शहरात शिकायला आल्यावर घर शोधणं माझ्या साठी मोठं आव्हाहन होतं. बरेच दिवस प्रयत्न करत होतो, जेवढ्या ओळखी काढता आल्या तेवढ्या काढून झाल्या. त्यांच्या मार्फत जिथे कुठे भाड्यावर घरं मिळतंय तिथे जाऊन चौकशी करून आलो. पण शहरातल्या फ्लॅट्स आणि घरांच्या किंमती ऐकून घाम फुटायची पाळी आली. पण मी माझे प्रयत्न सुरु ठेवले. शहरात भाड खूप असल्याने मुख्य शहरापासून थोडं दूर एखाद घरं मिळतंय का ते पाहू लागलो. आणि नशिबाने एका जुन्या वाड्यात एक लहान खोली स्वस्त दरात भाड्यावर मिळाली. घर म्हणण्या पेक्षा वाडा म्हंटलेलं योग्य वाटेल. साधारण 6 खोल्यांचा जुना वाडा. त्यात मालक एका खोलीत राहायचा आणि दुसरी खोली मला भाड्यावर दिली होती. इतर 4 खोल्या बंद होत्या, कदाचित कोणी भाडेकरू मिळाले नव्हते. मी 11 महिन्यांचा करार करून, डिपॉझिट वैगरे भरून तिथे राहायला आलो. सामान असे काही खास नव्हते. जेवढे आवश्यक तेवढेच घेऊन आलो होतो.

खोलीत एक पलंग आणि कपाट होते. त्यात होते नव्हते तेवढे माझे सामान रचून ठेवले. मालकाने जवळच एका मेस मध्ये जेवणाची व्यवस्था करून दिली होती त्यामुळे जेवणाचा प्रश्न मिटला होता. 2-3 दिवस असेच गेले. तिथे आजू बाजूला घरं होती पण मी नवीन असल्याने जास्त बोलणं व्हायचं नाही. एकदा असेच कॉलेज मधून खोलीवर परतत होतो तेव्हा वाटेत एक आजोबा भेटले. माझी विचारपूस करू लागले की नवीन दिसतोस, कुठे राहतोस, काय करतोस वैगरे. मी हीं त्यांना आवश्यक तेवढीच माहिती दिली. जेव्हा मी म्हणालो की पाराजवळच्या जुन्या वाड्यात एक खोली भाड्यावर घेऊन मी राहतोय तेव्हा ते माझ्या कडे काही सेकंद पाहतच राहिले. आणि नंतर काहीच न बोलता तिथून निघून गेले. मला थोडं विचित्र वाटले पण मी जास्त लक्ष देत बसलो नाही. आठवडा होतं आला होता. हळू हळू सगळं सेट झालं. 

त्या दिवशी कॉलेज मधून तासभर उशिरा आलो. साडे सात झाले होते. सूर्य कधीच मावळतीला जाऊन अंधार पडला होता. खोलीत आलो, बॅग ठेवली आणि तितक्यात वीज गेली. आता मेणबत्ती आणि काडेपेटी आणली होती पण ती कपाटात ठेवली होती. मोबाईल काढून फ्लॅश लाईट लावला आणि त्याच्याच प्रकाशात शोध मोहीम सुरु केली. पण कोणत्या बॅगेत ठेवली होती तेच आठवेना. बऱ्याच वेळ शोधून ही सापडली नाही म्हणून मी तसाच बसून राहिलो. अर्धा तास झाला तरी विजेचा पत्ता नव्हता. असे फ्लॅश लाईट सुरु ठेवली आणि रात्रभर लाईट आली नाही तर मोबाईल ची बॅटरी उतरून तोही बंद पडेल. आणि मग वेळ घालवायला काहीच साधन उरणार नाही असा विचार करून मी खोली बाहेर आलो. मालकांना विचारून त्यांच्या कडे चार्जिंग बॅटरी किंवा एखादा दिवा जरी असला तर मागून घेऊ असा विचार केला.

त्यांच्या खोलीजवळ जाऊन दार वाजवल. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. काही वेळ वाट बघून पुन्हा दार वाजवल पण बहुतेक ते कुठे तरी बाहेर गेले असावेत. मी हताश होऊन मागे फिरलो तितक्यात वाड्याच्या एका कोपऱ्यातुन कसलसा आवाज आला. जसे कोणी अवजड वस्तू सरकावली असावी. मालक इथे आहेत तर.. मनोमन विचार करून मी त्या दिशेला चालत गेलो. त्या कोपऱ्यात खालच्या बाजूला जाण्यासाठी जिना दिसला. बहुतेक तळघरात जाण्याचा असावा. मालक इथे खाली काय करत आहेत असा विचार करून मी त्यांना हाक दिली आणि फ्लॅश च्या प्रकाशात च तो जिना उतरू लागलो.. खाली पाहिलं पण ते कुठे दिसत नव्हते. तितक्यात तळघरात दरवाजा सरकण्याचा आवाज आला. मी झटकन आवाजाच्या दिशेने टॉर्च फिरवली तर तिथे खरंच एक खूप जुना लाकडी दरवाजा होता.. तो दरवाजा अर्धवट उघडलेला दिसला.

माझ्या आत कुठेतरी भीतीची एक लहर उमटली, पण कुतूहल त्याहून जास्त होतं आणि म्हणून भीतीवर आपसूक मात मिळवली.. मी हळूच आत शिरलो. तळघर धुळीने भरलेलं होतं. भिंतींवर काळे चट्टे होते आणि तिथल्या हवेत एक विचित्र, जुनाट वास होता. जणू तळघरातली ती खोली बरेच वर्ष बंद असावी. मी मोबाईल फ्लॅश लाईट चौ फेर फिरवू लागलो तसे एका कोपऱ्यात काहीतरी चमकलं. मी त्या दिशेने फ्लॅश लाईट स्थिर केला तसे दृष्टीस पडला एक मोठा, प्राचीन आरसा. प्राचीन यासाठी म्हंटल की तो आरसा खरंच खूप वेगळा होता. काळ्या रंगाची लाकडी फ्रेम, त्यावर काही कोरीव अक्षरं. भाषा कळतं नव्हती नक्की कोणती आहे. त्यावर एक मोठे कापड टाकले होते जे संपूर्ण धुळीने भरलं होतं. नाका तोंडावर हात धरून मी ते कापड हळुवार पणे खेचले पण तरीही त्यावरच्या धुळीने जोरात शिंका आली. त्यातून सावरून समोर पाहिलं तर माझच प्रतिबिंब आरश्यात दिसलं आणि एका क्षणासाठी घाबरलोच.

मग मनोमन च हसलो. पण का कोण जाणे माझं लक्ष त्या आरश्यातल्या माझ्याच प्रतिबिंबाकडे खिळलं. म्हणजे इच्छा असून सुद्धा मी त्यावरून माझी नजर हटवू शकत नव्हतो. पण अचानक, माझं प्रतिबिंब हललं. मी नाही.. हो! मी स्थिर होतो, पण आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाने हालचाल केली, मग स्मित हास्य केलं आणि डोळे मिचकावले. मी भानावर आलो आणि झटकन मागे झालो. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. मी दचकून मागे पाहिलं, पण माझ्या मागे काहीच नव्हतं. मात्र, जेव्हा मी परत आरशात पाहिलं, तेव्हा तिथे माझ्या मागे एक काळं सावट उभं होतं. मी घाबरून मागे सरकलो आणि मोबाईल जमिनीवर पडला आणि फ्लॅश बंद झाला. त्याच क्षणी तळघरात अगदी माझ्या कानाजवळ एक हास्य ऐकू आलं. मी इतके घाबरलो चाचपाडत खाली पडलेला मोबाईल उचलला आणि अंदाज घेऊन तसाच धावत वर आलो. थेट माझ्या खोलीत आलो आणि खोलीच दार लावून घेतलं. 

या आधी मी अशी भीती कधीच अनुभवली नव्हती. काय होतं ते. या वाड्यातल्या तळघरात नक्की काय आहे..? विचारांनी डोक्यात काहूर माजवलं होतं. पण भीतीमुळे आणि धावत वर आल्यामूळे मी इतका दमलो होतो की या सगळ्या गदारोळात झोप कधी लागली माझे मलाच कळले नाही. सकाळी जाग आली आणि पुन्हा तो प्रसंग डोळ्यांसमोर आला तसे ताडकन अंथरुणात उठून बसलो. काल रात्री घडलेला प्रसंग खरंच घडला होता की मला स्वप्न पडलं होतं. काही कळायला मार्ग नव्हता. पण या प्रश्नच उत्तर मिळायला मला वेळ लागला नाही. मी सहज खोलीत नजर फिरवली आणि माझ्या अंगावर सर्कन काटा आला. तोच आरसा आता माझ्या खोलीत होता! काल रात्री तळघरात असलेला तो आरसा, माझ्या खोलीत कसा आला? मी थेट घरमालकाकडे गेलो. त्यांना विचारलं, “तळघरातला आरसा माझ्या खोलीत कसा आला?”

ते शांतपणे म्हणाले “तू तळघरात गेला होतास”

“हो, पण…”

ते म्हणाले “तुला माहिती आहे का, इथे येणाऱ्या कोणालाही हा वाडा फार काळ ठेवत नाही?”

मी सुन्न झालो. “म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला”

“तो आरसा, अमोल… तो फक्त प्रतिबिंब दाखवत नाही तर तो…”

त्यांचा फोन वाजला आणि ते फोन वर बोलण्यात व्यस्त झाले. 

मी कॉल संपण्याची वाट पाहत होतो पण ते कोणाशी तरी बोलत होते आणि त्यावरून काळले की त्यांच्या कोणा नातेवाईकांचे निधन झाले आहे आणि त्यांना ताबडतोब निघावे लागेल. आता अश्या परिस्थिती त्यांना अजून काही विचारणे मला योग्य वाटले नाही. तो दिवस मी कॉलेज ला गेलो खरे पण मन खूप अस्वस्थ होतं आणि कशातच लक्ष लागत नव्हत. संध्याकाळी खोलीवर आलो. थोडा अभ्यास केला. मेस मधून जेवण तिथेच मागवून घेतलं. पण जेवण करायची इच्छा नव्हती. तो प्रसंग खरंच माझ्या सोबत घडला की मला स्वप्न पडलं होतं. पण स्वप्न असेल तर मग मालक काय सांगत होते नक्की..? त्यांना फोन करावा कां.. फोन करून विचारतो हा काय प्रकार आहे. पण नको.. ते अंत्य विधी ला गेले आहेत अश्या वेळी त्यांना फोन करण बरं नाही. त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो. रात्र झाली. मला खूप अस्वस्थ वाटत होतं..

म्हणून मी डोळे मिटून पडून राहिलो होतो. खोलीत विचित्र थंडावा होता. काही वेळाने, मला जाणवलं की कुणीतरी माझ्याकडे बघतंय. मी हळूच डोळे उघडले… आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी हादरलो. आरशात माझं प्रतिबिंब मला सरळ बघत होतं. पण यावेळी, त्याच्या डोळ्यांत विचित्र असुरी चमक होती. हळूहळू, त्याने हात पुढे केला… आणि काहीतरी अविश्वसनीय घडलं—त्याचा हात आरशातून बाहेर आला! तो भयाण प्रकार पाहून काळीज छाती फाडून बाहेर येतंय की काय असं वाटू लागलं. मी पलंगावरून मागे सरकलो. पण समोर घडत असलेला भयानक प्रकार मी धड धडत्या काळजाने पाहू लागलो. आरशातून बाहेर आलेल्या त्या हाताने काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. मग बघता बघता पूर्ण शरीर आरशातून बाहेर आलं… आणि माझ्यासमोर एक जिवंत, काळपट सावलीसारखं अस्तित्व उभं राहिलं जणू एखाद नरपिशच्च.

“तू आता माझ्या जागी,” ते सावट पुटपुटलं आणि माझ्यावर झेपवाल. 

डोळे उघडले तेव्हा मला खोली दिसत होती, पलंग, कपाट दिसत होतं पण तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हतो. कारण मी आरशात उभा होतो. आणि आरशा बाहेर माझ्या खोलीत उभ होत ते नर पिशाच्च. “मी” आता आरशात बंदिस्त झालो होतो. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण माझा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता. त्या पिशच्चाने ज्याने आता माझी जागा घेतली होती त्याने एक कुतसित भयाण हास्य केलं आणि त्या आरश्यावर ते धुळीने भरलेले कापड टाकले. अंधार दाटला… आणि मी कायमचा त्या आरशाच्या आत अडकून पडलो.

Leave a Reply