लेखक – अजय ब भोरावकर

ही घटना गेल्या वर्षी ची आहे. 

गेल्या वर्षी मे महिन्यात माझ्या मित्राच्या गावी त्याच्या भावाच्या लग्ना निमित्त गेलो होतो. त्याच गाव खूपच सुंदर आणि अगदी निसर्गरम्य. मित्राच्या घरीच मुक्काम करायचे ठरवले. त्याच कुटुंब अगदी प्रेमळ असल्यामुळे त्यांनी मी कोणा दुसऱ्याच्या घरी आहे असे अजिबात जाणवू दिले नाही. मी आपल्या माणसात आपल्याच घरी आहे असे सतत वाटत होते.

साधारण तिसऱ्या दिवशी बाजूच्या गावातील आठवडी बाजारात संसार उपयोगी सामान घेण्यासाठी जायचे ठरले. मला ही दुसरे गाव बघायला मिळेल आणि थोडे फिरणे होईल म्हणूज मी जरा खुश होतो.

ते दुसरे गाव साधारण 3 ते 4 किलोमीटर लांब असल्यामुळे आम्ही बाईक घेऊन जायचे ठरवले. पण ऐन वेळी त्याचे वडील बाईक घेऊन गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली. गावात इतर मित्रांकडून बाईक मिळते का ते पाहण्यात संध्याकाळचे 5.30 झाले पण बाईक काही मिळाली नाही. शेवटी नाईलाजाने रिक्षा पकडून आम्ही त्या गावी आठवडी बाजारात येऊन पोहोचलो.  

मित्राने घरासाठी हवं होतं ते सामान घेतले आणि मी सुद्धा काही गोष्टी घेतल्या. निघायच्या वेळी मला समोर चायनीज ची गाडी दिसली आणि मित्राला म्हणालो खूप इच्छा होतेय रे चल चायनीज खाऊ. मित्र म्हणाला की अंधार पडत चाललाय, वर्दळ कमी होतेय आणि मग रिक्षा मिळणार नाही चालत जावे लागेल. पण मी म्हणालो की लगेच उरकून घेऊ जास्त वेळ लागणार नाही.

आम्ही खायला बसलो, खूप दिवसांनी आम्ही दोघे सोबत होतो त्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या. वेळ कसा गेला कळलेच नाही वर्दळ पूर्ण कमी झाली होती. मित्राला लक्षात आले आणि तो म्हणाला चल निघायला हवे, 7 वाजून गेले, आई वाट पाहत असेल. घरचे सगळे सामान संपलेय, आपण हे सामान घेऊन जाऊ तेव्हा आई जेवण बनवेल. तसे आम्ही तडक उठलो, मी पैसे दिले आणि घरी जायला रिक्षा पाहू लागलो. साहजिकच मित्राने म्हंटल्याप्रमाणे खूपच उशीर झाला होता आणि रिक्षा मिळणं कठीण झालं होतं. काही वेळ वाट बघितली आणि आम्ही चालतच घरी जायचे ठरवले. गप्पा करत करत आम्ही निघालो. गाव असल्यामुळे रस्त्यावर स्ट्रीट लाईट नव्हते मग मोबाइल च्या टॉर्च च्या प्रकाशात वाट गवसत, रस्ता शोधत आम्ही पुढे चालू लागलो. जस जसे गाव मागे पडू लागले तसे वातावरणात बदल होऊ लागला. मे महिना असून सुद्धा थंड वाटू लागले. जणू थंडी ची लहर च आली होती. चालता चालता मला वाटले की आमच्या मागून कोणी तरी चालत येत आहे. मी मागे वळून पाहिले पण अंधार असल्यामुळे कोणी दिसत नव्हते. चाहूल मात्र स्पष्ट जाणवत होती. काही पावले पुढे चालत आलो आणि माझ्या मित्राच्या कानाजवळून एका क्षणासाठी सर्रकन काही गेल्या सारखे जाणवले. एखादे चिट पाखरू असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण पुढच्याच क्षणी मागून हाका ऐकू येऊ लागल्या. अजून गाव बरेच दूर होते. सगळीकडे मिट्ट अंधार पसरला होता. वाऱ्याचा वेग वाढत चालला होता त्यामुळे थंडी ही जास्त वाटू लागली होती. अचानक झाडावरून एक लहान फांदी तुटन माझ्या अंगावर पडली आणि मी पुरता घाबरलो. काय विपरीत घडतेय ते कळत नव्हते. आम्ही झपाझप पावले टाकत गावाच्या दिशेने चालत होतो. पुन्हा त्या हाका ऐकू येऊ लागल्या. या वेळेस मात्र त्या हाका आमच्या नावाने येत होत्या. मित्राने ठरवले होते की काही झाले तरी मागे वळून पहायचे नाही. त्या थंड हवेने आता मात्र भलताच वेग धरला होता. आम्ही प्रचंड घाबरलो होतो. आमचे हात पाय थंड पडू लागले आणि आमचा चालायचा वेग मंदावला. अचानक माझ्या मित्राची कॉलर पकडून त्याला कोणी तरी मागे खेचायचा प्रयत्न करू लागले. मी त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याला पुढे ओढत धावायला सुरुवात केली. आमच्या दोघांच्या नावाने त्या हाका सतत ऐकू येतच होत्या. धावत असताना आम्ही कच्च्या रस्त्याला कधी लागलो ते कळलेच नाही. तितक्यात समोरून एक पांढरट आकृती वाऱ्याच्या वेगाने आली आणि डोळ्यासमोरून नाहीशी झाली. आता मात्र आम्हा दोघांची चांगलीच तांतरली. आम्ही जिवाच्या आकांताने धावत सुटलो. कच्च्या रस्त्यावर आम्ही काहीही न बघता सुसाट धावत सुटलो. तेवढ्यात मित्राच्या पायाला जोरात ठेच लागली आणि अंगठ्या मधून रक्त वाहू लागले. तो वेदनेने कळवळू लागला. तरीही मी त्याला धीर दिला आणि जमेल त्या वेगात त्याला घेऊन पुढे निघालो. दैव बलवत्तर म्हणून आम्ही कसे बसे मुख्य रस्त्याला येऊन पोहोचलो आणि समोर छोटे गणपती मंदिर दिसले. तसा जीवात जीव आला. आम्ही धावतच रस्ता ओलांडला आणि मंदिराच्या आवारात शिरणार तोच मागून कर्णकर्कश आवाज कानावर आला “वाचलात..”

आम्ही थेट गाभाऱ्यात जाऊन बसलो. मित्राच्या अंगठ्यातून रक्त वाहत असल्यामुळे पाय पूर्ण माखला होता. मी खिशातला रुमाल काढून अंगठ्यावर बांधला तसा रक्तस्त्राव थोडा कमी झाला. तितक्यात मंदिरात कोणी तरी आले आणि आम्हाला विचारले “कोण तुम्ही, इतके घाबरलेले का आहात”. मी घडलेला प्रसंग कथित केला. ते त्या मंदिराचे पुजारी होते. ते म्हणाले की बरे झाले तुम्ही वेळेत तिकडून निघालात आणि त्याच्या हाकेला उत्तर दिले नाही किंवा मागे वळून पाहिले नाही. कित्येकांना त्या रस्त्यावर विचित्र अनुभव आले आहेत. तुम्ही त्या हाकेला प्रतिसाद दिला असता तर कदाचित तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला नसता. तिथे नक्की काय आहे हे कोणालाच माहीत नाही पण या वेळेला तिथे कोणी फिरकत ही नाही. पण आता तुम्ही काळजी करू नका असे बोलून त्या पुजाऱ्याने आम्हाला गावात घरा अलीकडे नेऊन सुखरूप पोहोचवले. आम्ही त्यांचे आभार मानून घरा कडे निघालो, तसे माझ्या मित्राच्या मनात आले की त्यांना घरी बोलवावे म्हणून तो मागे वळला आणि पाहतो तर ते पुजारी कुठेच दिसत नव्हते. आम्हाला कळून चुकले की ही सगळी त्या कर्त्या धर्त्याची कृपा, आम्ही हात जोडून गणपती बाप्पाचे आभार मानले.

Leave a Reply