अनुभव – निरंजन जाधव

माझं गाव कोकणातलं पोलादपूर. सध्या मी पुण्यात राहतो, पण दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही मे महिन्यात मामाच्या गावी जायचं ठरवलं होतं. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे, मी सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुट्टी टाकली आणि एक आठवड्यासाठी मामाच्या गावी निघालो. मामाचं गाव माझ्या गावापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर आहे. शुक्रवारी संध्याकाळी, मी माझी गाडी घेऊन मामाच्या गावी निघालो. रस्त्यातला प्रवास निसर्गरम्य होता, तरीही मला एकट्याने गाडी चालवून थोडं थकायला झालं होतं. रात्री साधारण 8-9 वाजता मी मामाच्या घरी पोहोचलो. मामाच्या घराचं वातावरण नेहमीचं अगदी आपुलकीचं होतं. थकल्यामुळे मी जेवण झाल्यावर लगेचच झोपलो. मला 2 मामे भाऊ आहेत – ऋतिक आणि कुणाल.

दुसऱ्या दिवशी, आम्ही सगळे मिळून बाहेर फिरायला गेलो. कोकणातील हिरवळ, नद्या, डोंगर, आणि शांततामय रस्ते, यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. असेच 2-3 दिवस गेले, आमचं फिरणं आणि मजा-मस्ती सुरू होती. एके दिवशी, अचानक मला एक विचार सुचला आणि मी ऋतिक आणि कुणालला विचारलं, “आपण रात्री शिकारीला जाऊया का?” माझं खरं तर शिकारीत फारसं काही आकर्षण नव्हतं, पण रात्री रानात जाऊन, तिथलं अंधारमय वातावरण अनुभवण्याची मला खूप इच्छा होती. ऋतिक नेहमीच माझ्यासारखा उत्साही, तर लगेचच तयार झाला. पण कुणाल मात्र घाबरत होता. त्याला मनवायला बराच वेळ लागला, शेवटी तो तयार झाला. आम्ही चौघं – मी, ऋतिक, कुणाल आणि माझ्या चुलत मामाचा मुलगा मयूर – सगळ्यांनी रात्री जेवण आटोपून शिकारीला जायचं ठरवलं. रानातलं सगळं ऋतिक आणि मयूरला माहित होतं. त्यामुळे ते दोघं पुढे पुढे चालत होते, आणि मी व कुणाल त्यांच्या मागे चाललो होतो. 

हळूहळू आम्ही जंगलात खूप आत आलो. तेवढ्यात कुणालने आम्हाला थांबायला सांगितलं. त्याने घाबरत म्हटलं, “पुढे जायचं नाही, कारण तिकडे पलीकडच्या गावाची स्मशानभूमी आहे.” पण ऋतिक आणि मयूर हे दोघं मात्र कोणत्याही गोष्टीला न घाबरणारे, त्यामुळे ते त्याच बोलण न जुमानता पुढे निघाले. वेळही रात्री दीड पावणेदोन ची होती. तसे आम्ही ही निमुटपणे त्यांच्या मागे निघालो.  स्मशानभूमीच्या बाजूने जाताना मला एकदम पैजणाचा आवाज ऐकू आला. प्रथम मला वाटलं की फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत, म्हणुन मी दुर्लक्ष करत पुढे चालत राहिलो. पण काही पावले चालल्यावर तो आवाज पुन्हा येऊ लागला. या वेळी तो आवाज कुणाल लाही ऐकू आला. आम्ही एकमेकांकडे पाहिलं, आणि मग मी हळूच त्याला विचारलं, “तुलाही आवाज ऐकू आला का?” त्याने सुद्धा मान हलवत होकारार्थी इशारा केला.

तेवढ्यात ऋतिक आणि मयूर आमची चेष्टा करू लागले, पण अचानक जोरात आवाज आला आणि आता पैंजण सोबत बांगड्यांचा आवाजही त्यात मिसळला. आता मात्र ऋतिक आणि मयूरही दचकले.   आम्ही झपाझप पावले टाकत पुढे जाऊ लागलो.. तेव्हा अचानक काही अंतरावर आम्हाला एका झाडाच्या खाली एक बाई उभी दिसली. आता अडचण अशी होती कि ती बाई आमच्या वाटेत उभी होती त्यामुळे आम्ही जागीच स्तब्ध झालो. आता इकडे आड तिकडे विहीर असे झाले होते. मागे जाऊ शकत नव्हतो कारण तिथे स्मशानभूमी होती. आणि पुढे वाटेत ती बाई उभी होती. आम्ही आमची वाट बदलली तशी ती बाई अचानक जोरात रडू लागली. तिच रडणं ऐकून आम्ही प्रचंड घाबरलो. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ती बाई तर तिथेच उभी होती पण तिच्या रडण्याचा आवाज हळूहळू वाढत चालला होता. आणि त्यासोबत आमची भीतीही वाढत चालली होती. 

तिच्या रडण्याचा तो किळसवाणा आवाज ऐकून आम्ही इतकी घाबरलो की थेट तिथून धावत सुटलो. आम्ही जीवाच्या कांताने गावाच्या विषेपर्यंत पळत गेलो. आम्ही जीवाच्या आकांताने गावाच्या वेशीपर्यंत पळत गेलो. अखेरीस आम्ही गावाच्या हद्दीत येऊन पोहोचलो. आणि अचानक तिचं रडणं थांबलं. तसा आम्ही मोकळा श्वास घेतला आणि घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर आम्ही सगळे एकाच खोलीत झोपायला गेलो. पण घडलेला प्रसंग माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता. कुणाल मात्र खूप चिडला होता तो रागात म्हणाला “ मी सांगितलं होतं ना, पुढे जाऊ नका म्हणून. पण माझ ऐकतो कोण? बघितलं ना काय झालं ते..” दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल ला ताप आला. आम्हाला घडलेला प्रकार घरी सांगावाच लागला. मामाने आमची चांगलीच खरडपट्टी काढली. आम्ही सुद्धा जास्त काही बोललो नाही कारण चूक आमची होती. घडलेला प्रसंग मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

Leave a Reply