अनुभव – विकी शंकर पाटील

भूत,पिशाच्च,हडळ ह्या सर्व गोष्टी असतात की नाही हे माहीत नाही पण जो पर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तो पर्यंत काही लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. हा अनुभव माझा एक मित्र स्वप्नील बाने ह्याला आला होता. 

घटना साधारणतः २०१० सालची आहे. मी त्या वेळी कॉलेज पूर्ण करून नुकताच नोकरी ला लागलो होतो. माझे तसे मित्र भरपूर मित्र होते पण जसा खास मित्रांचा ग्रुप असतो तसा माझा ही होता. ४-५ मित्रांचा ग्रूप. ते सगळे देखील कुठे ना कुठे नोकरी करत होते. त्या दिवशी एक अतिशय वाईट बातमी कानावर पडली. माझा मित्र मिलिंद च्याच काकांचे अकस्मात निधन झाले. ते गावी राहायला होते. आणि मिलिंद मुंबई ला नोकरी निमित्त एकटाच राहत होता. त्याने आम्हाला ही बातमी कळवली. त्याला एकटे जाणे शक्य नव्हते म्हणून आम्हा मित्रांनी त्याच्या सोबत जायचे ठरवले. आमच्यातल्या महेश नावाच्या एका मित्राची फोर व्हीलर होती म्हणून आम्ही त्यानेच जायचे नक्की केले. 

आमचा निर्णय ही झटक्यात झाला म्हणजे रात्री बातमी कळली आणि आम्ही काही वेळात जायला निघालो. रात्रीचे ११ वाजले होते. अश्या वेळी काळ वेळ बघून चालणार नव्हते आणि आमच्या कडे दुसरा पर्याय ही नव्हता. जून महिना होता त्यामुळे पाऊस ही अगदी मुसळधार होता. आम्ही ५ जण गाडी घेऊन निघालो. महेश अतिशय वेगाने गाडी चालवत होता कारण आम्हाला शकत तितक्या लवकर गावी पोहो चायचे होते. जाताना घनदाट जंगलाचा परिसर लागणार होता. त्यात पाऊस थांबायचे काही नाव घेत नव्हता. आम्हाला निघून एव्हाना अडीच तीन तास झाले असतील. मी घड्या ल्यात वेळ पाहिली तर रात्रीचे २ वाजून गेले होते. संपूर्ण रस्त्यावर आमच्या वाहना शिवाय दुसरे एकही वाहन दृष्टीस पडत नव्हते. आम्ही जरा घबरलोच होतो. त्यात अनोळखी रस्ता. या सर्व गोष्टींमध्ये एक अनुचित प्रकार घडणार होता ज्याची आम्हाला पुसटशी कल्पना ही नव्हती. 

त्या गावाच्या वेशीवर पोहोचण्या आधी आम्हाला एक पुल लागला. गाडी जशी त्या पुलावर आली तसे आम्हाला त्या पुलाच्या मधोमध ४ माणसे उभी दिसली. एकमेकांचा हात पकडुन उभी होती. आम्ही खरंच घाबरलो कारण जंगल पट्टीचा परिसर असल्यामुळे एखादी लुटमार करणारी टोळी असेल असे आम्हाला वाटले. जास्त काही विचार न करता महेश ने गाडीचा वेग वाढवला म्हणजे ते घाबरून बाजूला होतील. पण ते तसेच रस्त्याच्या अगदी मधोमध उभे होते. गाडीचा वेग इतका होता की आता दुसरा काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. महेश ने डोळे बंद करून गाडी त्यांच्यावरून नेली. पण.. नंतर चे दृश्य खूप भयानक होते. आम्ही मागे वळून पाहिले तर त्या माणसांना काहीही झाले नव्हते. ते तसेच एकमेकांचा हात धरून रस्त्याच्या अगदी मधोमध उभे होते. आमची गाडी त्यांना अक्षरशः उडवून पुढे निघून गेली होती पण प्रत्यक्षात तसे झाले नव्हते. 

तो भयानक प्रसंग पाहून माझ्या अंगावर शहारे च आले. महेश तर घाबरून रडू लागला होता. त्याने गाडीचा वेग अजिबात कमी केला नाही. आम्ही साधारण ३ च्याच दरम्यान गावात मिलिंद च्याच घरी पोहोचलो. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. आम्ही खरे तर खूप घाबरलो होतो पण झालेल्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितले नाही. महेश इतका घाबरला होता की त्याला ताव भरला होता. मिलिंद ने राहायला आम्हाला एक खोली दिली. त्याच्या काकांचा अंतिम विधी सकाळीच होणार होता. आम्ही विचार केला की आहे तितक्या वेळात म्हणजे २-३ तासात थोडी झोप पूर्ण करून घेऊ. पण आम्हाला कोणाला नीट झोप लागत नव्हती. आधीच महेश ची परिस्थिती तापामुळे खूप खराब झाली होती. मिलिंद ने त्याला एक गोळी आणून दिली. त्याने ती घेतली आणि ग्लानी मुळे त्याला गाढ झोप लागली.

त्याला शांत झोपलेले पाहून आम्ही ही जरा निवांत झालो. काही वेळात नकळत माझा डोळा लागला. पण तितक्यात मला कोणाच्या तरी ओरडण्याने जाग आली. मी अगदी दचकतच उठलो. पाहिले तर महेश अतिशय जोरात ओरडत होता. मी नीट पाहिल्यावर कळले की ती त्याच्या पायाकडे हात नेऊन काही तरी सांगायचा प्रयत्न करतोय. जस कोणीतरी त्याला खेचून घेऊन जातंय. त्याच्या तोंडून वाचवा इतकाच शब्द बाहेर पडत होता. आम्हाला वाटले की झालेल्या प्रकारा मुळे आणि त्यात अंगात ताप असल्यामुळे त्याला भास होत असावा. आम्ही त्याला कसे बसे शांत केले. एव्हाना उजाडायला ही सुरुवात झाली होती. आमची झोप काय ती झालीच नाही. पहाटे मिलिंद च्याच काकांच्या अंत्यविधी ला सुरुवात झाली. पुढच्या काही तासात सगळे पार पडले. आम्ही घरी येऊन अंघोळ वैगरे केली. 

सगळे घरात असताना मिलिंद ने रात्री पुलावर घडलेला प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला. तसे त्याच्या घरचे लोक म्हणाले की त्या पुलावर या आधी बऱ्याच विचित्र घटना घडल्या आहेत म्हणून त्याचे नाव ही शैतानी पुल असे पडले आहे. तुमचे नशीब चांगले की तुम्ही त्या पुलावर थांबला नाहीत. काकांचे दिवस असल्याने मिलिंद १२ दिवस तिथेच राहिला. आम्ही दुपारी परतीच्या प्रवासाला निघालो. जाताना पुन्हा तो पुल लागणार होतं दुपारची वेळ असली तरी एक वेगळीच भीती वाटत होती. रात्रीचे ते भयानक दृश्य डोळ्यांसमोरून जात नव्हते. पण जाताना आम्हाला तसा काही अनुभव पुन्हा आला नाही. जेव्हा मिलिंद मुंबई ला परत आला तेव्हा अजुन एक नवीन गोष्ट त्याच्याकडून कळली. आम्ही ज्या खोलीत झोपलो होतो त्या खोलीत त्याच्या चुलत वहिनी ने निव्वळ महिन्या भरापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या नंतर खूप जणांना तिचा भास झाला आहे. त्या दिवशी महेश ला झालेला तो भास नक्की भास होता की अजुन काही हे मात्र आम्हाला आज पर्यंत समजू शकले नाही.

स्वप्नील च्या म्हणण्यानुसार ह्या घटनेला आज कित्येक वर्ष जरी निघून गेले असतील तरी ती घटना आठवली की मनात एक वेगळीच भीती दाटून येते. त्याच्या म्हणण्यानुसार त्या गावी जाताना आज ही तो पूल तसाच आहे. 

Leave a Reply