अनुभव – सानिका
ही गोष्ट माझ्या मावशीच्या लहानपणीची आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. आजोबा Bombay Port Trust मध्ये कामाला असल्यामुळे सर्वजण BPT कॉलनीमध्ये रहायला होते. एकूण ३ जण – माझी आई मोठी, त्यानंतर मामा, आणि सर्वात लहान माझी मावशी. साधारण १४ वर्षांची. राहतं घर काही कारणामुळे सोडून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये काही काळासाठी शिफ्ट व्हायचं ठरलं. ते घर बघितलं तर पूर्ण काळवंडलेलं होतं, जसं काही आधी जळून गेलं होतं. त्या घराला त्यांनी रंग दिला आणि तिथे रहायला गेले. घरात हे तिघे भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि आजोबांची आई. एकूण ६ जण. सुरुवातीला सर्व काही नीट होतं. पहिला प्रसंग हा आजोबांच्या आईला आला म्हणजे माझ्या पणजी ला. एके दिवशी संध्याकाळी त्या बेडवर पांघरूण घेऊन बसल्या होत्या.
आजी किचनमध्ये काम करत होती आणि बाकी सर्वजण हॉलमध्ये टीव्ही बघत होते. काय झाले माहित नाही ती अचानक खूप जोरात ओरडली. म्हणजे तो आवाज तिचा होता असे वाटले पण त्या भयानक आवाजावरून तो आवाज नक्कीच तिचा नव्हता. एकदम अमानवीय. जणू राक्षसासारखा. सगळे खोलीत धावत आले आणि तिच्याकडे पाहतच राहिले. डोळे मोठे झालेले, चेहरा लाल आणि रागाने भरलेला. पांघरुणाने तोंड धरून ते दातांनी फाडलं होतं. हे सगळं एका म्हाताऱ्या स्त्रीला करणं शक्यच नव्हतं. काही वेळ हा प्रकार असाच होतं राहिला. खूप वेळानंतर त्या शांत झाल्या. मग त्यांना जेवण भरवलं. नंतर विषय निघाला की नक्की असे काय झालं असावं.. कारण या आधी असा प्रकार कधीच झाला नव्हता. बऱ्याच वेळानंतर निष्कर्ष निघाला की डायबेटीस असल्यामुळे औषधांच्या रिऍक्शनमुळे असं झालं असावं. पण हे सगळं इतक्यावर थांबणार नव्हतं.
काही दिवस उलटले. तेव्हा पाणी बाहेरून भरावे लागायचे कारण घरात पाण्याचा नळ नव्हता. त्या दिवशी मावशी पाणी भरत होती. अचानकच तोच भीषण ओरडण्याचा आवाज आला. खूप जोरात आणि भयंकर. आणि त्या आवाजासोबतच बाहेरची सर्व कुत्री अचानक ओरडायला लागली, विचित्र आवाजात रडू लागली. मावशी तेव्हा खूप लहान होती. ती घाबरली आणि तितक्यात कोणीतरी तिला मागून पकडलं. विचित्र गोष्ट ही होती की तिला कोणीही दिसत नव्हतं पण तिला दोन्ही बाजूनी घट्ट पकडल्या सारखं वाटत होतं. सर्वजण त्या आवाजाकडे धावत गेले त्यामुळे मावशीकडे कोणाचे लक्ष चं गेलं नाही. खर तर ती खूप घाबरली होती पण कोणाला काहीच बोलली नाही. तो जीवघेणा प्रसंग तिने स्वतः पुरताच मर्यादित ठेवला.
काही दिवसांनी, मावशी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि घरी परतत होती. पायऱ्या चढत असताना अचानक तिला असे जाणवले की कोणीतरी मागून हाताने घट्ट आवळले आहे. तिला काही कळेना काय करावं. ती आपल्या दोन्ही हातानी त्या एका हाताची पकड सोडविण्याचा प्रयत्न करू लागली तसे एक जोराचा धक्का देत पायऱ्यांवरून खाली ढकललं. मावशीने कसाबसा तोल सावरला म्हणून तिला जास्त काही लागलं नाही. फक्त हातापायांना खरचटल होतं. तिने पडताना वरच्या बाजूला पाहिलं तर तिथे फक्त तो हात होता बाकी कोणीच नाही. त्या दिवसा नंतर मावशीने धसकाच घेतला. तीचं वय तेव्हा खूप कमी होतं त्यात ती या गोष्टी हे भयानक प्रसंग कोणालाच सांगत नव्हती. त्यामुळे घरी ही कोणाच्या लक्षात आले नाही की तिच्या सोबत नक्की काय घडतंय. ती कोणत्या प्रसंगाना सामोरे जातेय. आजोबांना भुताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. आणि या अश्या गोष्टी घरी कधी ही बोलल्या जात नसत.
त्या दिवशी रात्री घरी फक्त हे तिघेच होते. वातावरण तसं शांत होतं पण अचानक कुठून तरी खूप जोराचा वारा सुटला. बंद असलेल्या खिडक्या आपोआप उघडल्या. तो वारा घरात घुसला तसे कपाटावर आणि टेबलावर ठेवलेले काही सामान ही पडले. बाहेर असलेले जुने ब्लब जे कित्येक वर्षांपासून बंद पडले होते ते अचानक सुरु झाले. या सगळ्यात मावशीला पून्हा जाणवू लागलं की तिला कोणीतरी पकडलं आहे. ती घाबरून देवघरा समोर जाऊन बसली. काही वेळाने सगळं शांत झालं. हे असे प्रसंग कित्येक महिने घडतं राहिले. साधारण वर्ष भराने त्यांनी ते घर सोडले आणि दुसऱ्या जुन्या घरात राहायला गेले. त्या नंतर घरात असे अनुभव आले नाहीत पण मावशीचा त्रास काही थांबला नाही. या सगळ्यात बरीच वर्ष उलटली. मावशी लग्नाच्या वयात आली. गोरीपान, दिसायला देखणी पण अगदी नाजूक.
काही करणाने तिचं लग्न ठरत नव्हतं. आणि याच कारण ही कोणाला कळतं नव्हतं. दर वर्षी प्रमाणे गावात यात्रा भरायची. तेव्हा घरच्यांनी एका जाणकार बाईकडे मावशीला दाखवायचे ठरवले. त्या बाई ने बघताच क्षणी सांगितले “ही बाधित आहे.. हिला ज्याने झापटलं आहे ते साधं सावट नाही एक खूप वाईट शक्ती आहे.. तुलना करायची झाली तर एखाद्या राक्ष साशी करू शकता.. जो खूप भयंकर आहे.. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तिच्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न करतोय..“ आजोबांना या गोष्टी जरी पटत नसल्या तरीही त्यांनी एकदा विश्वास ठेवायचं ठरवलं. त्या बाई ने त्यांना उपाय सांगितला. तसे त्यांनी त्यावर उतारा करून एके ठिकाणी नेऊन टाकला. पुढच्या महिन्यात मावशीच लग्न ठरलं.
नंतर घरच्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की ते ज्या घरात वर्षभर राहिले होते तिथे एक अतिशय वाईट आणि घाणेरड्या वृत्तीचा माणूस राहत होता. पूर्ण दिवस रात्र दारू इथे राहायचा, सगळ्यांना त्रास द्यायचा. एके दिवशी त्याने अचानक आत्महत्या केली. आता असे तिथले लोकं म्हणतात पण नक्की त्याचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच माहित नाही. त्याच्याच अतृप् आत्म्याने मावशीला जखडून ठेवले होते..