत असलेल्या मेणबत्त्यांचा होता. मी हळूच दरवाजाकडे गेलो. हात लावला आणि दरवाजा किंचित आत ढकलला. आत पाहिलं, आणि… माझा श्वास अडकला. कारण अगदी समोर खोलीत एक जुना आरसा होता – मोठा, भिंतीला खिळलेला. आणि त्या आरशात मला एक स्त्री दिसली. ती माझ्या मागे नव्हती. पण आरशात होती. तिचे केस विस्कटलेले. चेहरा काळवंडलेला. ओठांवर एक विचित्र वेडसर हसू. डोळे – डोळे नव्हतेच फक्त होत्या त्या रिकाम्या खोबण्या.. ती हसत होती.. कुतसीतपणे. तिच्या मानेवर रक्त होते. तिचे हातही लालसर. ती आरशातच माझ्याकडे पाहून हसत होती, किंचाळत होती. पण वास्तवात, माझ्या मागे कोणीही नव्हतं. माझे हात गारठले. अंगातलं सगळं रक्त गोठल्यासारखं वाटलं. मी मागे सरकलो… आणि धावतच जिन्याखाली पळालो. सगळं विसरून. मला फक्त बाहेर पडायचं होतं.

दरवाजा उघडला. धावत वाड्याच्या बाहेर पडलो. वाड्यापासून काही अंतर लांब आल्यावर मी धापा टाकत थांबलो. आकाशाकडे पाहिलं – पौर्णिमेचा चंद्र भुतासारखा चमकत होता. पण तो सुरक्षित वाटत होता. तरीही, माझ्या मनात तिचं ते भेसुर हसू घुमत होतं. त्या रात्रीनंतर मी त्या वाड्यात कधीही परत गेलो नाही. दुसऱ्या दिवशी गावातल्या एका दोघांना सांगून माझं सामान बाहेरच मागवलं. पण त्या वाड्याच्या परिसरात मी माझं पाऊल ही टाकलं नाही. गावकरी अजूनही सांगतात की त्या वाड्यात रात्री अपरात्री स्त्रीच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो. काहींनी तर विहिरीत तिची छाया पाहिल्याचंही सांगितलं. मी मात्र खात्रीने सांगू शकतो… आजही ती रात्र मला झोपू देत नाही. अचानक त्या आवाजाने माझी झोपमोड होते. तो वाडा आजही तिथेच आहे, पण मी कधीच त्या वाड्यात पुन्हा गेलो नाही. ती कोण आहे ते माहित नाही पण ती स्त्री अजून तिथेच आहे.

Leave a Reply