असं म्हणतात की नवीन ठिकाणी राहायला जाण्या आधी नेहमी त्या जागे बद्दल सगळी माहिती घ्यावी. कारण कधी कधी अश्या काही गोष्टी दडून बसलेल्या असतात ज्याबद्दल आपण कल्पना ही करू शकत नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टींना आपण तर्काने समजावू शकत नाही. त्या दिसतात, ऐकू येतात, पण सिद्ध करता येत नाहीत. प्रत्येकाची एक भीती असते, पण जेव्हा ती भीती प्रत्यक्ष अनुभवावी लागते… तेव्हा जीवन कधीच पूर्वीसारखं राहत नाही.

मी आणि माझा मित्र आम्ही दोघे पुण्यामध्ये कॉलेजला शिकायला आलो होतो. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं, मिनचे नावाचं अगदी छोटं आणि साधं गाव. गाव लहान असलं तरी आमचं आयुष्य मात्र तिथेच घडलेलं होतं. आम्ही लहानपणापासून सोबत – बालवाडीपासून ते बारावीपर्यंत एकाच शाळेत, एकाच बाकावर, आणि एकाच स्वप्नांसह शिकत आलो होतो. त्यामुळे आमचं tuning इतकं छान जुळलं होतं की, आम्ही एकमेकांशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण मानत नव्हतो. माझे आई-बाबा शेतकरी आहेत. घरची परिस्थिती अगदी मध्यमवर्गीय. बाबांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे, जे परवडेल तेवढ्या खर्चात मला पुण्यातील एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दिलं. माझ्या मित्राचं घरही जवळपास असंच – आई-वडील शेतावर खपणारे. त्यामुळे त्यालाही त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत पुण्यात शिकायला पाठवलं.

कॉलेजमध्ये हॉस्टेलची सोय होती, पण भरपूर फि त्यामुळे आमच्या दोघांच्या घरच्या परिस्थितीनुसार तिथे राहणं ती फी परवडणं कठीण होतं. म्हणून आम्ही ठरवलं की हॉस्टेल सोडून बाहेर रूम शोधू. पहिल्या दोन दिवसांत आम्ही फार पळापळ केली. गल्ली-गल्लीत जाऊन रूम बघितल्या, ब्रोकर लोकांशी बोललो, पण काहीच जुळून आलं नाही. आमचं बजेट कमी असल्यामुळे रूम्स मिळत नव्हत्या आणि ज्या मिळत होत्या त्या इतक्या जीर्ण की राहणं अशक्य होतं. आम्हाला घरच्यांना ही धडपड सांगायची नव्हती. कारण त्यांनी त्यांच्या परीने खूप कष्ट करून आम्हाला कॉलेजला पाठवलं होतं. जर रूम मिळाली नाही म्हणून आम्ही तक्रार केली असती, तर त्यांचं मन आणखी चिंतेत पडलं असतं. त्यामुळे आम्ही ठरवलं – हे प्रॉब्लेम्स आपण स्वतःच हाताळायचे. त्याचबरोबर आम्ही पार्ट-टाइम जॉबची शोधाशोध सुरु केली. सुदैवाने दोघांना लगेच पार्ट टाइम जॉब मिळाला. 

कसे तरी मॅनेज करून काही दिवस हॉस्टेल वरचं काढले. आणि मग एके दिवशी माझ्या मित्राचा फोन आला. तो उत्साहाने म्हणाला, “अरे! एक रूम मिळालीये. बजेटमध्ये आहे. अगदी योग्य आहे आपल्यासाठी.. “मीही आनंदाने विचारलं, “किती भाडं आहे?”. तो म्हणाला, “फक्त दोन हजार पाचशे.” हे ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. लगेच आम्ही जॉबमधून मिळालेल्या थोड्या पैशांतून advance भरून रूम फिक्स केली. रूम खरंच भारी होती. एकदम स्वच्छ, छान प्रकाश येणारी, आणि कॉलेजच्या अगदी जवळ. आम्हाला आता जास्त धावपळ करावी लागणार नव्हती. आमच रूटीन एकदम नीट झालं.. सकाळी पाच ते साडेपाचला उठायचं, आवरून कॉलेजला जायचं. दुपारी कॉलेज संपलं की लगेच जॉबला जायचं. आणि रात्री नऊ वाजेपर्यंत परत रूमवर यायचं. जेवण करून अकरापर्यंत आम्ही झोपून जायच. सुरुवातीचे काही दिवस अगदी सुरळीत गेले. पण एका रात्री पहिल्यांदा काहीतरी विचित्र घडलं.

माझ्या मित्राला रात्री अचानक जाग आली. घड्याळात वेळ पाहिली तर अडीच वाजले होते. त्याला तहान लागली म्हणून तो उठून पाणी प्यायला गेला. परत आला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात किचनमधून एकदम काचेचा ग्लास पडल्याचा आवाज आला. तो दचकला. लगेच किचनमध्ये जाऊन बघितलं. तर किचनच्या कट्ट्यावर एक उंदीर उड्या मारत होता. त्यानेच ग्लास खाली पाडला होता. त्याला काही वाटलं नाही. तो ग्लास परत जागेवर ठेवून आला आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही उठून कॉलेजला गेलो, काम केलं, आणि रात्री पुन्हा रूमवर येऊन झोपलो. त्या रात्री मात्र सगळं बदललं. माझ्या मित्राला पुन्हा मध्यरात्री जाग आली. या वेळेला त्याला बाहेरून कुणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला. पैंजणांचा.. कोणी स्त्री चालत असल्याचा..

तो गोंधळला. मला उठवून विचारलं, “तुला काही आवाज ऐकू येतोय का? पैंजणांचा?” मी गाढ झोपेत होतो. मला काही कळलं नाही. उलट मीच म्हणालो,
“तुला भास होतायत बहुतेक. झोप आता.” पण त्याला मात्र आवाज सतत ऐकू येतच होता. त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं, पण कुणीही नव्हतं. शेवटी तो त्रासून कानात कापूस घालून झोपून गेला. असेच आठ दिवस उलटले. आता आम्हाला त्या घरात राहताना खूप विचित्र वाटू लागलं होतं. आणि मग आली ती नववी रात्र. तीही अमावस्येची. रात्री आम्ही दोघे जेवण करून झोपलो. पण त्या रात्री काही केल्या झोप लागत नव्हती. एक वाजून गेला तरी आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो. अचानक बाथरूममधून एक जोरदार आवाज आला – जणू काहीतरी जोरात खाली पडलं होतं. आम्ही घाबरून गेलो. मी मित्राला विचारलं,
“अरे, काय पडलं असेल इतक्या जोरात?” तो थरथरत म्हणाला, “मला काही कळत नाहीये.” दोघांनी धाडस करून बाथरूमचं दार उघडलं. आत सगळं अगदी व्यवस्थित होतं. काहीच पडलेलं नव्हतं..

आम्ही गोंधळलो. इतक्या मोठ्या आवाजाचं कारण काय असेल? असं कोणतंच मोठं सामान नाही. दार बंद करून आम्ही परत हॉलमध्ये आलो. आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज – यावेळी अजून जोरात आणि अगदी स्पष्ट.. आवाज पुन्हा बाथरूममधूनच आला होता. आमच्यात इतकी हिम्मत नव्हती की पुन्हा आत जाऊन पाहावं. आणि रूम सोडून इतक्या रात्री बाहेर कुठे जाणार. भीतीने थरथरत आम्ही हॉलमध्ये चं गादीवर झोपून राहिलो. भीती वाढतच गेली. बऱ्याच वेळा नंतर डोळा लागला. पण त्या शांत रात्रीत मला अचानक कोणी तरी चालण्याचा आणि पैंजणांचा आवाज ऐकू आला. हिवाळ्याची रात्र होती, तरी माझ्या अंगातून घामाच्या धाराच सुटल्या. माझा शर्ट पूर्ण भिजून गेला. भीती मूळे मला काहीच सुचेनासं झालं.

आम्ही चादर अंगावर ओढली आणि डोळे मिटून घेतले. आणि तेव्हाच कान बधिर करणारी किंचाळी आमच्या कानावर आदळली. आवाज इतका भयानक होता की आमचं हृदय धड धडू लागलं.. बाथरूम चा दरवाजाही एकदम जोरजोरात वाजू लागला. जणू कुणीतरी दरवाज्याला आतून लाथा घालत होतं. आम्ही दोघांनी घाबरून हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. पण दरवाज्याचे आपटणे सुरूच होते. काही वेळ गेला आणि एके क्षणी अचानक सर्व शांत झालं. पण खोलीतील वातावरण भयानक झालं होतं. माझा मित्र एकदम गप्प झाला होता. तो काहीच बोललं नाही. फक्त डोळे मिटून पडून राहिला. त्याला पाहून मीही शांत झोपायचा प्रयत्न केला. रात्री जवळपास तीन वाजले असतील. मी झोपेत असतानाच अचानक कानात कुजबुजल्यासारखं वाटलं.. कारण जणू कुणीतरी माझ्या अगदी कानाशी येऊन हलक्या आवाजात बोलत होतं.

मी दचकून जागा झालो. खोलीत पूर्ण काळोख होता, आणि फक्त खिडकीतून येणाऱ्या हलक्याश्या उजेडात पडदा हलताना दिसत होता. मी इकडे-तिकडे पाहिलं, पण कोणीच नव्हतं. माझा मित्र बाजूला झोपला होता, पण मला असं जाणवलं की तो शांत झोपेत नव्हता. तो खिडकीकडे तल्लीनपणे बघत होता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्याचे ओठ सतत हलत होते. जणू तो कुणाशी तरी बोलत होता. “अरे! तू कोणाशी बोलतोस?” मी हलक्या आवाजात विचारलं. पण त्याने काही उत्तर दिलं नाही. तितक्यात माझं लक्ष अचानक खिडकीच्या पडद्याकडे गेलं. आणि माझं रक्त गोठल्यासारखं झालं. पडद्याच्या पलीकडे एक उंचच उंच आकृती दिसत होती. लांब सडक केस, जे संपूर्ण चेहऱ्यावर आले होते. उंची किमान सात-आठ फूट असावी. त्या आकृतीचा चेहरा अंधारात दिसत नव्हता, पण तिची उपस्थिती इतकी भयाण होती की भीती ने माझे हातपाय गळून गेले.

मी एक शब्दही न बोलता चादर अंगावर ओढली आणि शांत राहिलो. हृदय एवढं जोरात धडधडत होतं की मला वाटलं, जणू त्या आवाजाने ते जे काही उभ ते आहे माझ्याकडे वळेल. काही वेळ असाच गेला. हळूहळू सगळं शांत झालं. माझा मित्रही शांत झाला. मी मात्र डोळे मिटून घामाने भिजलेल्या अवस्थेत पडून राहिलो. सकाळ होताच मी उठून थेट जवळच्या मंदिरात गेलो. तिथे कॉलेज मधले एक सर भेटले. माझा अवतार पाहून त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हा त्याच्याजवळ बसलो आणि काल रात्री घडलेलं सगळं तपशीलवार सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले. मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात सांगितलं, “बाळा, तुम्ही त्या घरात राहणं लगेच सोडून द्या. ते घर साधं नाही. आजवर ज्या कोणी मुलाने तिथे पाऊल ठेवलं आहे, त्याला भास झालेच आहेत. काहींचं तर मानसिक संतुलन बिघडलं.” मी घाबरून विचारलं, “असं का सर? त्या घरात असं काय आहे?” त्यावर ते म्हणाले, “ते घर पूर्वी एका विधवेचं होतं.

म्हणतात तिच्यावर खूप अन्याय झाला होता. तिला समाजाने हिणवलं, एकट पाडलं. शेवटी तिने स्वतःचा जीव त्या घरात संपवला. बाथरूम मध्ये तिच प्रेत सापडलं. तिचा आत्मा अजूनही तिथेच अडकून पडलाय.. विशेषतः अमावस्येला तिचं अस्तित्व प्रखर होतं. काल अमावस्या होती, म्हणून तुम्हाला इतका त्रास झाला.” मी थरथरत विचारलं, “मग आम्ही काय करायचं?” त्यांनी फक्त एकच सांगितलं, “जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर ते घर रिकामं करा. त्या आत्म्याचा राग मुलांवर पुरुषांवर आहे. म्हणून ते घर त्यांच्यासाठी घातक आहे. जर तुम्ही जास्त दिवस तिथे राहिलात तर मोठा अनर्थ होईल.” मी त्यांचे आभार मानले आणि थेट रूमवर परत आलो. मित्राला सगळं सांगितलं. त्याचा चेहरा पांढराफटक झाला होता. तो काही बोललाच नाही. फक्त मान हलवली. 

आम्ही लगेच ठरवलं – आजच घरच्यांना फोन करून सगळी माहिती द्यायची. आम्हाला सुरुवातीला हे सांगायला भीती वाटत होती, पण आता परिस्थिती गंभीर झाली होती. मी आईला फोन करून सगळं उघड केलं. आईने घाबरून सांगितलं, “बाळा, ताबडतोब ती खोली सोडून दुसरीकडे जा. पैशांची चिंता करू नकोस.”

माझ्या मित्रानेही आपल्या घरच्यांना सांगितलं. त्यांनी त्याला लगेच पुण्यातील एका नातेवाईकाकडे काही दिवस राहायला सांगितलं. त्या दिवशीच आम्ही आपली बॅग्स भरल्या. तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही.

Leave a Reply