आजही जेव्हा त्या घटनेची आठवण काढतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. ही साधी गोष्ट नाही, तर आमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे जो याच वर्षीचा आहे. २६ फेब्रुवारी २०२५. सकाळपासूनच आमच्या आठ जणांच्या ग्रुपमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. कॉलेजचे दिवस संपले होते, कामं, जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, पण अधूनमधून सगळे एकत्र भेटून कुठेतरी ट्रिपला जायचं हे आमचं ठरलेलं. त्या दिवशी मी, स्वप्नील, पूनम, राजेश्वरी, एकता, मयूर, साहिल आणि प्रियंका – असे आठ जणांनी ठरवून कोकण ट्रिपचा प्लॅन केला. पहिला मुक्काम खेडला करायचा होता. माझ्या मित्राच्या गावी थांबून आम्हाला तिकडून मार्लेश्वर आणि इतर ठिकाणं पाहायची होती. रात्री प्रियांका च्या घरी मुक्काम करायचा होता. दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे दर्शन करून गाडी बोटीत टाकून आम्ही दापोलीकडे, प्रियंकेच्या मूळ गावी जायचं ठरवलं होतं. कार्यक्रम ठरलेला, सगळ्यांमध्ये एकदम उत्साह होता. कोकण म्हटलं की हिरवागार निसर्ग, समुद्र, डोंगरदऱ्या, जुने वाडे, पावसात भिजलेले मातीचे रस्ते…
या सगळ्याच्या प्रतिमा आधीच डोळ्यासमोर तयार झाल्या होत्या. पण त्या सुंदर निसर्गामागे आमच्यासाठी काय दडून ठेवलय याची कोणालाच कल्पना नव्हती. सकाळी सगळे गाडीत बसलो तेव्हा वातावरण खूप मस्त होतं. स्वप्नील ड्रायव्हिंग सीटवर, बाकी सगळे एकमेकांशी जोक्स मारत, गाणी लावून मजेत प्रवास करत होतो. खिडकीबाहेरून झाडांच्या रांगा मागे सरकत होत्या. रस्त्यावर क्वचित एखादं छोटे गाव, एखादा पानटपरीवर चहा घेत उभा असलेला व्यक्ती नजरेस पडत होता. सगळं काही शांत, मोकळं आणि प्रसन्न. मी स्वतः खूप sensitive आहे. नवीन ठिकाणी गेल्यावर मला तिथलं वातावरण पटकन जाणवतं. त्या दिवशी सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण आत कुठेतरी एक हलकंसं अस्वस्थपणं सुरू झालं होतं. पण तो विचार मनातून बाजूला सारून मी ट्रिप एन्जॉय करायचं ठरवलं. मार्लेश्वरला गेलो, मंदिर दर्शन केलं. दिवस खूप छान गेला.
दुपारच्या उन्हात समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून दूरवर पसरलेली निळाई पाहताना सगळे भारावून गेलो होतो. गणपतीपुळ्याचं दर्शन झाल्यावर आम्ही गाडी थेट दापोलीच्या दिशेने वळवली. समुद्रकिनाऱ्यावरून बोटीत गाडी चढवण्याचा अनुभव बहुतेकांसाठी पहिलाच होता. सूर्य मावळतीकडे झुकला होता. आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. समुद्राच्या पाण्यावर ते रंग उमटत होते आणि खरं सांगायचं तर तो क्षण खूप सुंदर होता. आम्ही बोटीत उभं राहून हसतखेळत फोटो काढत होतो. थंड वारा येत होता त्यामुळे छान वाटत होतं. त्या सुंदर क्षणात आम्ही गुंग होतो, पण मनाच्या कुठेतरी मागे एक अज्ञात भीती मला सतावत होती. शेवटी बोट किनाऱ्यावर पोहोचली आणि आम्ही दापोलीजवळ असलेल्या प्रियांकाच्या गावाकडे जायला निघालो. गावाचे नाव सांगणे मुद्दामून टाळतोय. साधारण साडे सात झाले होते.
अंधार गडद होऊ लागला होता. आमच्या गाडीने गावाची वेस ओलांडली. कोकणातली लहान गावं म्हणजे एखाद्या कथेतूनच उतरलेली वाटतात. मोठमोठी आंब्याची झाडं, पायवाटांनी जोडलेले वाडे, आणि आजूबाजूला गडद जंगल. गाडी जशी प्रियंकाच्या घराकडे गेली तसं माझ्या अंगावर एक विचित्र दडपण येऊ लागलं. अचानक वातावरण गंभीर झालं. दिवसभर हसणं-खिदळणं चाललं होतं, पण त्या क्षणी सगळ्यांनी आपोआप शांतता धरली. प्रियांकाच घर बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. मुलींनी झाडाझडती करून थोडं साफसफाईला सुरुवात केली. आम्ही मुलं सामान उतरवत होतो. मला मात्र सुरुवातीपासूनच अस्वस्थ वाटू लागलं. जणू काही कुणीतरी या घराकडे डोळे लावून बसलं आहे अशी जाणीव होत होती. मी तो विचार मनातून काढायचा विचार केला पण काही केल्या ते मला जमत नव्हतं. “सगळे थकले आहेत, उगाच काही बोलून त्यांचा मूड खराब करायचा नाही,” असं म्हणून मी शांत राहिलो.
प्रवासाचा थकवा होता, म्हणून आम्ही ठरवलं की आज खास जेवण बनवायचं. पोपटी आणि सोबत सुख चिकन. त्यासाठी लागणारं बाकी साहित्य आधीच आणलं होतं. ज्यांना पोपटी हा प्रकार माहित नाही त्यांच्यासाठी थोडं सांगतो. हा कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा प्रकार आहे. पोपटी ही शाकाहारी तसेच मांसाहारी या दोन्ही प्रकारात केली जाते. पोपटी मडक्यात शिजवण्याची पद्धत आहे. हिवाळ्यात शेतात पिकणाऱ्या वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी, वांगी, बटाटे इत्यादी पदार्थ एकत्र केले जातात, मडक्याच्या बुडात भांबुर्डीचा पाला घालून त्यात भाज्यांचे थर रचले जातात. जर तुम्ही मांसाहार करणार असाल तर त्यात चिकनला मसाला लावून केळीच्या पानात बांधून टाकले जाते. त्यांनंतर या मडक्याचे तोंड पाल्याने झाकून उलटे ठेवले जाते, नंतर अजूबाजुला गवत, गोवऱ्या आणि लाकडे लावून त्याची शेकोटी पेटवली जाते. आम्ही सगळे सामान आणले होते पण फक्त एक मोठं मडके पोपटीसाठी हवं होतं.
घराची देखभाल करणाऱ्या काकांना बोलावून आणलं पण त्यांना मडके मिळाले नाही त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पण नंतर काकांच्या घरातूनच एक जुनं मडक मिळालं. मुली स्वयंपाकघरात तयारीला लागल्या आणि आम्ही मुलं पोपटी बनवण्यासाठी घरा बाहेर पडलो. स्वप्नील ने हातात बॅटरी घेतली होती. पोपटी नेमकी कुठे करायची हा प्रश्न उभा राहिला. घराच्या मागे घनदाट जंगल होतं. झाडांच्या सावल्या इतक्या गडद होत्या की तिथे पाऊल टाकायलाही कुणी तयार नव्हतं. दाट झाडांमुळे चंद्रप्रकाशाचा एकही किरण तिथवर पोहोचत नव्हता. प्रियंका म्हणाली, “मागे नको. घरासमोर करूया. तिथे किमान थोडं उजेड आहे.” मग आम्ही घरासमोरच लाकडं, गवत, गौऱ्या वगैरे जमवून पोपटीचं मडके लावलं. अंगणात पिवळसर बल्बचा अंधुक उजेड पडत होता. बाकी सगळीकडे काळोख पसरलेला होता. तेवढ्यात स्वप्नीलने अचानक टॉर्च मडक्याच्या बाजूला मारली.
तिथं त्यानं असं काही पाहिलं की तो अचानक गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मी घाबरलो. कारण स्वप्नील म्हणजे आमच्यातला सगळ्यात धाडसी. प्रवासभर तो गाडी चालवत होता, सतत हसत-खेळत सगळ्यांना जोशात ठेवत होता. पण त्या क्षणी त्याचा चेहरा फिक्कट पडला होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून कुजबुजत सांगितलं “इकडे बघ जरा, हे काय आहे रे”
मी खाली पाहिलं… आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. जमिनीवर कुणीतरी पिवळ्या-लाल हळदीकुंकवाने गोलाकार रेषा काढल्या होत्या. मध्ये काळी राख पसरवलेली होती. काही विचित्र आकृत्या, जणू एखाद्या विधीचं चिन्ह. जे पाहून माझी चांगलीच तांतरली होती. आम्ही अंगणात लाकडं शोधत होतो तेव्हा तिथे काहीच नव्हतं. मग एवढ्या थोड्या वेळात हे सगळं कुणी केलं? आणि का? कस शक्य आहे हे..? मी भीतीने थरथरत म्हणालो, “हे… हे आधी नव्हतं रे.”
स्वप्नीलने काही न बोलता टॉर्च बंद केली. त्याच्या डोळ्यांतली चमक गायब झाली होती. क्षणभर आम्ही दोघं तिथे स्तब्ध उभे राहिलो. जणू काळच थांबला होता. आसपासची झाडं वाऱ्याने हलत होती आणि त्यांच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकार काढत होत्या. दूरवर रातकिड्यांचा आवाज वाढत होता, पण तोही त्या शांततेला भेदू शकत नव्हता. मी पटकन घराकडे धावलो. आत गेल्यावर मी सगळ्यांना बोलावलं. “लवकर बाहेर या, इकडे काहीतरी विचित्र आहे!” सगळे धावत बाहेर आले. टॉर्चचा उजेड मारला आणि जमिनीवरील ते विचित्र चिन्ह सगळ्यांनी पाहिलं. मुलींच्या चेहऱ्यावर भीती उमटली. प्रियंका हाताने तोंड झाकून उभी राहिली. “हे काय आहे?” पूनम घाबरत म्हणाली.
“आपल्या सोबत कुणीतरी खेळ करतंय का?” मयूरने अंदाज लावला.
पण मला ठाऊक होतं – हा प्रकार साधा नाही. माझ्या अंगातलं अस्वस्थपणं आणखी वाढलं. आम्ही चर्चा करत उभे होतो, तेव्हा अचानक लक्षात आलं की राजेश्वरी आमच्यात नाहीये. आम्ही इकडे-तिकडे पाहिलं.
ती घराच्या खिडकी जवळ उभी होती. तिचा चेहरा निर्विकार. डोळे सरळ अंगणाकडे खिळलेले. तिला आमच्या आवाजाचा काहीच फरक पडत नव्हता.
“राजेश्वरी! अग इकडे ये!” साहिलने हाक मारली. ती हललीच नाही. प्रियंका घाबरून तिच्याजवळ गेली आणि हाताला धरून ओढलं. तेव्हाच राजेश्वरी जणू अचानक भानावर आली. तिच्या डोळ्यांत प्रचंड भीती दिसत होती. “इकडे काहीतरी बरोबर नाही. आपण इथून निघून जाऊया,” मी ठामपणे म्हणालो.
पण प्रियंका गोंधळली. “अरे पण एवढ्या रात्री कुठे जाणार? आम्ही जेवण बनवतोय, झाले की जेवून घेऊ आणि थोड्या वेळ झोपून पहाटेच निघू.”
या सगळ्या प्रकारामुळे सगळ्यांचा मूड खराब झाला होता म्हणून आम्ही तिथून निघायचे ठरवले. मुली स्वयंपाकघरातलं काम थांबवून बाहेर आल्या होत्या. अंगणात अजूनही मडकं आणि पोपटीचं साहित्य तसंच पडलं होतं. “पोपटीचं काय करायचं?” मयूर म्हणाला. प्रियंका म्हणाली , “मी जाते. मीच टाकून येते ते मडकं.” तिच्यासोबत साहिलही निघाला. ते दोघं पोपटी टाकायला गेले आणि आम्ही बाकीचे अंगणात उभे होतो. तेवढ्यात माझी नजर समोर जंगलाच्या भागात गेली. अंधार दाटून बसला होता. बल्बचा पिवळसर उजेड जेमतेम पाच-दहा फूट पसरत होता, त्यापलीकडे अगदी काळोख. माझं लक्ष अचानक त्या काळोखात गेलं… आणि मी थिजूनच गेलो. कारण तिथे कुणीतरी उभं होतं. मानव सदृश्य आकृती, उंच, सडपातळ. चेहरा काळोखाने झाकलेला. त्याचे डोळे मात्र जणू सरळ माझ्याकडेच बघत होते. मी क्षणभर माझे डोळे मिचकावले. पुन्हा पाहिलं तर तो तसाच उभा. हलत नव्हता. फक्त उभा. जणू एखाद्या जिवंत पुतळ्या सारखा. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी काही बोलणार इतक्यात स्वप्नील माझ्या बाजूला आला “काय झालं?” पण मी इतका घाबरलो होतो की त्याला काहीच बोलू शकलो नाही.
प्रियंका आणि साहिल पोपटी टाकून परत आले. त्यांच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता दिसत होती. “चल, आता पटकन गाडी काढू,” प्रियंका म्हणाली. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणीही थांबायच्या मूडमध्ये नव्हतं. आम्ही घाईघाईने सामान गाडीत टाकलं. तेवढ्यात मयूर आणि स्वप्नील आत गेले आणि उरल्या सुरल्या गोष्टी घेऊन बाहेर आले. पण राजेश्वरी पुन्हा शांत उभी राहिली होती. पूनम आणि एकता तिला धरून गाडीकडे घेऊन गेल्या. संपूर्ण वेळ मला जाणवत होतं – कुणीतरी आम्हाला बघतंय. घराच्या सावल्या जिवंत झाल्यासारख्या भासत होत्या. शेवटी गाडी सुरू झाली. आम्ही गावाच्या वेशीपर्यंत पोहोचलो. अंधारातल्या त्या लहानशा रस्त्यावरून गाडी जात होती. तेवढ्यात… माझ्या कानावर एक विचित्र आवाज आला जणू आमच्या गाडीजवळ किंवा कदाचित आत कोणी तरी आहे. एक भयानक आवाज. मी सगळ्यांकडे पाहिलं पण तो आवाज फक्त मलाच ऐकू आला होता त्यामुळे मी कोणाला काहीच सांगितले नाही. गाडी गावाच्या वेशीपलीकडे गेली तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पण वातावरण अजूनही जड होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं. पण ते कोणी बोलून दाखवत्ता नव्हतं. मी मात्र आतून हादरलेलो होतो. कारण तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. मी मागे वळून पाहायचं धाडस केलं नाही. मनात भीती होती – जर खरंच कुणीतरी मागे असेल तर? रस्ता लांब पसरलेला होता. गाडीच्या हेडलाईट्सने समोरचा भाग उजळला होता, बाकी सर्वत्र काळोख. साहिल गाडी चालवत होता. स्टेअरिंग घट्ट पकडलेलं त्याने. त्याच्या ही डोळ्यांत एक वेगळं ताण दिसत होता. गाडीत सगळे गप्प. फक्त इंजिनाचा आवाज आणि अधून मधून रातकिड्यांचा किर्रर्र आवाज. पूनम हलक्या आवाजात म्हणाली, “आपण खरंच बरोबर केलं ना? तिथून लगेच निघून?” स्वप्नीलने तिला उत्तर दिलं नाही. फक्त मान हलवली. राजेश्वरी मागच्या सीटवर बसली होती. तिचा चेहरा अजूनही निर्विकार. जणू ती अजूनही अर्धवट भानावरच होती. एकता तिचा हात धरून बसली होती.
असं म्हणतात की, भीतीचा अनुभव जसा लांब जातो तसतस मन मोकळं होऊ लागतं. गाडी गावापासून दूर गेली तसं थोडं हलकं वाटू लागलं. साधारण तासाभराने आम्ही खेडला माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो. तिथलं वातावरण वेगळंच होतं – गजबजलेलं गाव, प्रकाशमान रस्ते, लोकांची ये-जा. तिथे आल्यानंतर पहिल्यांदा वाटलं की आपण सुरक्षित आहोत. पण माझ्यासाठी ती रात्र सोपी नव्हती. डोळे मिटले की त्या गडद अंधारात उभी असलेली मानव सदृश्य आकृती दिसत होती. कानात पुन्हा पुन्हा तोच आवाज घुमत होता. ट्रिप संपवून आम्ही सगळे दोन दिवसांनी परत आलो. आम्ही परत आल्यावर प्रियंकाशी बोललो. तिच्या गावी राहणाऱ्या एका वयोवृद्ध माणसाला तिने ही गोष्ट सहज सांगितली.
त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने सांगितलं – “तुम्ही जिथे थांबलेलात ना, ती जागा चांगली नाही.. जंगलाच्या कडेला तुम्हाला जर हळदीकुंकवाचे चिन्ह दिसले असेल, तर ते ‘आत्म्याला शांत करण्यासाठी’ करतात पण कधी कधी उलट परिणाम होतो…” ते ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. आम्हाला अजूनही एक प्रश्न सतावत होता – राजेश्वरी खिडकीत उभी राहून स्तब्ध का झाली होती? तिला असं काय झालं होतं? घरी आल्यावर दोन-तीन दिवसांनी आम्ही तिला भेटलो. थोडं शांत झाल्यावर तिने सगळं सांगितलं. तिचा आवाज अजूनही थरथरत होता. “मी खिडकीत उभी होते… मला सगळ्यांचे आवाज ऐकू येत होते. तुम्ही मला हाका मारत होता, मला कळत होतं. पण माझं शरीर हलतच नव्हतं. जणू कोणीतरी मला जखडून ठेवलं होतं. मी ओरडूही शकत नव्हते.”
आम्ही सगळे स्तब्ध झालो. कारण मी जे अंगणात पाहिलं होतं, तेच तिलाही खिडकीबाहेर दिसलं होतं. आजही माझ्या मनात एकच विचार येतो जर आपण तिथे रात्रभर थांबलो असतो तर काय झालं असतं? जर पोपटी बनवायला मागच्या जंगलात गेलो असतो तर?..