अनुभव क्रमांक १ – राहुल वल्ली

हा अनुभव माझ्या वडिलांचा आहे. साधारण १९८४-८५ सालचा. माझे वडील मार्केट मध्ये कामाला होते. रोजचा दीन क्रम ठरलेला असायचा. पण त्या दिवशी त्यांना बरेच काम आले होते आणि ते पूर्ण केल्याशिवाय घरी जाता येणार नव्हते. ते काम करण्यात इतके गुंतून गेले की त्यांना वेळेचे भान च राहिले नाही. निघायला बराच उशीर झाला. ते कधीही इतक्या उशिरा पर्यंत कामाला बसत नसत. ते घरी यायला निघाले तसे त्यांना आठवले की आज अमावस्या आहे. उगाच मनात एक वेगळी भीती निर्माण झाली. त्यात त्यांच्या सोबतीला एरव्ही कोणी तरी असायचे पण आज मात्र ते एकटेच होते. त्या काळी रात्री वाहनांची वर्दळ नसायची. 

एकटेच निघाले असल्यामुळे कारण नसताना एक भीती जाणवत होती. कधी घरी पोहोचतो असे झाले होते. वेळ पाहिली नव्हती पण १ वाजत आला असेल असा त्यांनी अंदाज बांधला. तेव्हा आमचे गाव अगदीच मागासलेले होते. ते गावाच्या हद्दीत पोहोचले तेव्हा संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. झपाझप पावले टाकत घराच्या वाटेने जाऊ लागले. तितक्यात अचानक त्यांना वेगळेच वाटू लागले. वातावरणात कमालीचा गारवा पसरला. हा बदल अगदी क्षणभरात झाला होता की त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही तरी विपरीत घडायच्या आत आपल्याला घरी पोहचायला हवे हा एकच विचार मनात आला. तसे त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. 

अवघ्या अर्धा किलोमिटर चा रस्ता राहिला असावा. तितक्यात त्यांना घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला. ते दचकले च. पुढच्या काही मिनिटात त्यांच्या समोर घोड्यावर स्वार असलेला एक माणूस आला. घोड्याची उंची अतिसामान्य होती. त्यावर बसलेल्या माणसाचा चेहरा नीट दिसत नव्हता पण तो अगदी धष्टपुष्ट आणि बलवान असल्यासारखा भासत होता. तो माझ्या वाटेत अगदी मधोमध उभा राहिला. आमच्या गावात तर असा घोडा कोणाकडेच नाही आणि इतक्या रात्री हा अचानक आला कुठून हा विचार त्यांच्या मनात घोळत होता. तितक्यात त्या माणसाने अतिशय करड्या आवाजात एक प्रश्न विचारला “कुठून आलाय स”. माझ्या वडिलांनी घाबरतच सांगितले “काम वरून आलो आता घरी चाललोय”. तसे तो माणूस म्हणाला “पुन्हा या वाटेवरून येऊ नकोस”..

ते फक्त बघतच राहिले. बघता बघता तो कुठेतरी अंधारात दिसेनासा झाला. घरी आल्यावर वडिलांनी सगळा प्रकार आजीला सांगितला तसे आजी ने त्यांना बजावून सांगितले की उशिरा पर्यंत काम करू नकोस आणि उशीर झालाच तर असा रात्रीचा घरी येऊ नकोस. हवे तर तिथे थांब आणि सकाळी ये. त्या नंतर मात्र वडिलांनी कानाला खडा लावला आणि असे रात्री अपरात्री बाहेर पडणे आवर्जून टाळले. 

अनुभव क्रमांक २ – भार्गव धावडे

मी आता २० वर्षांचा आहे आणि राहायला मुंबईत आहे. लहानपणापासून मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की गावी जायचो. शहरात च वाढलो असल्यामुळे मला निगेटिव्ह गोष्टी काय असतात या बद्दल कधीच माहीत नव्हते. तसा कधी अनुभव ही आला नव्हता. पण मागच्या च वर्षी मी गावाला गेलो तेव्हा मला त्याचा प्रत्यय आला. नेहमी प्रमाणे गावाला गेलो की मित्रांबरोबर फिरायचो, पूर्ण दिवस खेळण चालू असायचे. आणि आता तर काय.. मनात येईल तेव्हा फोटोशूट. आणि मग सोशल मीडिया. त्या दिवशी दुपार भर खेळून झाल्यावर आम्ही एके ठिकाणी फिरायला गेलो. मस्त मोकळा परिसर होता. आजूबाजूला मोठी पण अगदी तुरळक झाडी होती. आमचे फोटो वैगरे काढणे सुरू झाले. 

बाजूला लागूनच अगदी सरळ रस्ता होता. संध्याकाळ होत आली होती. मी महिना म्हंटला की अंधार लवकर पडत नाही. त्यामुळे आम्ही अगदी निवांत होतो. पण एक विचित्र गोष्ट म्हणजे वातावरणात एक वेगळाच धुरकट पणा जाणवत होता. म्हणजे धुक जमा झाल्यावर परिसर कसा दिसतो अगदी तसा. वेगळेच वाटत होते त्या संध्याकाळी. तासभर फोटो वैगरे काढून झाले तसे माझा गावातला एक मित्र म्हणाला की चला आपण घरी जाऊ आता. पण मी हसतच म्हणालो अजुन अंधार पडायला सुरुवात पण झाली नाहीये आणि तुझे सुरू झाले का. माझ्या बोलण्यावर आमच्यात चांगलाच हशा पिकला. गावाचा परिसर असल्यामुळे त्या बाजूच्या रस्त्यावर कसलीच रहदारी नव्हती. मी मित्राला फोटो काढ सांगत मागे वळलो तितक्यात एक म्हातारी बाई अचानक माझ्या मागे उभी दिसली. मी एका क्षणासाठी दचकलोच.

बराच वेळ झाला आमच्या ग्रुप शिवाय त्या भागात कोणीही दिसले नाही आणि अचानक ही बाई कुठून आली हा विचार करतानाच ती म्हणाली “इथून निघून जा..”. मी मित्राकडे पाहिले आणि हळूच हसत म्हणालो “हो जातो आजी”. तिच्या कडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा आमची मजा मस्ती करू लागलो. सहज म्हणून माझे लक्ष पुन्हा त्या रस्त्यावर गेले आणि लक्षात आले की ती म्हातारी कुठेच दिसत नाहीये. परिसर अगदी मोकळा होता आणि रस्ता ही सरळ होता. मला अगदी वेगळचं वाटल. काही वेळानंतर आम्ही सगळे घरी आलो. त्या रात्री आम्हा सगळ्या मित्रांनी एकत्र जेवायचा बेत आखला होता. घराच्या अंगणात मस्त मोकळ्या हवेवर बसलो होतो. जेवण उरकून मी हात धुवायला उठलो. घरात जाण्या ऐवजी मी घरा शेजारी एका झाडाखाली गेलो. 

हात धुवत होतो तितक्यात मला झाडामागे कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. मी पटकन म्हणालो “कोण आहे ?”. पण समोरून काहीच उत्तर आले नाही. त्या भागात अंधार असल्यामुळे मला नीट काही दिसले नाही पण मी एक टक तिथे पाहत राहिलो. मला कळलेच नाही की मी तिथे बराच वेळ उभा होतो. १५-२० मिनिटानंतर मित्र आला आणि मला भानावर आणत म्हणाला “काय रे.. काय झाले.. हात धुवायला जातो सांगून गेलास.. २० मिनिट झाले.. काय करतोय इथे एकटाच..”. मला काही सुचायच्या आत तो घरात घेऊन गेला. मी रात्रभर याच गोष्टीचा विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राने मला जे सांगितले ते ऐकून मी सुन्न च झालो. तो म्हणाला की तू हात धुवायला गेलास तेव्हा आमच्यात विषय निघाला. 

तुला माहितीये.. ती म्हातारी कोणालाच दिसली नाही काल. फक्त आपल्या दोघांना दिसली. तुला ही कळले नाही ना ती अचानक कुठे गायब झाली. कारण ती नव्हतीच. खरंच ती असती तर सगळ्यांना दिसली असती. तुला काल रात्री झाडाखाली जे दिसले ना ते मला ही दिसले. म्हणून च मी तुला घरी घेऊन आलो. मित्राचे ते बोलणे ऐकून मी मात्र अवाक झालो.

अनुभव क्रमांक ३ प्राजक्ता सधनकर

ही गोष्ट मला माझ्या मामा ने सांगितली होती. मामा आणि मामी च नुकताच लग्न झालं होत. मामा पोर्ट वर जॉब ला होता. त्यामुळे पोस्टिंग नेहमी समुद्रकिनारी व्हायची. त्या वर्षी त्याची पोस्टिंग मुंबई ला झाली होती. नुकताच लग्न झाल्यामुळे विकेंड ला त्याने कोकण फिरायचा प्लॅन केला. बस ने जायचे नक्की केले. त्या दिवशी ते दुपारीच निघाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे कोकणात पोहोचणार होते. घाटातून प्रवास चालू झाला आणि मामी ला घाटातल्या वळणांमुळे उलट्या व्हायला सुरुवात झाली. तसे ती मामा ला म्हणाली “मला खूप त्रास होतोय आपण उतरायचे का..” तसे मामा ने वेळ पाहिली तर १२ वाजत आले होते. पण मामी ला खूपच त्रास होत होता म्हणून त्याने ड्रायवर ला विचारले. 

तसे ड्रायव्हर म्हणाला की साहेब आत्ता कुठे उतरता.. हा घाट अजुन संपला नाहीये. पण मामा ने विनंती केल्यावर तो तयार झाला. त्याने जरा मोकळी जागा पाहून बस रस्त्यावरून खाली उतरवत थांबवली. मामा आणि मामी खाली उतरले. बस पुढे निघून गेली. ते काही वेळ तिथेच थांबले. एव्हाना १२.३० झाले होते. आता पुढे काय करायचे कुठे जायचे हा प्रश्न त्यांना सतावू लागला. ते दोघेही चालत थोडे पुढे आले तसे त्यांना एक लॉज दृष्टीस पडले. निर्जन ठिकाणी असल्यामुळे बाहेर पार्किंग च्याच एरिया मध्ये एकही गाडी नव्हती. लांबून तर कळत ही नव्हते की ते सुरू आहे की बंद आहे. कारण तिथे कोणीही दृष्टीस पडत नव्हते. पण तरीही ते त्या दिशेने चालत गेले. आत हॉटेल मध्ये गेल्यावर रिसेप्शन वर एक माणूस बसला होता. त्यांनी विचारपूस करून एक रूम बुक केली.

जेवणाचे ही विचारले. त्यांच्या नशिबाने त्यांना जेवण ही मिळाले. तासाभरात जेवण वैगरे आटोपून ते रूम मध्ये गेले. मामी ला जरा बरे वाटले. १.३० वाजले असावेत. रूम मध्ये आल्यावर त्यांनी कमेरातून सहज म्हणून १-२ फोटो काढले. ते काही त्यांनी पाहिले नाहीत. थकले असल्यामुळे ते दोघेही झोपून गेले. सकाळी साधारण ५ ला उठले आणि चेक आऊट करून बाहेर पडले. पहाट झाली आणि हलकासा उजेड पडायला सुरुवात झाली होती. गेट मधून बाहेर पडल्यावर सहज म्हणून मामा ने मागे वळून पाहिले आणि त्याला धक्काच बसला. मागे काहीही नव्हते. कसलेही हॉटेल नाही. एका क्षणी तर त्याला वाटले की आपण स्वप्न पाहतोय. तो मामी ला म्हणाला तशी ती ही अवाक होऊन पाहत राहिली. एकही शब्द न बोलता ते त्या ठिकाणाहून चालत रस्त्यावर आले. 

एखाद्या वाईट स्वप्नातून बाहेर पडल्यासारखे त्यांना वाटत होते. तितक्यात त्यांच्या समोर एक बस येऊन थांबली. ते बस मध्ये येऊन बसले. मामी ने त्याला विचारले “काय होत ते.. आपण नक्की कुठे थांबलो होतो”. मामा ला काय वाटले काय माहीत त्याने झटकन कॅमेरा काढला आणि यू एस बी केबल ने कनेक्ट करून सगळे फोटो मोबाईल मध्ये घेतले. गॅलरी ओपन केली आणि एक एक फोटो पाहू लागला. रात्री रूम मध्ये काढलेले ते फोटो. त्या फोटोत ते दोघे तर होते पण त्या व्यतिरिक्त होता तो फक्त मिट्ट अंधार. एका ओसाड जंगलाच्या मध्यभागी त्या दोघांचे फोटो होते. मामी ने पुन्हा विचारले “आपण काल रात्री नक्की कुठे होतो, आपण काय जेवलो आणि नंतर कुठे झोपलो होतो”. मामा कडे कोणत्याच प्रश्नांची उत्तर नव्हती. झालेला प्रकार अगदी भयंकर होता. कोणालाही न समजण्या सारखा आणि कधीही न पटण्या सारखा..

अनुभव क्रमांक ४ – भक्ती कदम

खरे तर हा एक अनुभव नाही तर ३ अनुभवांची साखळी आहे. पहिला अनुभव माझ्या बहिणी सोबत घडला होता. ती रोज शिकवणी ला जायची. तिच्या सोबत तिची मैत्रीण ही असायची. रोज शिकवणी संपवून ती आणि तिची मैत्रीण एकत्रच घरी यायच्या. आमचे घर जवळच होते त्यामुळे माझ्या बहिणीला घरी सोडून मग तिची मैत्रीण तिच्या घरी जायची. हायवे क्रॉस करून पलीकडे तिचे घर होते. त्या दिवशी ही दोघी शिकवणी संपल्यावर घरी यायला निघाल्या. माझी बहिण घरी आली आणि तिची मैत्रीण त्याच्या घरी जायला निघाली. हायवे क्रॉस करत असताना तिला माझी बहिण पुन्हा दिसली. तसे ती हाका मारत तिच्या मागे जाऊ लागली. भर रस्त्यात गाड्यांची वर्दळ सुरू असतानाच ती वेड्या सारखी ओरडत हाका मारत तिच्या मागे जात होती. 

तिला कसलेच भान राहिले नव्हते. तिचे नशीब चांगले ती त्या वाहनाच्या गर्दीतून कशी बशी पुढे जात रस्त्याच्या पलीकडे गेली. समोरची ती मुलगी मागे वळली आणि एक विक्षिप्त हास्य करत डोळ्यादेखत दिसेनाशी झाली. तिला कळलेच नाही की हा भास होता की अजुन काही. दिवसा ढवळ्या हा प्रकार पाहून ती जागीच बेशुध्द पडली. दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार तिने माझ्या बहिणीला सांगितला आणि विचारले की तू तिथे होतीस का..पण माझी बहिण म्हणाली की तू बहुतेक विसरलीस की तू मला घरी सोडून मग च आपल्या घरी जायला निघालीस. तिचे ते बोलणे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली. पुढचे काही दिवस ती आजारी पडली होती. तिला असा विचित्र भास का झाला हे आम्हाला आज पर्यंत कळू शकले नाहीये. 

दुसरा अनुभव माझ्या एका मित्राच्या आजोबा सोबत घडला होता. त्या दिवशी आजोबा कामावरून घरी आले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या एका मित्राला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आहे. बातमी कळल्यावर ते लगेच त्याला पाहायला म्हणून घरातून बाहेर पडले. हॉस्पिटल घरापासून बरेच लांब होते. ते ८ च्याच दरम्यान निघाले होते. तिथे गेल्यावर त्यांना काही वेळ थांबावे लागले त्यामुळे तिथून निघायला बराच उशीर झाला. मध्य रात्र उलटुन गेली होती. सुमारे १ वाजत आला होता. हॉस्पिटल बाहेर त्यांनी बराच वेळ एखादे वाहन मिळतेय का याची वाट पाहिली पण इतकी रात्र झाली होती की घरी जायला त्यांना एकही वाहन मिळाले नाही. शेवटी कंटाळून ते चालतच घरी जायला निघाले. रस्ता अगदीच सामसूम आणि निर्मनुष्य झाला होता. 

काही अंतर चालत आल्यावर त्यांना एक बाई दिसली. ती खूप नटली होती. तिने हाक मारून वेळ विचारली. आजोबांनी तिला वेळ सांगितली आणि जास्त लक्ष न देता पुढे चालत निघून बेले. पण त्यांना जरा विचित्र च वाटले की ही बाई अशी नटून थटून इतक्या रात्री या निर्मनुष्य रस्त्यावर काय करतेय. आजू बाजूच्या परिसरात वस्ती सुद्धा तुरळक होती. ते ७-८ पाऊल पुढे चालत असावेत त्यांना काय वाटले काय माहीत त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना धडकीच भरली. ती बाई त्यांच्या पासून बऱ्याच लांब अंतरावर जाऊन उभी होती. त्यांना कळायला मार्ग नव्हता की काही सेकंदात ती बाई त्यांच्यापासून इतकी दूर कशी काय गेली. ते जास्त विचार न करता झपाझप पावले टाकत घराच्या वाटेला लागले. 

त्या रात्री ते घरी आले पण घडलेल्या विचित्र प्रकारामुळे त्यांना झोप लागली नाही. त्या नंतर च्याच बऱ्याच रात्री त्यांना बरोबर १ वाजता दारावर धापा ऐकू यायच्या. हा प्रकार बरेच दिवस चालला. त्यांनी एकदाही दार उघडुन पाहण्याचा प्रयत्न केला नाही. कालांतराने तो आवाज यायचा ही बंद झाला. 

तिसरा अनुभव मझाय शेजारच्या ताई सोबत घडला होता. त्या काळी आम्ही चाळीमध्ये राहायला होतो. आम्ही सगळे एक काकांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायचो. हाच आमचा दिनक्रम असायचा. त्या दिवशी आम्ही कोणी गेलो नाही आणि फक्त माझी ताई टीव्ही पाहायला गेली. आम्ही सगळे त्या दिवशी लवकरच झोपुन गेले होते. टिव्ही बघता बघता १२-१२.३० कधी होऊन गेले तिला कळलेच नाही. घर तसे जवळच असल्याने ती घरी यायला निघाली. चालत असताना तिला चाळी समोरच्या बाकावर कोणी तरी बसल्याचे जाणवले. ती त्या दिशेने चालत गेली आणि तिला दिसले की आमच्याच चाळीतल्या एक काकू अगदी शृंगार करून तिथे बसल्या आहेत. नववारी साडी, अंगावर बरेच दागिने होते. 

त्या तिला तिच्याकडे बोलावू लागल्या. ताई दोन तीन पावले त्या दिशेने चालत गेली पण झटकन तिच्या डोक्यात विचार चमकून गेला. रात्री चे १२.३० वाजलेत आणि काकू अश्या ठिकाणी कश्या असू शकतील. तिची पाऊले तिथेच थांबली. ती काहीच न बोलता मागे वळली आणि सरळ घरी चालत आली. ती कोणाला काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या काकूंच्या घरी गेली. त्यांना विचारले की तुम्ही काल रात्री अश्या बाहेर का बसल्या होता. त्यावर त्या म्हणाल्या की मी इतक्या रात्री बाहेर का बसेन.. तुला नक्कीच भास झाला असेल. त्यांचे बोलणे ऐकून ताई ला कळेनासे झाले की तिने नक्की कोणाला पाहिले, त्या काकू नव्हत्या तर मग त्यांच्या सारखे दिसणारे कोण होते. ती इतकी घाबरली होती की तिला पुढचे बरेच दिवस ताप भरला होता. 

This Post Has One Comment

  1. प्रणव कुलकर्णी

    खूपच सुंदर

Leave a Reply to प्रणव कुलकर्णी Cancel reply