लेखन करण हा माझा छंद होता. कालांतराने मी त्याला माझे प्रोफेशन म्हणून निवडले. मला अगदी पहिल्यापासून paranormal आणि Supernatural स्टोरी ज लिहायला खूप आवडा यच्या. काही खऱ्या, काही काल्पनिक तर काही या दोन गोष्टींचे मिश्रण असलेल्या. लोकांचा प्रतिसाद ही छान मिळायचा. मला नेहमी अशी एखादी कथा लिहायची होती की ती लिहिताना मी स्वतः ही घाबरलो पाहिजे. भरपूर प्रयत्नानंतर ही मला अशी कथा लिहायला जमत नव्हती. 

त्या दिवशी मी मित्राच्या शॉप वर गेलो होतो. तिथून आमचा मस्तपैकी फिरायला जायचा प्लॅन होता. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे एक लाँग ड्राईव्ह ला जायचे ठरले होते. रात्री जेवण वैगरे आटोपून मी मित्राच्या शॉप वर आलो आणि गप्पा मारत बसलो होतो. साधारण १० वाजत आले होते. पावसाने नुकताच विश्रांती घेतली होती. तितक्यात माझ्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंड चा कॉल आला. ती त्याच्या दुकानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवायला आली होती. त्यामुळे तिने माझ्या मित्राला भेटायला बोलावले. तसे तो मला म्हणाला की “सागर मी १०-१५ मिनिटात जाऊन येतो आणि तिला भेटुन येतो. आल्यावर आपण दुकान बंद करून जाऊ लाँग ड्राईव्ह ला. मी ही त्याला ठीक आहे म्हंटले. 

तो गेला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आजूबाजूची दुकान कधीच बंद झाली होती. मी मात्र त्याच्या दुकानात बसून मान खाली मोबाईल मध्ये घालून निवांत यु ट्यूब वर व्हिडिओ पाहत बसलो होतो. तेवढ्यात एक आवाज कानावर पडला “दादा खूप पाऊस आहे मी इथे आडोशाला थोड्या वेळ बसू का?” तसे मी मान वर करून पाहिले. एक वयस्कर बाई मला विनंती करत होती. तसे मी त्यांना दुकानातील एक खुर्ची बसायला दिली. ती माझ्याकडे पाहतच त्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली “तुम्ही नवीन दिसताय ते नेहमी असतात ते कुठे गेले?”. तसे मी म्हणालो “अहो आजी.. तो एका कामासाठी गेलाय मी त्याचा मित्र आहे सागर”.

“बरं पण अरे इतक्या रात्री का बसलाय इथे, आसपास ची सगळी दुकानही बंद झाली. आज अमावस्या आहे. लवकर घरी जायला पाहिजे..” आजी समजवायचा प्रयत्न करत होती. मी तिला म्हणालो “त्यात काय एवढे आजी.. मी नाही मनात अमावस्या वैगरे, आता मित्र आला की आम्ही जाणार आहोत फिरायला”. तसे ती आजी एकदम चिडली आणि म्हणाली “कशाला जाता रात्री अपरात्री फिरायला, पोरा सारखा आहेस माझ्या म्हणून सांगतेय”. मी पुन्हा त्याच सुरात म्हणालो “काही नाही होत हो आजी, तुम्ही उगाच काळजी नका करू”. 

माझे असे बोलणे ऐकून ती थोडी शांत झाली आणि मला पुन्हा समजावून सांगायचा प्रयत्न करू लागली “मी काय समजावणार बाळा तुला.. स्वतःच्या पोराला कधी समजावू शकले नाही.. त्याला ही असेच रात्री फिरायची सवय होती. एके रात्री तो २ मित्रांसोबत असाच फिरायला गेला, जाताना म्हणाला ‘ चंद्रग्रहण पाहायच य ‘, त्या रात्री गेला तो परत आलाच नाही.” मी थोडे दचकून च विचारले “का काय झालं त्याला”. तसे ती म्हणाली “गेला तो.. पाय घसरला आणि खोल दरीत पडला. माझ्या म्हातारपणी तोच आधार होता मला. त्याला खूप समजावले की नको जाऊस पण त्याने काही ऐकले नाही. आता मी कोणाकडे बघून जगायचे रे.. ज्या टेकडीवर ग्रहण पाहायला गेला होता ती खूप विचित्र जागा आहे. तिथे एक हडळ आहे, तरुण पोरांना आत ओढते. आज पर्यंत किती तरी पोर गिळली त्या हड ली ने. मी लहानपणापासून ऐकत आले होते पण जेव्हा माझ्या पोरा सोबत घडले तेव्हा मला कळले.”

मी म्हणालो “अहो आजी.. असे काही नसते, आपण माणसं अविचारी वागतो आणि दोष भूतांना. भूत, पिशाच्च, हडळ, आत्मा असले काही नसते हो, सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. तसे ती आजी हसतच म्हणाली “असते रे बाळा, हे सगळे असते.. तुला कधी जाणवले नसेल म्हणून म्हणतोस.. असू दे.. तुम्ही तरुण पोर कोणाचं ऐकणार पण बाळा खूप विश्वासा न अगदी मुलासारखे समजून तुझ्याशी सगळे बोलले, हे दुसऱ्या कोणाला सांगू नकोस कारण ते मला अजिबात आवडणार नाही. तसे मी म्हणालो “नाही आजी.. नाही सांगणार कोणाला.. काळजी नका करू”. एव्हाना पाऊस थांबला होता म्हणून ती आजी उठून निघून गेली. 

मी मनातल्या मनात खुश झालो कारण मला माझ्या पुढच्या हॉरर कथे साठी विषय मिळाला होता.. चंद्र ग्रहण, हडळ आणि टेकडी. तितक्यात माझा मित्र तिथे आला तसे मी त्याला म्हणालो “अरे एक भारी आयडिया मिळाली आहे स्टोरी साठी तुझ्या दुकानात बसल्या बसल्या.” तेवढ्यात तो म्हणाला “अरे आपल्याला आजचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल, माझ्या कॉलनी मध्ये एक मयत झालेय, जवळची व्यक्ती आहे जावे लागेल”. मी ही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून “हरकत नाही” म्हणालो आणि तिथून थेट घरी आलो.

एका अर्थी लाँग ड्राईव्ह कॅन्सल होऊन बरेच झाले होते कारण त्यामुळे मला माझी स्टोरी लिहायला बराच वेळ मिळणार होता. मी वर माझ्या रूम मध्ये जाऊन बसलो. दार लावून घेतले आणि ट्युब लाईट बंद करून नेहमी प्रमाणे माझ्या डेस्क वर एक मेणबत्ती पेटवून ठेवली. हे थोडे विचित्र वाटेल तुम्हाला पण मी हॉर र स्टोरी लिहायला बसलो की मेणबत्तीच्या प्रकाशात लिहितो कारण तशी वातावरण निर्मिती झाली की लिहायला बरे पडते. मी स्टोरी लिहायला सुरुवात केली. नाव ही पटकन सुचले “एक मंतरलेली टेकडी”. जसे मी नाव लिहिले मला एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि धावतच खाली गेलो.

मला वाटले की माझी आई किंवा बहीण किंचाळली पण खाली गेलो तर सगळे शांत झोपले होते. मी खिडकी उघडून बाहेर नजर फिरवली पण तिथे ही कोणी नव्हते. तसे मी पुन्हा वर माझ्या रूम मध्ये आलो आणि समोर पाहतो तर काय.. माझ्या त्या वहीवर मेणबत्ती पडून कागदाने पेट घेतला होता. मी पटकन आग विझवली आणि पुन्हा दुसरा कोरा कागद घेऊन त्यावर लिहायला सुरुवात केली. का कोण जाणे पण मला सतत जाणवत होत की माझ्या रूम च्या खिडकी जवळ कोणी तरी आहे. मी नेहमी खिडकी उघडी ठेवतो पण त्या रात्री वारा पाऊस असल्यामुळे खिडकी बंद केली होती. मी लिहायला सुरुवात केली आणि अचानक खिडकीवर जोरात धाप पडली. 

आता मात्र मी घाबरलो. कारण माझी रूम दुसऱ्या मजल्यावर आहे त्यामुळे इतक्या उंचावर कोणी पोहोचणे शक्य नाही. मी धीर एकवटून उठलो आणि दबक्या पावलांनी खिडकी जवळ आलो. भीतीने काळीज धडधडायला सुरुवात झाली होती. मी हळूच खिडकी उघडली आणि बाहेर नजर फिरवली. पण तिथे कोणीही नव्हते. मुसळधार पाऊस आणि वारा सुरू होताच. वाऱ्यामुळे जोरात खिडकी आपटली असेल असा विचार करत मी खिडकी बंद करू लागलो पण खिडकीचे दार कुठे तरी अडकल्यासारखे वाटले. मी अगदी ताकदीनिशी ती बंद करण्याचा प्रयत्न करू लागलो पण असे वाटत होते की खिडकी बाहेरून कोणी तरी पकडली आहे आणि ती बाहेरच्या दिशेला खेचली जातेय. 

तितक्यात अचानक माझ लक्ष खाली गार्डन मध्ये गेले. तिथे एक आकृती उभी होती. इतक्या रात्री भर पावसात ती आकृती माझ्या दिशेने एक टक पाहत होती. जसे मी तिच्याकडे पाहिले तसे तिने नकारार्थी मान हलवली आणि अतिशय किळसवाण्या आवाजात किंचाळली. मी घाबरून खाली धावत सुटलो आणि वडिलांना उठवले. मी त्यांना म्हणालो की आपल्या गार्डन मध्ये कोणी तरी आहे. त्यांनी झटकन उठून बॅटरी घेतली आणि गार्डन मध्ये जाऊन पाहून आले. पण त्यांना तिथे कोणीही दृष्टीस पडले नाही. त्यांनी मला समजावले की तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये, तुला नको ते भास होत आहेत. वर जाऊन शांतपणे झोप आता. 

मी पुन्हा रूम मध्ये आलो आणि लिखाण तसेच अर्धवट ठेऊन अंथरुणात जाऊन पडलो. त्या रात्री मला खूप ताप भरला. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा आई माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत होती. ती म्हणाली “काल रात्री तू तापाने फणफणत होतास, खूप ताप भरला होता तुला”. दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर पडलोच नाही. घरीच आराम करत होतो. माझा मित्र ज्याच्या बरोबर मी लाँग ड्राईव्ह ला जाणार होतो तो संध्याकाळी मला भेटायला आला. आई ने आम्हाला दोघांना मस्त गरम चहा करून दिला. आम्ही दोघं माझ्या रूम मध्ये बोलत बसलो होतो. मी त्याला रात्री जे घडले ते सांगितले, ऐकुन त्याला ही थोडे विचित्र वाटले पण नंतर बोलता बोलता आम्ही विषय बदलला. मी त्याला विचारले की काल तुमच्या इथे कोण गेलं रे, कोणाच्या मयताला गेला होतास तू?.

तसे तो म्हणाला “अरे एक आजी होती, मुलगा काही वर्षापूर्वी गेला आणि तिला तिचे असे दुसरे कोणीही नव्हते त्यामुळे एकटीच राहायची”. माझ्या मनात अचानक एक शंका येऊन गेली तसे मी त्याला विचारले “तिचा मुलगा त्या टेकडीवरच्या अपघातात गेलाय का?”. मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला “हो.. पण तुला कसे माहीत?”. तसे मी त्याला सांगू लागलो “काल तू गेल्यावर एक आजी आली होती शॉप वर, तिनेच सांगितले मला”. त्याने पटकन मोबाईल काढला आणि त्या आजीचा फोटो मला दाखवला. मी फोटो पाहताच म्हणालो “अरे.. हीच आजी.. याच आल्या होत्या काल”. माझे बोलणे ऐकुन मित्र हसतच म्हणाला “तुझा ताप तुझ्या डोक्यात गेलाय बहुतेक, काय अभद्र बडबडतोय.. त्या काल संध्याकाळी ६ ला एक्सपायर झाल्या.”

त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षण अगदी शून्यात गेलो. माझा अश्या गोष्टीवर कधीही विश्वास नव्हता पण जे झाले ते नक्की काय होते?. डोक्यात प्रश्नाचं काहूर माजलं होत. मित्र काही वेळानंतर त्याच्या घरी निघून गेला. पण मी मात्र मला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंग झालो होतो. काल रात्री पासूनच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात केली आणि हळू हळु मला घडलेल्या विचित्र प्रसंगाचा उलगडा होत गेला. माझी खूप मोठी चूक झाली होती. त्या आजी च काल रात्री पुन्हा आल्या होत्या. त्यांच्या आत्म्याने माझ्याशी मन मोकळ केलं, आणि मला सांगून गेले होते की माझ दुःख कोणालाही सांगू नकोस. आणि मी काय केलं ? मी त्याचीच कथा लिहून प्रदर्शित करणार होतो. तेच त्यांना नको होत. त्यासाठीच अडवायला त्या आल्या होत्या बहुतेक. मी खरंच चुकलो. कथा लिहायला घेतलेले पान मी फाडून टाकले आणि पुन्हा त्या बद्दल काहीच लिहिणार नाही असे स्वतःच स्वतःला वचन दिले. 

Leave a Reply