अनुभव – ओंकार पल्येकर

माझा मित्र साईनाथ रोज सकाळी त्याच्या मित्रासोबत जिम ला म्हणजे व्यायामशाळेत जायचा. सकाळी ५ ला उठून दोघं ही तयार व्हायचे आणि घरा बाहेर पडायची त्याचा मित्र संतोष थोडा आळशी असल्यामुळे नेहमी उशिरा यायचा. तरीही साईनाथ त्याच्या साठी रोज अर्धा तास तरी थांबून वाट बघायचा. संतोष च्या बिल्डिंग खाली बेंच होते, पहाटे येऊन तो तिथे येऊन बसायचा आणि संतोष ची वाट पहायचा. त्या दिवशी नेहमी प्रमाणे तो तिथे येऊन बसला. पण आज त्याला कदाचित बर वाटत नव्हत. वातावरण ही भकास वाटत होतं. बेंच वर बसलाच होता की मागून एक वयोवृद्ध माणूस त्याच्याकडे चालत येताना दिसला. तो व्यक्तीचे वय खूप असावे कारण वृद्धापकाळाने तो खूप च हळु चालत येत होता. म्हणजे २० मीटर चालायला त्याला १० मिनिट लागतील. तो चालत येऊन त्याच्या बाजूला बसला.

तितक्यात त्याला दुसऱ्या बाजूने कसलासा आवाज आला म्हणून त्या व्यक्ती कडे न पाहता त्याने मान दुसऱ्या दिशेला वळवली. तो आवाज कसला आहे हे पाहायला. पण तिथे कोणीही नव्हते. त्याला वाटले की कदाचित एखादी मांजर वैगरे गेली असेल तिथून आणि म्हणून आवाज झाला असेल. त्याने पुन्हा आपल्या बाजूला वळून पाहिलं तर त्या बेंच वर त्याच्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते. आता मात्र तो घाबरला आणि त्याला दरदरून घाम फुटला. काय करू काय नको हे त्याला उमगत नव्हत. त्याने लगेच फोन काढला आणि संतोष ला कॉल केला. ३ वेळा संपूर्ण रिंग झाल्यावर त्याने फोन उचलला. तो संतोष वर खूप चिडला आणि ओरडू लागला. संतोष ने सगळे ऐकून घेतले आणि फक्त एकच वाक्य म्हणाला “ तुला काल रात्री दारू जास्त झाली होती का..? जिम ला आपण ५ ला जातो.. आता किती वाजले आहेस पाहिलेस का..? “

तितक्यात त्याने मोबाईल कानावरून काढून समोर धरला आणि वेळ पाहिली. रात्रीचे सव्वा तीन झाले होते. इतक्या वेळेपासून वाटणारा अस्वस्थपणा, वातावरणात ला बदल त्याला कळून चुकला होता. कारण पहाटे ५ ऐवजी तो रात्री सव्वा तीन वाजता तिथे येऊन बसला होता. गप गुमान उठून तो घरी आला. पुढचे सलग ४ दिवस त्याला खूप ताप भरला होता. विचारपूस केल्यावर कळले की त्याला बाहेरची बाधा झाली आहे. जाणकार व्यक्ती कडून सांगितलेल्या उपाया नुसार त्याच्या वरून नारळ ओवाळून टाकण्यात आला आणि नंतर काही दिवसांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण आज ही कधी विषय निघाला तर त्याच्या अंगावर भीतीने शहारे येतात. 

Leave a Reply