हा अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे. थंडीचे दिवस होते, आणि मी एका मित्राच्या गावी गेलो होतो. ते गाव लांबच्या डोंगरमाथ्यावर वसलेलं होतं, जिथं रात्रीचा गारठा अंग गोठवणारा असायचा. मित्राच्या गावी एका लग्नाची तयारी सुरू होती, आणि आम्ही काही दिवस राहायला गेलो होतो. गाव अगदी लहानसं होतं, जेमतेम वीस-तीस घरं. दिवसभर लगबग आणि गोंगाट असायचा, पण रात्री सगळं गाव शांत झोपून जायचं. पहिल्या दिवशीच मला कळलं की गावात एक जुनं, पडक घर आहे, जिथं कोणी जात नाही. त्या घराभोवतीचं वातावरण काहीसं वेगळं वाटायचं. मी तिथल्या लोकांकडून ऐकले की ते घर ‘शापित’ आहे. तिथं पूर्वी एक संपूर्ण कुटुंब एका रात्रीत संपलं होतं, कस ते कोणाला माहित नाही. त्यांचा शेवट गूढ रित्या झाला होता. आणि त्यानंतर कुणी तिथं राहत नाही. गावातली मुलं-मुली त्या घराचा उल्लेख जरी केला तरी विषय बदलायची आणि लगेच त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसायची.

सुरुवातीला मला ही निव्वळ भाकडकथा वाटली पण त्या नंतर जे घडलं, त्यानं माझं मत कायमचं बदललं. ती रात्र मला अजूनही आठवतेय. त्या रात्री सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. थंडी इतकी होती की बाहेर थोडा वेळ उभं राहणंही कठीण होतं. पण तरी सुद्धा मी आणि माझा मित्र रात्रीच जेवणं आटोपून गावाबाहेर चालायला निघालो. मी मित्राला म्हणालो की ते घरं मला पाहायचं आहे. तो ही जास्त काही बोलला नाही. चालत चालत आम्ही त्या घराजवळ पोहोचलो. घर खरंच भयानक होतं – छत पडलेलं, भिंतींवर शेवाळ धरलेलं, आणि खिडक्यांचे दरवाजे तुटले होते. वातावरणात एक प्रकारची थिजवणारी थंडी होती, जी घराजवळ गेल्यावर जास्तच जाणवत होती. मित्राने अडवले आणि म्हणाला “बस झालं.. इथपर्यंत आलो तेवढे पुरे झाले, आता निघू इथून..” पण मी इथं पर्यंत येउन थांबणाऱ्यातला नव्हतो. मी हसून म्हणालो, “अरे, गावकऱ्यांनी उगीच भिती पसरवली असेल.” आणि मी त्या घराच्या आवारात चालायला सुरुवात केली.

भिंतीचा काही भाग तुटून खाली पडला होता. त्यामुळे पायाखाली तो भाग सतत येत होता. मित्र थोडा मागेच थांबला होता. मी घराजवळ गेलो, आणि एका फटीतून आत डोकावलं. आत काहीच नव्हतं, सगळीकडे फक्त अंधार पसरलेला होता. पण मला असं वाटलं की आत कुठेतरी हालचाल झाली. मी मागे वळून मित्राला विचारलं, “तुला काही ऐकू आलं का?” तो फक्त नकारार्थी मान हलवत दचकून मागे हटला. तितक्यात माझ्या पायाखाली तुटलेल्या लाकडाचा तुकडा येउन जोरात सारकला. त्या आवाजानं सगळं वातावरण जड झाल्यासारखं वाटलं. आणि पुढच्या क्षणी मला घराच्या आतून अस्पष्ट हसण्याचा आवाज आला. आवाज इतका भयंकर होता की माझं हृदय धडधडायला लागलं. पण मला वाटलं मी चुकीचं काहीतरी ऐकलं असेल, मला भास झाला असेल. पण पुन्हा तोच आवाज ऐकू आला, या वेळेस जरा स्पष्ट आणि जवळ. जणू कोणी खूप वेडसरपणे हसत होतं. मी थोडासा हादरलो, पण माझ्या पावलांनी मला पुढे खेचलं. मी घराच्या बंद दरवाजाजवळ गेलो. दरवाजा अर्धवट उघडलेला होता.

मी तो हलकासा ढकलला आणि आत डोकावले. दरवाजा उघडल्यामुळे रस्त्या वरच्या स्ट्रीट लाईट चा प्रकाश काहीसा आत पडत होता. आत एक जुनी, धुळीने भरलेली खोली दिसली. माझी नजर सर्वत्र फिरू लागली. एका कोपऱ्यात जुन्या लाकडी खुर्चीवर काहीतरी बसलेलं होतं, पण अंधारामुळे मला स्पष्ट दिसत नव्हतं. मी पुढे सरकलो, आणि त्या गोष्टीकडे बघितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती एक बाहुली होती – एक अतिशय विचित्र दिसणारी बाहुली, जी जणू माझ्याकडेच बघत होती. मी बाहुलीकडे पाहताच एका थंड वाऱ्याची झुळूक आली, आणि माझ्या अंगावर काटा आला. तितक्यात ती बाहुली खुर्चीवरून खाली पडली आणि मी घाबरून दोन पाऊल मागे सरकलो. तितक्यात त्या खुर्ची मागून 2 पिवळ सर डोळे चमकले आणि मी प्रचंड घाबरलो. माझा श्वास कमी पडू लागला, ते जे काही होतं ते पाहून मला भोवळ आली आणि मी त्या दारातच बेशुद्ध पडलो. 

जाग आली तेव्हा मित्राच्या घरी होतो. त्याच्या घरातले आणि इतर ही गावातली लोक जमली होती. मित्राला खूप बोलत होते की तो नवीन आहे पण तुला अक्कल नाही का..? तुला वेगळे सांगायला हवे कां..? माझा मित्र मान खाली घालून निमूटपणे सगळे ऐकत उभा होता. सगळी लोक गेल्यावर तो माझ्या जवळ आला आणि माझी तब्येत ठीक आहे कां ते विचारले. नंतर तो म्हणाला की तुला मी तिथे जायला बजावत होतो याचे हेच कारण होते. तू बेशुद्ध पडलास आणि मी कसे बसे तुला त्या घराच्या आवारातून बाहेर काढले. नंतर जाऊन गावातल्या दोघां तिघांना मदतीसाठी बोलावले. ते ही यायला धजावत नव्हते पण मैत्रीसाठी आले. त्याच बोलणं ऐकून मला माझी चूक कळली होती. त्या रात्री मी झोपलोच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी निघून आलो पण येताना एकटा नाही आलो. कारण अजूनही मला एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाहिल्यावर ते पिवळसर डोळे चमकताना दिसतात. या सगळ्यातून मी कधी सुटेन ते विधात्यालाच माहित.. 

This Post Has One Comment

  1. shraddha dalvi

    खरंच मला तुमचा चॅनेल वर कथा ऐकल्याला खुप आवडे खरंच खूप छान कथा अस्तत…वास्तविक मी एक कथा शोधते आहे ज्यात फोटोग्राफर च अपघात हुन तो भूत बनतो ..एक मला तुमचा चॅनल वर कथा…कथा आदि ऐकताना भेटती मला आशा समझते तो फोटोग्राफर भूत अस्तो तो मुलाचे फोटो काढतो ..आनी ते तिच्या घरी पथवतो …तुम्ही मला लिंक पाठवू शकता का

Leave a Reply