अनुभव – सार्थक देशमुख
हा प्रसंग मला माझ्या आजोबांनी सांगितला होता जो त्यांच्या काकांसोबत साधारण 20 ते 22 वर्षांपूर्वी घडला होता. घडला होता. ते ज्या गावात राहत होते त्या गावापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर एक मोठं शहर होतं. एकदा तेथे नाटक पाहायला ते गेले होते. परत यायला वेळ लागला आणि बारा वाजून गेले. त्या काळी गावात प्रवासासाठी बैलगाड्याच असायच्या. म्हणून ते बैलगाडीने परतत होते. चाळीस किलोमीटरचं अंतर असले तरी रस्ता नेहमीचा असल्यामुळे त्यांना विशेष भीती किंवा त्रास वाटत नव्हता. बैलगाडी सुसाट पळवत ते गावाकडे परतत होते. गावात येण्याआधी एक मोठी पाण्याची टाकी लागत असे. बाजूलाच विजेचा एक खांब होता. त्या जागेबद्दल लोकं म्हणायची की ती जागा बरी नाही, तिथे काही तरी भुताटकी आहे. काकांनाही हे माहीत होतं, पण त्यांनी मनावर घेतलं नव्हतं आणि नेहमी त्याच रस्त्याने ये जा करत असल्याने त्यांना काहीच वाटायचं नाही..
बैलगाडी टाकीजवळ पोहोचली, तेव्हा दुरून टाकीच्या खाली एक मुलगा उभा दिसला. त्याने खाकी रंगाची हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. लहान केस, आणि अंदाजे पाचवी-सहावीतला मुलगा वाटत होता. काकांनी बैलगाडी त्या मुलाजवळ नेऊन थांबवली. वाटलं, गावातल्या कोणाचा मुलगा असेल, हरवला असेल तर त्याला घरी सोडावं. तसे काळजीपोटी त्यांनी त्या मुलाला विचारलं, “कुठे राहतोस रे तू?” मुलगा म्हणाला, “मी हरवलोय. माझ्या घराचा पत्ता नाही माहित. मी पाहुणा म्हणून आलोय गावात. मला फोन नंबर पाठ आहे. माझ्या घरी फोन करून सांगाल का मी हरवलोय ते?”.. त्याकाळी क्वचित लोकांकडे मोबाईल असायचे. आजोबांच्या काकांकडे एक जुना बटनवाला नोकियाचा फोन होता. मुलाने नंबर सांगितला. त्यांनी तो नंबर डायल केला. रिंग वाजत होती, कॉल उचले पर्यंत ते एक दोन पाऊल बाजूला चालत गेले आणि तितक्यात समोरून कॉल उचलला गेला.
“इथे सोहम नावाचा मुलगा आहे, त्याने हा नंबर दिला तो तुमच्या घरी पाहुणा आला आहे असे म्हणतोय, आणि हरवला आहे..” त्यांचे असे बोलणे ऐकताच
समोरून रडण्याचे आवाज ऐकू यायला लागले. काकांना काही कळेना. समोरचा माणूस रडत हुंदके देत म्हणाला, “अहो.. सोहम तर मागच्या वर्षीच वारला… आजच त्याच वर्ष श्राद्ध आहे!.. तुम्हाला नक्की कोण..” समोरचा माणूस बोलत होता पण ते मात्र भयभीत होऊन अगदी स्तब्ध झाले, मोबाईल हातातून निसटून खाली पडला. त्यांच्या सर्वांगावर भीती ने शहारे उमटले. त्यांनी थरथरत मागे वळून पहिले तर तिथे कोणीही नव्हतं. ते प्रचंड घाबरले होते. ते झटकन बैलगाडीत चढले आणि सुसाट गावाच्या दिशेने निघाले. गाव जवळ येत होतं. अजून दोन किलोमीटर अंतर बाकी असतानाच अचानक कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं. आणि मागून एका मुलाचा आवाज आला –
“काका… मला माझ्या घरी सोडा…” तो आवाज सोहमचाच होता! ते भीतीने अक्षरशः थरथर कापू लागले. जणू अंगच गोठलं. काय करावे कळेना, बैलगाडी वेगात पुढे जात होती. त्यांनी कसलाही विचार न करता सरळ खाली उडी घेतली. रस्त्याकडेला असलेल्या एका रेतीच्या ढीगाऱ्यावर पडले. बैलगाडी पुढे जातं राहिली आणि त्यात बसलेला “सोहम” निर्वीकार चेहऱ्याने त्यांच्याकडे एकटक बघत राहिला..