अनुभव – सिद्धार्थ कदम

साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही गोव्या ला फिरायला जायचा प्लॅन केला होता. तसे तर गोव्याचा प्लॅन बनला तरी बहुतेक वेळा फिसकटतो. पण आमच्या बाबतीत तसे झाले नाही. आम्ही सगळे मित्र मिळून ९ जण होतो. त्यांच्यात माझा एक खास मित्र विशाल ही होता. त्यानेच सगळे अरेंज केले होते. फोर व्हीलर बुक केली होती. आम्ही सकाळी ९ ला निघालो. आम्हाला जो ड्राइवर दिला होता तो नवखाच वाटत होता. तासाभरात आम्ही हायवे ला पोहोचलो. पण आमचा ड्राइवर गाडी खूप स्लो चालवत होता. आधी आम्ही काही बोललो नाही पण नंतर मित्र म्हणाले की हा अशी गाडी चालवणार असेल तर आपल्याला पोहोचायला २ दिवस लागतील. 

प्रवास सुरू करून जवळपास २ तास झाले असतील. पण ड्रायव्हर मात्र अगदी हळु हळू गाडी चालवत होता. अगदी ६० चा स्पीड ही ओलांडत नव्हता. आता मात्र आम्हाला राहवले नाही म्हणून आम्ही त्याला सांगायला सुरुवात केली की गाडी चा वेग वाढवा जरा. अश्या वेगात गेलो तर उद्या पोहोचू. पण तो कोणाचं ऐकायला तयार नव्हता. म्हणत होता की वेगात जाऊन काय मिळणार आहे. मी बरोबर चालवतोय गाडी तुम्ही मला सांगू नका. माझा मित्र विशाल तर चिडलाच होता. शेवटी आम्ही त्याला सांगून वैतागलो आणि गप्प बसलो. संपूर्ण दिवस उलटून गेला. आम्ही साधे अर्धे अंतर ही पार करू शकलो नाही. रात्री ८ वाजता एका हॉटेल जवळ गाडी थांबवली. जेवण वैगरे करून घेतले आणि साधारण दीड तासाने म्हणजे ९.३० ला पुन्हा प्रवास सुरू केला. 

ड्राइवर च्या गाडी चालवण्यात तसूभर ही फरक पडला नव्हता. काय बिनसले होते त्याचे काय माहीत. माझा मित्र विशाल त्याला ओरडू लागला आणि भांडायला सुरुवात केली. ड्रायव्हर ने ही वाद घालायला सुरुवात केली. पण वाद विकोपाला जाऊ नये म्हणून मी मध्ये पडलो. मी विशाल ला समजावले की जाऊ दे रे उगाच वाद नको घालूस. इतके सांगून ऐकुन नाही तो माणूस आता काय ऐकणार. सोड थांबव हा विषय इथेच. माझे बोलणे ऐकुन तो जरा शांत झाला. १०.३० वाजत आले होते. पुढे आम्हाला २ वळणं दिसली. ड्राइवर ने गाडी अजुन स्लो केली. आणि रस्त्या कडेला असलेल्या एका टपरी जवळ थांबवली. तिथल्या एका माणसाला विचारले तर त्याने डाव्या बाजूच्या रस्त्याने जायला सांगितले. तसे ड्रायव्हर ने त्या रस्त्याने गाडी घेतली. साधारण अर्धा तास झाला आणि फिरून आम्ही पुन्हा त्याच टपरी जवळ आलो. एव्हाना ती टपरी बंद झाली होती आणि त्या परिसरात दुसरे कोणी ही नव्हतं.

ड्रायव्हर ने पुन्हा गाडी त्याच रस्त्याने घेतली आणि अर्ध्या तासाने आम्ही फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आलो. आम्ही त्या ड्रायव्हर ला बोलू लागलो की काय चालू आहे १ तास झाला आपण फिरून फिरून एकाच ठिकाणी येतोय. पण मला कळून चुकले होते की आम्ही एका चकव्यात अडकलो आहोत. मी सगळ्यांना सांगितले नाही पण माझा मित्र विशाल ला हळूच कानात सांगीतले. तसे तोही घाबरला. पावणे बारा वाजत आले होते आणि आम्ही त्याच काही किलोमीटर च्या अंतरावर फिरत होतो. ४-५ फेऱ्या झाल्या होत्या. प्रत्येक वेळी आम्ही वेगळी वळणं घेत होतो. पण कोणत्याही रस्त्याने गेलो तरी पुन्हा त्याच टपरी जवळ यायचो. 

साधारण सव्वा बारा नंतर आम्ही एका वळणावर आलो आणि तिथे दुसरी वाहने दृष्टीस पडली तसा जीवात जीव आला. त्या ड्राइवर ला माझ्या मित्रांनी भरपूर शिव्या घातल्या कारण त्यांच्या मते रस्ता चुकल्यामुळे तब्बल ३ तास आम्ही वेड्या सारखे सगळी कडे फिरत होतो. आम्ही आता योग्य रस्त्याला लागलो होतो. एव्हाना दीड वाजत आला होता. वाहनांची वर्दळ अगदी कमी झाली होती. आमचा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला की मला खूप झोप येतेय आपण गाडी थोड्या वेळ थांबवू. मी अर्धा एक तास डुलकी काढून घेतो म्हणजे मला नीट गाडी चालवता येईल. आता त्याला नाही बोलून चालणार नव्हते म्हणून आम्ही म्हणालो “ठीक आहे पण गाडी एखाद्या सेफ जागी पार्क करा आणि झोप काढून घ्या”. त्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरवून थोड्या आतल्या बाजूला एका झाडाखाली पार्क केली. 

पुढच्या ५ मिनिटात तो गाढ झोपूनही गेला. दिवसभर ड्राईव्ह करून खरच त्याची दमछाक झाली होती. पण आम्ही नुसते गाडीत बसून काय करणार म्हणून आम्ही मित्रही पाय मोकळे करायला गाडी बाहेर निघालो. मी घड्याळ्यात वेळ पहिली तर ३ वाजून गेले होते. तो परिसर अगदी निर्मनुष्य होता. परिसरात हलकासा गारवा वाटत होता. मी आणि माझा मित्र विशाल त्याच भागात आजूबाजूला पाहत होतो. अधून मधून हलकीशी वाऱ्याची झुळूक येत होती. आमच्यातले काही जण लघवी करायला अजून थोड्या आतल्या भागात गेले. काही वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत उभे होतो. कसला ड्रायव्हर दिलाय, किती नाटकं याची. 

एव्हाना आपण पोहोचलो ही असतो. याच्या अश्या फालतू ड्रायव्हिंग मुळे आपली रात्र वाया जातेय. तसे ही आता आम्हाला त्याच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. साधारण अर्ध्या तासाने आम्ही पुन्हा गाडी जवळ आलो आणि ड्रायव्हर ला उठवले. तो ही डोळे चोळत कसा बसा उठला. बाहेर उतरून तोंडावर पाणी वैगरे मारले आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. आम्ही सगळे गाडीत बसतच होतो. माझे लक्ष ड्रायव्हर कडे होते. त्याने गाडीत बसल्यावर रिअर व्ह्यू मिरर मध्ये पाहिले आणि अक्षरशः भीती ने थरथरू लागला. त्याची ती अवस्था पाहून मी त्याला विचारले की काय झाले पण त्याने एक शब्द ही तोंडातून काढला नाही. गेअर् टाकला आणि गाडी चालू केली. 

बघता बघता त्याने गाडी अतिशय जोरात घेतली. आम्ही सगळे त्याला पाहून आश्चर्य चकित च झालो. संपूर्ण प्रवासात अगदी रडत पडत गाडी नेणारा ड्रायव्हर अचानक इतक्या वेगात गाडी कशी काय पळवू शकतो. आम्ही सगळे त्याला विचारात होतो की काय झालेय. पण तो काहीच बोलत नव्हता. त्याचे लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर होते. तो आमचे बोलणे ऐकुन न ऐकल्या सारखे करत होता. त्याने पुढच्या २ तासात गाडी थेट गोव्याला नेऊन च थांबवली. मला वेळ लक्षात आहे. बरोबर सकाळी पावणे सहाला. मला त्याचे असे हे वागणे खूप विचित्र वाटले. मी न राहवून त्याला विचारले “आता आपण पोहोचलो आहोत आता तरी सांगाल का काय झालं होत तुम्हाला.? संपूर्ण प्रवासात आम्ही तुम्हाला सांगत होतो गाडी फास्ट चालवायला पण तेव्हा तुम्ही आमचे ऐकले नाही आणि आता शेवटच्या काही किलोमीटर साठी तुम्ही गाडी वेगात आणली. आणि घाबरायला इतकं काय झालं होत हो?..

त्याने माझ्या कडे आणि माझ्या सगळ्या मित्रांकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाला “काही नाही.. तुम्हाला सांगून तुमचा विश्वास बसणार नाही.. जाऊ द्या”. त्यावर माझा मित्र जरा चिडतच म्हणाला “नाही.. असे कसे.. इतके काय झाले की तुम्ही आम्हाला काहीच सांगत नाही आहात”. त्या नंतर तो जे बोलला ते ऐकुन आम्हा सगळ्यांची बोलतीच बंद झाली. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही मला उठवले तेव्हा माझे लक्ष रिअर व्ह्यू मिरर मध्ये गेले आणि गाडीत तुमच्या मधोमध मला एक माणूस बसलेला दिसला. त्याचे शरीर संपूर्ण पांढरे पडले होते. त्याला पाहून मी प्रचंड घाबरलो होतो म्हणून मी त्या वेळी काहीच बोललो नाही. मला फक्त त्या परिसरातून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते. म्हणून मी गाडी सुसाट चालवत राहिलो. 

मध्ये एक दोन वेळा हिम्मत करून मी मागे पाहिले पण तो माझ्याच कडे पाहत होता. म्हणून मी नंतर आरशात पहिलेच नाही. जवळपास एका तासानंतर मी पाहिले तेव्हा तो दिसेनासा झाला होता. त्या ड्रायव्हर चे असे हे बोलणे ऐकल्यानंतर आम्हाला काहीच सुचले नाही. आम्ही कोणीही त्याला पुढे एक शब्दही बोललो नाही. या भयानक प्रकारामुळे मला ती ट्रीप कायम लक्षात राहील. अगदी आजही आमच्यात त्या ट्रीप बद्दल विषय निघाला की ती रात्र, तो प्रसंग सगळे डोळ्यांसमोर जश्याचा तसा उभा राहतो.

Leave a Reply