अनुभव – अथर्व महाडिक 

गोष्ट जवळपास ४० वर्षापूर्वीची आहे. माझे आजोबा तेव्हा Under Construction Building contractor होते. त्यामुळे Builder ने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच Ground Floor च्या एका रूम मध्ये केली होती. घरात आजोबा, आजी, माझी आई आणि ४ मामा अस ७ जणांच कुटुंब राहत होत. त्यांच्या बाजूच्या रूम मध्ये अजून एक कुटुंब होत. ते सुद्धा तिथेच काम करणारे होते. नवरा, बायको आणि ३ मुली. थंडीचे दिवस होते. तर झाल अस कि शेजारच्या ३ मुली शेकोटी करत बसल्या होत्या. लहान असल्यामुळे जे काही मिळेल ते आणून मुली त्या शेकोटीत टाकत होत्या. त्यातील सर्वात मोठ्या मुलीला लाईट चा बल्ब दिसला तो तिने काहीही विचार न करता त्या आगीत टाकला. बल्ब गरम झाल्याने तो जोरात फुटला. त्याच्या काचेचे तुकडे उडाले त्यातील एक तुकडा बाजूलाच बसलेल्या लहान बहिणीच्या डोळ्यात गेला.

ती जोरात ओरडली आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. हे पाहताच बाजूलाच काम करत असलेले माझे आजोबा आणि त्या मुलीची आई धावत आली. रक्त फार वाहत होते. प्रसंगावधान राखत आजोबा लगेच त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. सोबत मुलीचे आई बाबा सुद्धा होते. तिला हॉस्पिटल मध्ये भरती करून आजोबा घरी परतले आणि कामाला लागले. जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले कि शेजारी अजून हॉस्पिटल मधून आले नाहीत. ते आपल्या रूम मध्ये आले आणि आजी ला काय झाल ते सांगु लागले. चर्चा झाल्या नंतर रात्रीचे जेवण आटोपून सगळे झोपून गेले होते. पण आजोबाना मात्र झोप येत नव्हती. आजी कधीच गाढ झोपून गेली होती. खरं तर रोज थकल्यामुळे त्यांना लगेच झोप लागायची पण आज मात्र त्यांना काही केल्या झोप लागत नव्हती. 

इतक्यात अचानक बाहेर त्यांना बांगड्याचा आवाज येवू लागला. त्यांना वाटले की शेजारचे आले असतील म्हणून त्यांनी आवाज दिला “ताई आलात का हॉस्पिटल मधून.. “ पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. तेव्हा त्यांनी अजून एकदा आवाज दिला “ताई मुलगी कशी आहे आता..” उत्तर येण्या ऐवजी त्यांना बाईच्या रडण्याचा आवाज आला. त्यांना वाटले की त्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले नाही.. ते उठून धावत दरवाज्याकडे गेले आणि दरवाजा उघडला. पण बाहेर कोणीच नव्हतं. त्यांना वाटल की भास झाला असेल म्हणून त्यांनी दरवाजा लावला आणि परत येउन बिछान्यावर पडले. काही वेळ विचार करण्यात च गेला असेल इतक्यात पुन्हा बाहेरून कोणी तरी पाणी ओतत असण्याचा आणि बांगड्यांचा आवाज झाला.

यावेळी आजोबांनी आवाज दिला नाही ते हळूच उठले आणि दरवाजा जवळ गेले तर त्यांना कोणी तरी चालत पुढे जातंय असा आवाज आला. त्यांनी हळूच दरवाजाची कडी उघडली. तर शेजारची बाई हातात पाण्याने भरलेला एक डबा जो शौचास वापरायचे तो घेऊन खाडी जवळच्या घनदाट झाडीत जाताना दिसली. त्यांना वाटल की ही बाई इतक्या रात्री एकटीच का जातेय म्हणून ते तिला आवाज देणार तितक्यात मागून आजी आली आणि त्यांना विचारले “एवढ्या रात्री तुम्ही इथे एकटे काय करताय..” त्यावर ते म्हणाले “अग ती बघ शेजारची बाई एकटीच चालली आहे..” आजीने समोर नजर टाकली पण तिला काहीच दिसले नाही. त्यावर ती म्हणाली “कोण बाई, कुठे चालली आहे..” आजोबा जरा चिडतच म्हणाले “ तू वेडी आहेस का.. तुला दिसत नाहीये ती बाई..? ही काय समोरून चालली आहे.. थांब मी तिला आवाज देतो आणि विचारतो.. “ तसे आजीला बहुतेक कळले की हा काय प्रकार आहे. ती आजोबांचा हात धरून त्यांना घरात घेऊन आली आणि म्हणाली “तिथे कोणीच नव्हतं. कोण बाई दिसत होती तुम्हाला..” 

त्यावर ते भानावर आले आणि काहीच बोलले नाहीत. ती रात्र दोघांनीही जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईचा नवरा घरी आला तेव्हा आजोबांनी त्यांना विचारले “ मुलीची तब्येत कशी आहे आता..? आणि ताईना एकटेच घरी का पाठवले तुम्ही..? “ तेव्हा ते आश्चर्य चकित होत म्हणाले “ मुलगी बरी आहे आता पण ही तर रात्रभर हॉस्पिटल मध्ये होती आणि अजूनही तिथेच आहे..” आजोबा मात्र विचारात पडले की त्यांनी रात्री नक्की काय पाहिलं. सकाळी सगळे आवरून ते आपल्या कामावर निघून गेले. दुपारी ते जेवायला घरीच यायचे तर कधी आजी त्यांना डबा घेऊन जायची. त्या दिवशी ते घरी यायला निघाले. घरापासून 2 मिनिटांच्या अंतरावर ते आले होते तसे अचानक त्यांना आजी भेटली. त्यांनी तिला विचारले “ तू कुठे निघालीस दुपारची.. “ त्यावर ती वेगळीच हसली आणि म्हणाली “बाजूच्या बांधकामच्या इथे एक बाई पडली आहे, रक्त वाहून शुद्ध गेली आहे तिची.. “

आजोबाना काही कळलेच नाही कारण ही गोष्ट आजीला कोणी सांगितली आणि जरी सांगितली तरी आजी तिथे जाऊन काय मदत करणार आहे. त्यात ते बांधकाम गेले काही दिवस थांबलं होतं. तरीही ते धावत तिथे गेले. स्लॅब च काम सुरु असल्यामुळे वर जावं लागणार होतं. आजी वेगळीच हसत धावत त्यांच्या पुढे गेली आणि खूप वेगात वर निघून गेली. आजोबा पाहतच राहिले. ते घाबरतच वर गेले आणि वर जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. सगळं काही सामसूम होतं. आजी सुद्धा दिसत नव्हती. ते खाली उतरू लागले तसे आजी धापा टाकत वर येताना दिसली. ती म्हणाली “अहो काय झालं.. एकटेच वर धावत गेलात.. मी घराबाहेरच होते, हाका मारल्या तुम्हाला पण तुम्ही जोरात धावत वर गेलात.. काय झालं..” गेल्या काही प्रसंगावरून त्यांना कळून चुकलं होतं की हा प्रकार दिसतो त्याहून खूप भयानक आणि धोकादायक आहे. त्यांनी लगेच आजीचा हात धरला आणि तिला खाली घेऊन आले. 

त्यांनी सामानाची बांधा बंध केली आणि त्याच दिवशी त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी शिफ्ट झाले. पण ते काय होत याची विचारपूस जेव्हा त्यांनी आजूबाजूला केली तेव्हा एका कामगाराने सांगितलं कि तुमच्या आधी इथे एक कुटुंब राहायचं आणि बिल्डिंग मध्ये काम करता करता इथली बाई दुसऱ्या माळ्यावरून खाली पडली होती. ती थेट तुमच्या घराच्या दरवाजा समोर. तेव्हा पासून इथे या रूम मध्ये कोणी राहायला धजावत नाही. तेव्हा आजोबाना सगळा प्रकार कळून चुकला होता..

Leave a Reply