अनुभव – कौस्तुभ सुर्वे
हा अनुभव माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच मनीष ला आला होता. ही घटना साधारण काही वर्षांपूर्वीची असेल. माझा मोठा भाऊ नेटवर्किंगच्या शेत्रात कामाला असल्याने पूर्वी त्याला बाहेर फिरावे लागत असे. एक दिवस तो आणि त्याचा मित्र चंदन संध्याकाळच्या वेळेस जंगलाच्या भागात हायवे जवळ केबल चे काम करत होते. जंगल विभाग आणि संध्याकाळ ची वेळ असल्याने तिथे जास्त वर्दळ नव्हती. वातावरणातला थंडावा वाढत चालला होता आणि त्या भागात धुक पसरत होत. त्यात हायवे पासून थोड आतल्या भागात त्यांचं काम सुरू होत. तितक्यात अचानक काम करत असताना त्याला त्याच्या नावाने कोणी तरी आवाज देत असल्याचा भास झाला. आजूबाजूला गर्द झाडी आणि धुके होते. त्यामुळे त्याला वाटले की काही अंतरावर असलेला त्याचा मित्र त्याची टिंगल करत असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केले.
परंतु तो आवाज पुन्हा येऊ लागला आणि या वेळेस आधी पेक्षा स्पष्ट ऐकू येत होता. तेव्हा त्याला जाणवले की तो आवाज मित्राचा नसून एका स्त्री चा होता. त्याने झटकन आपल्या कडची टॉर्च काढली आणि आजूबाजूचा परिसर निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. पण काही कळेना की तो आवाज नक्की कुठून येतोय. पण तो आवाज सतत चालूच होता म्हणून त्याने त्या आवाजाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तो बरेच अंतर आत जंगलात चालत गेला. तितक्यात त्याला जाणवले की आपल्या मागून कोणी तरी येतंय. त्याने मागे पाहिले तर त्याचा मित्र होता. माझ्या भावालाच नाही तर त्याच्या मित्राला ही त्या हाका तो आवाज ऐकू येत होत्या म्हणून तो सुद्धा आवाजाचा माग काढत त्या दिशेला चालला होता. बऱ्याच वेळ चालल्या नंतर ते एके ठिकाणी येऊन थांबले कारण तो आवाज यायचा बंद झाला होता..
भावा ने टॉर्च चोहो बाजूंनी फिरवायला सुरुवात केली. एका मोठ्या दगडाच्या बाजूला एक बाई सदृश्य आकृती बसलेली दिसली जी हमसून रडत होती. तो प्रकार पाहून त्यांनी सरळ बाहेरच्या बाजूला धाव घेतली कारण त्या निर्जन जंगलात त्या बाई चे असे बसून रडणे खूप भयानक होते. ते हायवे वर धावत आले आणि जे वाहन मिळेल त्याने घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या भागात असे काही आहे का याची चौकशी केली तेव्हा खूप भयाण गोष्ट कळली. त्या भागातल्या एका महिलेचा खून करून तिचे प्रेत त्या भागात टाकले होते.. आता ते का , कसे याचा शोध घेणे किंवा सत्यता जाणून घेणे कोणासही जमले नाही. तेव्हा पासून त्या भागातली लोक सांगतात की ती अजून ही तिथेच आहे..