अनुभव – सुवर्णा

ही सत्य घटना बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजी सोबत घडली होती. तिनेच मला सांगितली होती. माझ्या आजीचे नाव भागाबाई व तिची जाऊ यमुनाबाई या दोघी जावा जरी असल्या तरी त्यांच्यातील नाते अगदी बहिणींसारखे होते. दोघींचाही एकमेकींवर खूप जीव होता. त्या नेहमी सोबत राहायच्या. प्रसंग यमुना आजींच्या बाबतीत घडला होता. जो माझ्या आजीला अगदी आजही लक्षात आहे. यमुना आजीला दोन मुले होती. मोठा मुलगा 3 वर्षांचा व लहान मुलगी अवघ्या 2 महिन्यांची होती. तिचा नवरा वामनराव म्हणजेच माझे चुलत आजोबा हे अत्यंत व्यसनी होते. ते यमुना आजीचा खूप छळ करायचे तिला मारहाण करायचे. रोज मद्य प्राशन करून यायचे आणि तिला त्रास द्यायचे. दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढतच चालला होता. आणि या जाचामुळे यमुना आजीची मानसिक स्थिती बिघडू लागली होती.

हळू हळू तिची तब्येत ही खालवू लागली होती. ती नेहमी आजारी पडायची. सतत त्रास, मारहाण तिचं जगणं अशक्य करून टाकलं होतं त्यांनी. या सगळ्याला कंटाळून ती कधी कधी माझ्या आजीला म्हणायची की मला आता हा त्रास सहन होत नाही माझी जगण्याची इच्छा संपली आहे. मी स्वतःच्या जीवाचे काहीतरी करून घेईन पण मला माझ्या मुलांची काळजी वाटते. मी त्यांना त्यांच्या वडिलांच्या भरोश्यावर सोडून जाऊ शकत नाही. ते स्वतः व्यसनाच्या आधीन झाले आहेत, माझ्या मुलांना कोण बघणार. असे ही मी नेहमी आजारी असते, जर चुकून मला काही झाले तर मी माझ्या मुलांनाही माझ्या सोबत घेऊन जाईन. माझी आजी वारंवार तिची समजूत काढायची आणि असा काही विचार डोक्यात आणू नकोस हे समजावून सांगायची. पण परिस्थिती काही चांगली नव्हती. दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी पुन्हा एकदा यमुना आजी आणि आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले. पण ह्या वेळी वाद अगदी विकोपाला गेला.. 

अखेर आजोबांच्या जाचाला कंटाळून, वैतागून यमुना आजीने टोकाचा निर्णय घेतला. आणि घरातच स्वतःला पेटवून घेतले. एकच हाहाकार उडाला. तिने खोलीचे दार लावून घेतले होते त्यामुळे तिला यातून बाहेर काढायला ही जमत नव्हते. वेदनेने भरलेल्या तिच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या.. तिच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला होता. त्याच सोबत खोलीतून आगीचे लोट बाहेर येउ लागले. कारण बघता बघता खोलीतल्या कपड्यांना, लाकडी कपाटाला आग लागली होती. हा सगळा गदारोळ बघता आजुबाजुचे सर्व लोक जमा झाले. तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले पण दुर्दैवाने ती वाचू शकली नाही. त्या आगीत जळून तिचा मृत्यू झाला. यमुना आजी नंतर तिच्या दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्या आजी ने घेतली. कारण तिचं ते वाक्य तिला सतत आठवायचं. 

माझी आजी दोन्ही मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावू लागली व त्यांचा सांभाळ करू लागली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी सर्व मुले अंगणात खेळत असताना यमुना आजीचा मोठा मुलगा जो तेव्हा 3 वर्षाचा होता ह्याला अचानक रक्ताची उल्टी होऊ लागली. लागलेच त्याला वेद्या कडे नेण्यात आले. पण उपचार करे पर्यंत, काही निदान लागण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. घरात एकामागे एक असे दोन मृत्यू झाल्याने संपुर्ण घर हळहळले होते. ह्यातून सावरण्याचा सगळे प्रयत्न करत होते. माझ्या आजी ला राहुन राहून यमुना आजीचे ते वाक्य आठवत होते “मला काही झाले तर मी माझ्या मुलांना ही घेऊन जाईन..” पण या घटने नंतर गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. काही महिने उलटले. दिवाळी तोंडावर आली होती म्हणून घरात फराळाची तयारी सुरु होती. त्या रात्री माझी आजी आपली कामे नियमित पणे आवरून करंज्या करायला बसली होती. माझा छोटा काका जो त्यावेळी 5 वर्षांचा होता आजी सोबत बसून तिला मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

तर एका कडेला यमुना आजी ची लहान मुलगी पाळण्यात झोपली होती. अचानक काका चे लक्ष्य दरवाज्याकडे गेले व त्याला दारात यमुना आजी उभी असलेली दिसली. तो आजी ला सांगू लागला की आई काकू आलीय बघ. पण आजी ने दुर्लक्ष करून त्याला शांत बसण्यास सांगितलं. खरं तर त्याच असं बोलणं ऐकून आजी देखील खूप घाबरली होती. पण पुढच्या क्षणी काही समजण्याच्या आतच पाळण्यात शांत झोपलेली मुलगी जोरात पाळण्यातून खाली पडली आणि प्रचंड वेदनेने रडू लागली आणि बघता बघता एकदम शांत झाली. त्या जोरात आपटण्याच्या आवाजाने घरातील सगळे जण जागे झाले व स्वयंपाक घरात आले. आजी तिथेच असल्याने पाळण्याकडे धावली परंतु ती मुलगी जागीच गेली होती. हा सगळा भयानक प्रसंग डोळ्यांसमोर जरी घडला असला तरी काय झालं, कस झालं काहीच कळलं नाही. माझ्या आजीला अचानकपणे जाणीव झाली आणि कळून चुकले की यमुना आजीने सांगितल्या प्रमाणे आपल्या दोन्ही मुलांना आपल्या सोबत नेले. त्या नंतर वर्षभरात वामन आजोबा देखील गंभीर आजाराने त्रस्त होऊन मृत्युमुखी पडले.

Leave a Reply