असंच एकदा बोलता बोलता गप्पा रंगल्या होत्या…पप्पा नेहमीच्याच जुन्या गोष्टी सांगण्यात रमले होते…त्या काळातल्या अविस्मरणीय आठवणी आणि लहानपणी त्यांच्यासोबत घडलेला पहिला भयावह अनुभव… अनुभव म्हटल्यावर मी आणि माझी भावंडे अगदी कान लावून ऐकू लागलो. पप्पांनी जशी सुरुवात केली तशी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. ते बोलू लागले आणि आम्ही सर्व काही विसरून त्यांचे बोलणे ऐकू लागलो.
घरात भावंडांत सगळ्यात लहान असल्याने आजोबांचे प्रेम माझ्या वाट्याला नव्हते. त्यांची अंगकाठी म्हणजे अगदी उंच, धिप्पाड आडदांड…जणू पैलवानच. आजी ही तशीच उंच, काटक.. चेहऱ्याने जरी रागीट वाटत असली तरी मनाने मात्र खूप हळवी होती. सर्वांवर जीव लावायची. पहाटेपासून ते अगदी रात्र होई पर्यंत सगळ्यांचं करायची. आपल्या एकूलत्या एक सुनेचे म्हणजे माझ्या आईचे पण खूप लाड करायची. एकदा आजोबा प्रवासाला गेले असताना खूप आजारी पडले. आणि काही दिवसाच्या आजारपणात त्यांना मृत्यू ने घेरले. त्यांच्या अकस्मात मृत्यूने आजी आतून पूर्णपणे खचली होती पण तिला तसे दाखवून चालणार नव्हते. आजोबांच्या अचानक जाण्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली होती. त्यामुळे या धक्क्यातून तिने स्वतःला कसे बसे सावरले.
आई-बाबा दोघेही रत्नागिरीला शाळेत मास्तर होते त्यामुळे इकडे गावी आजी आणि माझ्या चार आत्त्त्या घरी असायचे. आजोबांनंतर शेतीचे सर्व काही आजी ने पाहिले. गावात आजोबा प्रमुख असल्याने आजीला ही तितकाच मान दिला जाई. आजी ने आणि माझ्या बाबांनी खूप कष्टाने पैशांची जुळवा जुळव करून माझ्या चारही आत्त्यांची लग्न करून दिली. पण माझ्या बाबांना आजीची काळजी वाटू लागली कारण ती घरी एकटी राहणार होती. म्हणून बाबांनी गावाकडे बदली करून घेतली.
मी, दादा, चित्रा ताई , मंगल आणि आई आम्ही तिथेच असायचो…सुट्ट्यांमध्ये अधूनमधून गावी येण जाण व्हायचं. तर इकडे आजीसोबत बाबा, बेबी ताई आणि माई रहायचे. तेव्हांच काय ते आम्ही सर्व भावंडे एकत्र भेटायचो.
नेहमी प्रमाणे त्या वर्षाची वार्षिक परीक्षा झाल्यावर गावी जायचं होत. आजीचं आजारपण ही वाढले होते. ९५ वी पार केली असावी. आजी तिच्या खोलीत पडुन असायची. गोळ्या औषधं तर तसं चालूच होतं तिचं. एवढ्या आजारपणातही तिचा जीव मात्र तिच्या घरातच होता. आजी ला उठताना त्रास असतानाही ती खोलीतून हळूहळू रांगत बाहेर येत असे. खोलीतून बाहेर येत असताना शेणाने सारवलेल्या त्या जमिनीवर हात घासत येई चर्रचर्र… चर्रचर्र…. आणि थोडावेळ बाहेर तशीच बसून सगळं घर न्याहाळत असे. मग परत तशीच खोलीत जाऊन पडत असे. नंतर काही महिन्यात आजीने जेवण ही सोडले.. आता हे जे काही तिचे क्षण आहेत ते शेवटचेच असं मानून आम्ही राहत होतो…आतून दुःख ही तेवढेच होत होतो.
अखेर तो दिवस आलाच… तिथीनुसार गणेशचतुर्थी होती तेव्हा… त्याच दिवशी गावात सर्वांकडे गणपती बसले होते..पण आमच्या घरी आज शोककळा होती. नेहमी थोडीतरी हालचाल करणारी आजी आज काहीच करत नव्हती. घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता…एका पर्वाचा आज अंत झाला होता. सणवाराचे दिवस म्हणून कोणाला जास्त कळवले ही नाही. गावच्या मागच्या बाजूनेच सर्व विधी पार पाडले. काही दिवस उलटले आणि सगळी जणं आपापल्या कामाला गेली.
दिवाळीसाठी पुन्हा एकदा सर्व एकत्र येणार होते. आमचं घर तस मोठं होतं म्हणून माझे काही चुलत भाऊ मी गावी आल्यावर घरी राहायला यायचे. यावेळी घरी सर्व जणं होते कमी होती ती आजीचीच.
त्या रात्री आम्ही जेवण आटोपून गप्पा मारत बसलो होतो. हळू हळू सगळे जण पेंगु लागले तसे आम्हा भांवडांचे मधल्या खोलीत झोपायचे ठरले. मधल्या खोलीला दुसऱ्या खोल्यांचे दरवाजे जोडत होते. आम्ही भावंडं एकत्र असल्याने गप्पा चालूच होत्या. रात्र गडद होत होती. आम्ही बोलता बोलता कधी निद्रेच्या आहारी गेलो काही कळलंच नाही.
अचानक मध्यरात्री माझ्या लहान भावाला जाग आली. कोणते तरी भयानक स्वप्न बघून उठला होता काय माहित कारण त्याला आधीच घाम फुटला होता… पाणी पिण्यासाठी उठणार तोच त्याला कसली तरी चाहूल जाणवली… तो आवाज आजीच्या त्याच खोलीतून येत होता. काही क्षणासाठी तो जरा दचाकलाच कारण आजीची खोली रिकामी होती.. तो पुन्हा आवाजाचा कानोसा घेऊ लागला पण पुन्हा त्याला काहीच जाणवले नाही. भास झाला असेल म्हणून दुर्लक्ष करून तो अंथरुणात पडला तसे पुन्हा त्या खोलीतून हालचाल जाणवू लागली. त्याने गोधडी संपूर्ण अंगावर घेतली आणि पुन्हा कानोसा घेउ लागला.. पण यावेळेस तो आवाज काही वेगळा होता. अगदी आजीच्या घरामध्ये रांगत फिरण्याचा…. चर्रचर्र… चर्रचर्र… चर्रचर्र…आजारपणाने ती कन्हत असल्याचा …त्याच्या जोडीला तिच्या त्या हातातल्या बांगड्यांचा बारीक आवाज ही … तो आवाज रात्रीच्या त्या गडद अंधारात अगदी भयावह वाटत होता. हळूहळू तो आवाज त्याच्या अगदी जवळ येऊ लागला तसे भीतीने त्याचे शरीर गार पडले.. त्याने काहीही हालचाल न करता तसेच पडून रहायचे ठरवले… आतल्या आत तो पूर्ण घामाघूम झाला होता. आजीचा तो आवाज आता अगदी त्याच्या उशाशी येऊन थांबला तसा त्याने त्याचा जीव मुठीत घेतला… चर्रचर्र…. चर्र…. …..चर्र…
त्याला भीती वाटतं असली तरी त्या आवाजात आजीची काळजी,प्रेम,ओढ सगळच जाणवत होतं… तिच्या मृत्यूनंतर ही त्या घरावर असलेली तिची माया तिला परत परत साद देत होती….अचानक थंड वाऱ्याची झुळूक जावी असे जाणवले आणि क्षणार्धातच सगळीकडे एक वेगळीच शांतता पसरली… कदाचित तिचा फेरा संपला असावा….
त्यानंतर काही काळापर्यंतच तिचं अस्तित्व जाणून देणारा हा आवाज आम्हा भावंडांना ही अनेकदा ऐकू आला. आता जरी ती या जगात नसली…तरी कुठूनतरी ती आपल्यालाच पाहतेय… अजून ही घरावर तिचा तितकाच जीव आहे याचा प्रत्यय आम्हाला आजही आल्याशिवाय राहत नाही.